अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुलाचा कायापालट होणार, एशियन कप फुटबॉल स्पर्धेसाठी दुरुस्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुरुस्ती, सुविधा आणि रंगरंगोटीमुळे अंधेरी येथील शहाजी राजे क्रीडा संकुलाचा लवकरच कायापालट होणार आहे. या कामांसाठी आवश्यक असणारा 60 लाखांचा निधी बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान यांना देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल, अंधेरी येथे एशियन कप महिला फुटबॉल स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या मोठय़ा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आयुक्त, अतिरिक्त पूर्व उपनगरे आणि एशियन फुटबॉल फेडरेशनचे पदाधिकारी यांच्यात बैठकही झाली होती. यानुसार 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा आणि स्पर्धेसाठी उत्तम सोयी देण्याबाबत मुंबई फुटबॉल अरेना अंधेरी क्रीडा संपुल यांच्याकडून पालिकेला विनंती पत्र प्राप्त झाले आहे. सद्यस्थितीत मुंबई फुटबॉल अरेना हे बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान यांना परिरक्षणासाठी पालिकेने हस्तांतरित केले आहे.

अशा सुविधा होणार
 प्लंबिंग, रंगकाम, सॅनिटेरी फिटिंग्ज आणि इतर किरकोळ दुरुस्तीसाठी 16 लाख 500 रुपयांचा खर्च  सामन्यांसाठी होणाऱया विजेच्या वाढीव देयकांसाठी 15 लाख अतिरिक्त वाढ अपेक्षित  4 हायमास्ट दिव्यांच्या दुरुस्ती, देखभालीसाठी, विशिष्ट प्रकारच्या दिव्यांच्या खरेदीसाठी 30 लाख खर्च

कर्मचाऱयांचा पगारही वाढवा!
या ठिकाणी काम करणाऱया कर्मचाऱयांना गेल्या काही वर्षांपासून केवळ दहा हजार रुपये पगार दिला जात आहे. अशा तुटपुंज्या पगारात मुंबईसारख्या ठिकाणी राहणे शक्य नाही. त्यामुळे या कर्मचाऱयांना पगारवाढ देण्यासाठी पालिकेने वाढीव अनुदान द्यावे, असे निर्देशही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.