
देशात सध्या पाळीव जनावरं विशेषत: गाई-म्हशीमध्ये लंपी रोगानं थैमान घातलं आहे. अनेक पशूपालन करणाऱ्यांच्या गाई आणि म्हशी या रोगाला बळी पडताना दिसत आहेत. हिंदुस्थानातील जवळजवळ 12 राज्यात 165 जिल्ह्यामधील 11.25 लाख गाई-म्हशींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून साधारणपणे 50 हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पशूपालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
महाराष्ट्रात देखील या रोगानं पाय पसरायला सुरुवात केली असून विरोधकांनी सरकारला या प्रश्नावरून चांगलंच घेरलं आहे. अखेर सरकारने यावर काम करायला सुरुवात केली असून संभाजीनगरमध्ये शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची माहिती दिली आहे. लंपी आजारामुळे आता जनावरांच्या विलगीकरणासाठी क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आज संभाजीनगरात वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी लंपी आजाराबाबत उपययोजनेविषयी माहिती दिली. लंपी आजारावर लस उपलब्ध केली आहे. तसंच आजारासाठी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ज्यांची जनावरे मृत्युमुखी पडले त्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे राज्य सरकार मदत करेल, असंही त्यांनी सांगितलं. त्याच वेळी जनावरांना क्वारंटाईन करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, राज्यातील सांगली जिल्ह्यात बाधित 38 जनावरांपैकी 20 जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच 20 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून आत्तापर्यंत एकही जनावरांचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे.































































