शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपकडून अजितदादांना सुपारी, अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणातून संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना सुपारी दिली आहे, असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी आज केला. कारवाईच्या भीतीने अजितदादा पक्षाबाहेर गेल्याचे सांगतानाच सरकारमध्येही त्यांना साइडलाइन केले जात असल्याचे देशमुख म्हणाले.

अनिल देशमुख यांनी आमदार रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार वेगळे झाल्याच्या मुद्दय़ावरही अनिल देशमुख यांनी यावेळी सडेतोड भाष्य केले.

परमवीर सिंग यांना हाताशी धरून विदर्भाच्या नेत्याने मला 14 महिने तुरुंगात टाकले

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना हाताशी धरून विदर्भातील एका नेत्याने मला 14 महिने तुरुंगात पाठवले अशा शब्दांत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधला.

‘‘उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोरील गाडीत त्यावेळी स्पह्टके सापडली होती. गाडी मालकाचीही हत्या झाली होती. त्या प्रकरणात परमवीर सिंग आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा हात होता. गृहमंत्री असल्यामुळे मी परमवीर यांची बदली करून त्यांना निलंबित केले होते, तर वाझेला बडतर्फ केले होते. त्यामुळे दोघेही नाराज होते आणि तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी परमवीर यांना हाताशी धरून माझ्यावर गंभीर आरोप केले,’’ असे अनिल देशमुख म्हणाले. अनिल देशमुख पुढे म्हणाले की, ‘‘हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने परमवीर सिंग यांना अनेकदा समन्स बजावूनही ते हजर झाले नव्हते. शेवटी न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर त्यांनीच न्यायालयात शपथपत्र दाखल करत आरोप ऐकिव माहितीवर केल्याची कबुली दिली होती. परंतु त्यामुळे मला नाहक 14 महिने तुरुंगात रहावे लागले.’’

दादांनी वेगळी चूल का मांडली हे सर्वांनाच माहीत

भोपाळला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण झाले आणि तिसऱ्याच दिवशी अजित पवार भाजपमध्ये गेले. त्यामुळे त्यांनी वेगळी चूल का मांडली हे सर्वांनाच माहीत आहे, असे देशमुख म्हणाले. शरद पवार यांना राजकारणातून घरी बसवण्यासाठी अजित पवार गटाला भाजपने सुपारी दिली आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत काय ठरलेय हे मला माहीत नाही, पण र्भीजपकडून त्यांना निर्णय प्रक्रियेतून साइडलाइन केले जातेय असे देशमुख म्हणाले.

“मला जसा त्रास झाला, तुरुंगात टाकले गेले, तसा त्रास होऊ नये म्हणून आमचे ज्येष्ठ नेते आणि सहकारी पक्षाबाहेर गेले.”

अनिल देशमुख