
सामना ऑनलाईन । बंगळुरू
केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे आज सोमवारी पहाटे निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. बंगळुरू येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते, संघटनेतील कडक शिस्तीचे नेते, बंगळुरूचे ‘सर्वाधिक प्रिय’ खासदार आणि संयुक्त राष्ट्र संघात कन्नड भाषेत बोलणारे प्रथम व्यक्ती, असा नावलौकिक अनंतकुमार यांनी मिळवला होता.
निवडणुकीच्या राजकारणात अनंतकुमार अजिंक्य होते. सलग 6 वेळा ते बंगळुरू लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयींपासून लालकृष्ण आडवाणी ते नरेंद्र मोदींपर्यंत अनंतकुमार हे कायम भाजपातील केंद्रीय नेतृत्वाच्या निकट राहिले. त्यांच्या निधनामुळे विरोधी पक्षांनीही शोक व्यक्त केला आहे.
1998मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या कॅबिनेटमधील सर्वात तरुण मंत्री असल्याचा बहुमान त्यांनी मिळवला. वाजपेयी सरकारमध्ये ते नागरी विमान वाहतूक मंत्री होते. आता त्यांच्याकडे रसायन आणि खत मंत्रालय होते.


























































