सावली बार कदमच चालवत होते, अंजली दमानियांकडून पाहणीनंतर पोलखोल

कांदिवली येथील सावली बार गृहराज्य मंत्री योगेश कदम कुटुंबीयांनी पुणाला चालवायला दिला नव्हता तर ते स्वतःच चालवत होते. या ठिकाणी ऑर्केस्ट्रा नाही तर बारबाला नाचवल्या जायच्या, अशी पोलखोल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज केली. बायका नाचवणाऱया गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

दमानिया यांनी सावली बारची पाहणी केली. यानंतर त्या माध्यमांशी बोलल्या. गृह राज्यमंत्री यांचा डान्स बार आणि परवाना आईच्या नावे आहे. जी माहिती आणि एफआयआर आहे त्यात स्पष्ट गोष्टी लिहिल्या आहेत. पोलिसांचे पाच जणांचे पथक पाठवण्यात आले होते. एकजण वरून व्हिडीओ काढत होता. इशारा केल्यानंतर 11 वाजून 10 मिनिटांनी धाड टाकण्यात आली होती. 22 महिला सापडल्या होत्या, अशी माहिती यावेळी दमानिया यांनी दिली. स्टेजच्या खाली महिला ग्राहकांसह बसलेल्या होत्या. हे सर्व एफआयआरमध्ये असल्याचे त्या म्हणाल्या.

‘नियम, कायदे फक्त सामान्य जनतेसाठी असतात. जबाबदार मंत्र्यांकडून परवाना आईच्या नावे असताना तो बदलून घेणे गरजेचे होते. तसे त्यांनी केले नाही. काही चुकीचे केले नव्हते तर बोर्ड झाकण्याची वेळ का आली?,’ अशी विचारणाही दमानिया यांनी केली.