
सध्या महाराष्ट्रात कांदाप्रश्न पेटला आहे. कांदा शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कांदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बुधवारी दिल्लीत बैठक होणार आहे असे सांगितले आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी कांद्याचा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडणार असल्याचे सांगितले. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.
”गिरीश महाजन म्हणतात कांद्याचा प्रश्न अमित शहांसमोर मांडणार ? म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता दिल्लीची परवानगी लागते? राज्याचे नेते फक्त ‘दिल्ली दूत’ झाले आहेत का? महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, मंत्रिमंडळ आहे, पण कांद्याच्या प्रश्नावर अमित शहांची गरज? हे ‘स्वायत्त राज्य’ आहे की ‘उपकार्यालय’?”, असा संतप्त सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
कांद्याला किमान 50 पैसे आणि सरासरी 8 ते 10 रुपये असा मातीमोल भाव मिळत आहे. प्रतिक्विंटल उत्पादन खर्च चौदाशे ते पंधराशे रुपये येत असताना सरकारने त्याहूनही कमी म्हणजे 1235 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदीची घोषणा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.






























































