जगातील कुठलेही मैदान माझ्यासाठी मोठे नाही! ‘आयपीएलचा बाहुबली’ रस्सेलची सिंहगर्जना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

जगातील कोणतेही क्रिकेट मैदान आता माझ्यासाठी मोठे नाही. कारण माझा माझ्या फटकेबाजीवर आणि जिद्दीवर अपार विश्वास आहे, अशी सिंहगर्जनाच कोलकाता नाइट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू आणि ‘आयपीएलचा बाहुबली’ म्हणून ओळखला जाऊ लागलेला धडाकेबाज फलंदाज आंद्रे रस्सेल याने केली आहे.

रस्सेलने 13 चेंडूंत नाबाद 48 धावांची भागीदारी रचून शुक्रवारी रात्री कोलकात्याचा विजय साकारला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. रसेलच्या या तडाख्यामुळे कोलकात्याकडून 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याने अखेरच्या चार षटकांत 66 धावा ठोकून काढल्या.

वेस्ट इंडीजचा अष्टपैलू आंद्रे रसेल म्हणतो, ‘मला वाटायचे की ऑस्ट्रेलियातील क्रिकेट स्टेडियम अवाढव्य असतील. तिथे फटकेबाजी करणे कठीण जाईल, पण त्या मैदानांवरही चेंडू सीमारेषेवरून आणि सीमापार करताना मला अडचण आली नाही. खरेतर तिथल्या फटकेबाजीमुळे मीदेखील चकित झालो. तेव्हा कळले की माझ्यासाठी जगाच्या पाठीवरील कोणतेच मैदान मोठे नाही. माझे सामर्थ्य आणि ताकद यावर माझा पूर्ण विश्वास आहे. शिवाय माझ्या खेळात वेग आहे. या जमेच्या बाजू ओळखून असल्याने त्यानुसार खेळतो’. त्याच्या घाणाघाती खेळीमुळे कोलकात्याने बंगळुरूवर पाच विकेटने विजय मिळवला. रसेलने आपल्या नाबाद 48 धावांच्या खेळीत सात षटकार आणि एका चौकाराची आतषबाजी केली. ‘सहकाऱयांकडून भरघोस पाठिंबा मिळत असून संघातील वातावरणही खूप छान आहे. अशा वातावरण खूप मस्त व्यक्त होता येते. हे व्यक्त होणे मग मैदानातही झळकते. मी नेमके काय करतो आहे, ज्यामुळे मला एवढे यश मिळते आहे हे मला तुम्हाला शब्दांत सांगता यायचे नाही. ते मी मैदानात खेळूनच स्पष्ट करू शकतो’, असे रस्सेल म्हणाला.

‘20 चेंडूंत विजयासाठी 68 धावांची आवश्यकता. अशी स्थिती काही रोज येत नाही. मग काय कंबर कसली आणि दिले झोकून. टी-20 क्रिकेट असेच आहे. एक षटकही लढतीचा निकाल बदलू शकते.’
– आंद्रे रस्सेल

‘आगामी वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडीजचा जो संघ असेल त्यात आंद्रे रस्सेलचे स्थान पक्के असेल. त्याखेरीज इतर दहा कोणही चालतील.’
– ब्रायन लारा, माजी कर्णधार, वेस्ट इंडीज