उमरग्यात संतप्त विद्यार्थ्यांचा एसटी अडवत रास्ता रोको; बस थांबत नसल्याचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निलंगा तालुक्यातील उमरगा (हाडगा)येथे मागील अनेक महिन्यांपासून एसटी बस ही थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही विद्यार्थ्यांनी शुक्रवारी एसटी थांबवण्यासाठी हात दाखवला असता एसटी चालकांने विद्यार्थ्यांच्या अंगावर एसटी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी उमरगा हाडगा येथे मुख्य चौकात एसटी अडवून तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

निलंगा -उमरगा -हाडगा – तुपडी राठोडा या मार्गावर जाणाऱ्या एसटी बसेस अपुऱ्या पडत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेला जाण्यासाठी गैरसोय होत आहे. याबाबत अनेकदा निलंगा आगारप्रमुख राठोड यांना गावकऱ्यांनी लेखी व तोंडी तक्रार देऊनही एसटी आगाराकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शुक्रवारी गावकरी, विद्यार्थी आणि प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी एसटी आगाराविरुद्ध नारेबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी जादा बसेस सोडण्याची मागणी करण्यात आली. उमरगा हाडगा येथे बस थांबवावी ही मागणी करण्यात आली.

वर्षभरापासून निलंगा आगाराचा ढिसाळ कारभार सुरु असल्याचे प्रवाशांनी सांगितले. असाच प्रकार राणी अंकुलगा व बसपूर बसची झाली आहे.बसपूरला जायची केळगाव मार्गे बसपूर-निलंगा ही बस कायमस्वरूपी निलंगा आगाराकडून बंद करण्यात आली आहे. तर राणी अंकुलगा बस ही वेळेवर जात नाही. तालुक्यामध्ये एकंदरीत एसटी आगाराचा ढिसाळ कारभार असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. रास्ता रोको आंदोलन हिंसक वळण घेऊ नये म्हणून निलंगा पोलिसाचे पथक याठिकाणी उपस्थित होते.