मोगरा पंपिंग स्टेशन अंधेरी, जोगेश्वरी, वर्सोवा, डोंगरी पूरमुक्त करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेला पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मोगरा पंपिंग स्टेशन पालिका लवकरच उभारला जाणार आहे. या पंपिंग स्टेशनमुळे अंधेरी ते जोगेश्वरी स्टेशन परिसर, मालपा डोंगरी ते वर्सेवा परिसराची पाणी तुंबण्यातून सुटका होणार आहे. या कामासाठी 395 कोटींचा खर्च केला जाणार असून याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये आठ ठिकाणी पंपिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय ब्रिमस्टोवॅडअंतर्गत 2006 मध्ये घेण्यात आला आहे. यातील सहा पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. यामध्ये पालिकेने आतापर्यंत हाजीअली, रे रोड, वरळी येथील लव्हग्रोव्ह, क्लीव्हलँड, जुहू येथील इर्ला, खार येथील गझदरबंद या ठिकाणी उच्च क्षमता असणारी पंपिंग स्टेशन उभारली आहेत. मात्र उपनगरांसाठी दिलासादायक ठरणारे माहुल आणि मोगरा पंपिंग स्टेशन अद्याप रखडले होते. मात्र यातील मोगरा पंपिंग स्टेशनला मार्ग मोकळा झाला आहे.

प्रत्येक सेकंदाला 42 हजार लिटर पाणी उपसणार

मोगरा येथे उभारण्यात येणाऱया पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून प्रत्येक सेकंदाला 42 हजार लिटर पाणी उपसले जाणार आहे. त्यामुळे समुद्राला भरती असतानाही अतिवृष्टीचे पाणी समुद्रात टाकता येणार आहे. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी नाल्याद्वारे शहरामध्ये येऊ नये यासाठी नाल्यामध्ये पूरप्रतिबंधक दरवाजेही प्रस्तावित करण्यात आले आहेत. तसेच नाल्यामधून वाहून येणारा कचरा समुद्रामध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी स्वयंचलित स्क्रीनही बसवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे बाराही महिने नाल्यातून येणारा कचरा समुद्रात जाण्यापासून रोखणे शक्य होणार आहे.