मधूर सूर सारंगीचे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धनेश पाटील ,[email protected]

अनंत कुंटे… जागतिक कीर्तीचे सारंगीवादक… मराठी संगीत क्षेत्रातील आदरणीय नाव…

सारंगीवादक म्हणून केवळ राज्यात आणि देशभरातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्धी पावलेले जागतिक ख्यातीचे कलाकार म्हणजे अनंत कुंटे. तब्बल 35 वर्षे आकाशवाणीवर सारंगीवादक म्हणून नोकरी केलेल्या अनंत कुंटे यांनी अनेक दिग्गजांना आजवर सारंगीची साथसंगत केली आहे. आपल्या कलेचा प्रचार आणि प्रसार करत सारंगीवादनाचा नाद जगभर घुमवणारे आणि मराठी सारंगीवादक म्हणून सर्वज्ञात असलेले अनंत कुंटे हे संगीत विश्वातलं ऋषितुल्य व्यक्तिमत्वच म्हणता येईल.

अनंत यांना सारंगीवादनाच्या साथसंगतीची उत्तम जाण असल्याने अनेक गायक त्यांना आवर्जून साथसंगीतासाठी बोलावत असत. आपल्या बंधूकडून रागदारीही उत्तम शिकल्याने रागारुपांची त्यांना सुक्ष्म समजच प्राप्त झाली होती. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्याचे गायक अनंत यांना नियमीतपणे साथसंगत करण्यास बोलावत असतं.

सारंगीवादक म्हणून वेगळं नाव कमावलेल्या कुंटे यांच्या छायाचित्रणासाठी मी त्यांच्या घरी गेलो. सारंगीवाद्यासोबतच त्यांचे काही फोटो टिपायचे असं ठरवून त्यासाठीची प्रकाशयोजना केली. कुंटे यांनी आपलं लाडकं वाद्य हृदयापाशी धरलं अन् सूर छेडले. सारंगीच्या गोडव्याने काही क्षण मी मंत्रमुग्ध झालो अन् त्याच सूरमयी वातावरणात आमचं हे फोटोशूट सुरु झालं. सुरुवातीला काही साधे म्हणजेच फ्लॅट लाइटमध्ये आणि साइड लायटींगमध्ये आम्ही फोटोशूट केलं. रंगीत छायाचित्रांचा आणि मोनोटोन्स म्हणजेच ब्लॅक ऍण्ड व्हाइट छायाचित्रांचा एक संचच आमच्याकडे यावेळी तयार झाला. या शूटनंतर त्यांच्याशी काही तास गप्पा मारण्याची संधी मला मिळाली.

अनंत यांचा प्रवास संगीताच्या दिशेने होण्याचं कारण हे त्यांचे कुटुंबीय ठरले. किंबहुना अनंत हे सांगतिक वातावरणातच लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील कृष्णाजी हे पेशाने शिक्षक होते. तसंच त्यांना भजन गायनाचीही फार आवड होती. भजनाच्या जोडीने ते पखवाज आणि तबलाही उत्तम वाजवत असतं. वडिलांचा हाच वसा पुढे कायम राखत अनंत यांचे जेष्ठ बंधू विनायकराव कुंटे हे पं. विनायकराव पटवर्धन व उस्ताद अन्वर हुसेन खाँ यांच्याकडे आग्रा घरण्याची गायकी शिकले, तर त्यांचे दुसरे बंधू पं. लक्ष्मणराव हे तबला व क्लॅरिओनेट वाजवत असत. पं शंकरभैया, उस्ताद अल्लारखा, उस्ताद जिरेखा व उस्ताद अमीर हुसेन खाँ हे त्यांचे तबलावादनाचे गुरु. याच कुंटे घराण्यातील गायन आणि वादनाच्या संस्कारात अनंत हे लहानाचे मोठे झाले आणि त्यांच्यावरही संगीताचे उत्तोमोत्तम संस्कार घडत गेले.

अनंत यांना सर्वप्रथम गोडी लावली ती तबला या वाद्यानं. या तबल्याचं शिक्षण त्यांच्या बंधूंकडूनच मिळाले होते. मात्र एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या कानावर सारंगीवाद्याचे सूर पडले अन् तोच दिवस त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्याच दिवशी अनंत यांनी सारंगीवाद्याचे धडे गिरवण्याचे निश्चित केले अन् त्या दिशेने आपला प्रवास सुरु केला. अनंत यांना सारंगी वाद्यासाठी पहिले गुरु लाभले ते मरहूम उस्ताद अमीरबक्ष खाँसाहेब. तब्बल आठ वर्षे अनंत हे आपल्या गुरुंकडे नियमित सारंगीचे धडे गिरवण्यास जात असत. यानंतरच्या काळातही ते शक्य होईल तेव्हा आपल्या गुरुकडे जात असत. मात्र शहराबाहेरील नोकरीपोटी त्यांना स्थलांतर करावे लागले अन् यामुळे संगीत शिक्षणात खंड पडत गेला. आपल्या गुरुंकडे नियमित संगीताचे धडे गिरवत असतानाच साथीच्या सरावासाठी ते पं. नारायणराव व्यास, पं. राम मराठे, पं. सुरेश हळदणकर, विदुषी माणिक वर्मा अशा ज्येष्ठ गायकांकडे जात असत. आपल्या अथक परिश्रमातून सारंगीवर पकड मिळवण्यात अनंत हे यशस्वी झाले अन् या यशाच्या शिदोरीमुळेच त्यांनी मैफिलींत साथसंगत करण्यात सुरुवात केली.

सारंगीवादक म्हणून अल्पावधीतच प्रसिद्धी पावलेल्या अनंत यांना 1953-54 साली मोहरमच्या काळात मुंबई आकाशवाणीवर बदली सारंगीवादक म्हणून साथसंगत करण्यासाठी बोलवण्यात आले आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. याच काळात आकाशवाणीतील संगीत दिग्दर्शक दिनकर अमेंबल यांच्या वाद्यवृंद रचनांसाठी त्यांनी चेलो हे वाद्यही वाजवले. अनंत यांच्या कलेतली जाण हेरून 1955 साली त्यांची राजकोट आकाशवाणीवर सारंगीवादक म्हणून नेमणूक करण्यात आली. 1958 साली त्यांची पुणे आकाशवाणीत बदली करण्यात आली. सुमारे पंधरा वर्षांच्या पुण्यातील नोकरीनंतर त्यांना 1973 ते 1990 या कालावधीकरीता मुंबई आकाशवाणीत सारंगीवादक म्हणून नेमण्यात आले. याच शाखेतून ते नंतर सेवानिवृत्त झाले. आकाशवाणीतल्या त्यांच्या एकूण पस्तीस वर्षांच्या कारकीर्दीत अनेक दिग्गज कलावंतांना साथसंगत करण्याची त्यांना संधी मिळाली होती. त्यांनी स्वतंत्र सारंगी वादनकरुन आपला वेगळा ठसा या क्षेत्रात उमटविण्यात ते यशस्वी झाले.

मुंबई, राजकोट आणि पुण्यात आपली कला सादर केलेल्या अनंत यांची कीर्ती राज्यभर पसरली अन् राज्यातील कानाकोपऱयातील गावांत त्यांनी असंख्य कार्यक्रमांतून आपला सहभाग नोंदवला. यशाचा हाच आलेख कायम राखत पुढे देशभरात आणि परदेशातही त्यांनी सारंगीवादनाचा नाद घुमवला.
संगीताचा हाच प्रचार आणि प्रसार करीत असताना अनंत कुंटे यांनी आपल्या कलेचा वारसा पुढे कायम राहील या उद्देशाने अनेक शिष्य घडवले. ऍमस्टरडॅम येथील संगीतसंस्थेत अनंत कुंटे हे नियमितपणे सारंगीवादनाचे अध्यापन करीत असत. वयाने वृद्ध मात्र मनाने तरुण असलेल्या या कलावंताच्या अंगी संगीताबद्दल अपार निष्ठा आजही असल्याचं मला त्यांना भेटून जाणवलं.