एसटीचा प्रवासही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठीच; परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आल्यानंतर आता गावागावांना जोडणाऱया लाल परी म्हणजेच एसटीतून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांनाच प्रवास करता येणार आहे. राज्यात खासगी व सार्वजनिक वाहतुकीसाठी कडक नियम लागू करण्यात आले असून एसटी बसमधून सर्वसामान्यांना आता प्रवास करता येणार नाही. याविषयीची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज दिली.

राज्यात कठोर निर्बंध लागू झाले असून या काळात एसटी बसची संख्यादेखील कमी होणार आहे. कारण नेहमीप्रमाणे एसटी चालणार नाहीत. केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच एसटी सुरू राहणार असल्यामुळे एसटीची संख्या कमी राहील, असे अनिल परब यांनी आज स्पष्ट केले. एका जिह्यातून दुसऱया जिह्यात जर लोक जाणार असतील तर सरकारने म्हटल्यानुसार त्यांना हातावर शिक्का मारून 14 दिवसांसाठी क्वारंटाइन ठेवले जाईल, अशी माहितीही अनिल परब यांनी दिली आहे.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत एसटीसाठी नियमावली

  • एसटी बसमधून फक्त आपत्कालीन कर्मचारी प्रवास करणार
  • एसटी महामंडळाच्या 16 हजार गाडय़ांपैकी स्थानिक पातळीवरील डेपो मॅनेजर निर्णय घेऊन 50 टक्के गाडय़ा रस्त्यावर उतरणार.
  • डॉक्टर / पॅरामेडिकल /प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रुग्णालय आणि वैद्यकीय चिकित्सालयातील अधिकारी-कर्मचारी  यांनाच त्यांच्या वैद्यकीय संस्थेने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे तिकीट देण्यात येईल.
  • कोणतीही व्यक्ती ज्याला वैद्यकीय उपचाराची गरज आहे, किंवा अपंग व्यक्ती आणि त्यांच्या मदतीला एक अतिरिक्त व्यक्तीला प्रवास करता येईल.