
सोशल मिडियावर सध्या बाप-लेकीचा एक फोटो तुफान व्हायरल होतोय. या फोटोचं वैशिष्टय़ म्हणजे डीएसपी झालेल्या लेकीला इन्स्पेक्टर बाबा सॅल्यूट करताना दिसत आहे. बाप-लेकीच्या या फोटोने सोशल मिडियावर सर्वांचेच मन जिंकले आहे.
आंध्रप्रदेश पोलिसांनी 3 जानेवारीला पोलीस मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डीजीपी गौतम सवांग यांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात पोलीस सब इन्स्पेक्टर श्याम सुंदर यांनी डीएसपी पदावर असलेल्या आपल्या मुलीला म्हणजेच जेसी प्रसनती यांना सॅल्यूट केला. आपल्या लेकीला सॅल्यूट करताना त्यांची छाती अभिमानाने फुलली होती. हा क्षण पाहून उपस्थित अधिकारी देखील भावूक झाले.
प्रसनती या 2018च्या बॅचच्या पोलीस अधिकारी आहेत. सध्या त्या आंध्रप्रदेशातील गुंटूर दक्षिण शहरात डीएसपी म्हणून कार्यरत आहेत. तर प्रसनती यांचे वडील श्याम सुंदर हे तिरूपती कल्याणी डेम पोलीस प्रशिक्षण केंद्रात इन्स्पेक्टर आहेत.



























































