डोक्यावर रिकामा हंडा घेत पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या महीलांच्या व्यथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी शिवणी बु. गावात महीलांच्या मोर्चाला सामोरे जातांना स्वत: डोक्यावर हंडा घेत पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या महीलांच्या व्यथा जाणून घेतल्या. या गावातील तरुणींनी कॉलेज सोडून कसे पाणी भरावे लागत असल्याचे सांगत भीषण पाणीटंचाईची व्यथा त्यांच्यासमोर मांडली.

हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी आज साडे तीन वाजता दुष्काळी पाहणी दौऱ्यास सुरुवात केली. कळमनुरी तालुक्यातील उमरा, शिवणी, रामवाडी यासह वसमत व औंढा नागनाथ तालुक्यातील गावांना पालकमंत्र्यांनी भेटी दिल्या. उमरा येथे गावातील ३० कुटूंबांनी स्थलांतर केले असून रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली. तसेच दोन महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य पुरवठा केला जात नसल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली. तसेच सिंचन विहीरींचे प्रस्ताव मंजुर झाले नसल्याचे सांगितले. सुभाष दिंडे, माधवराव दिंडे, विठ्ठल दिंडे यांनी सिंचन विहीरींची मागणी केली. तर विलास आठवले घर आगीत जळुन खाक झाले तरीही शासकीय मदत मिळाली नसल्याचे सांगितले.

पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना टंचाई संबंधीत कामे तातडीने पूर्ण करावीत, असे सांगितले. शिवणी बु. गावात प्रज्ञा भगत, शालिनी भगत या युवतींनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून आम्हाला पाणी भरावे लागत असल्याचे सांगितले. आम्हाला टँकर नको तर कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजना हवी, अशी मागणीही या युवतीने केली. टँकरव्दारे येणारे गढुळ पाणी प्यावे लागत असल्याची तक्रार महिलांनी केली.

पालकमंत्री दिलीप कांबळे हे शिवणीमध्ये पोहचताच रिकाम्या घागरी घेतलेल्या महिलांनी पाणी टंचाईची तक्रार केली. पिण्यासाठी फिल्टरचे पाणी तर वापरासाठी साधे पाणी टँकरव्दारे पुरविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. या दुष्काळ पाहणी दौऱ्यात आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी, नगरसेवक गणेश बांगर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. रामवाडी येथे भेट देऊन पालकमंत्र्यांनी श्रमदानाच्या कामाची पाहणी केली व ग्रामस्थांसमवेत संवाद साधला.