
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रायगड लोकसभा मतदार संघात मतदारांनी शिवसेनेला भरभरून मतदान केले असून आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी व्यक्त केला आहे. अलिबाग येथे क्षात्रौक्य समाज हॉलमध्ये मतदार व शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी अलिबाग मुरुड विधानसभा मतदातसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी अलिबाग येथे होणार आहे. त्याआधी मतदारांचे तसेच शिवसेना, भाजप, रासप, आरपीआय कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी अनंत गीते हे लोकसभा मतदारसंघात मेळावे घेत आहेत. यावेळी गीते आपल्या भाषणात म्हणाले की, यावेळचा निकाल हा अचंबित करणारा असेल. जिल्ह्यातील मतदारांनी माझ्या मागे ठाम राहून मतदान केले आहे. तसेच अदृश्य हातांनेही यावेळी मला मतदान केले आहे. त्यामुळे 23 मेला मतमोजणीचा कल हा माझ्या बाजूनेच लागणार असल्याचा ठाम विश्वास गीते यांनी बोलून दाखविला.
यावेळी जिल्हाप्रमुख किशोर जैन, राजीप विरोधी पक्षनेते सुरेन्द्र म्हात्रे, माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, विजय कवळे, तालुकाप्रमुख राजा केणी, उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, भाजपा जिल्हा सरचिटणीस सतीश लेले, दर्शन प्रभू संघटक सतिष पाटील, शहरप्रमुख संदीप पालकर आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या मेळाव्याला शिवसेना, भाजप, आरपीआय कार्यकर्ते तसेच महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पिंपळे यांनी केले.

























































