
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या मौन आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी राज्याच्या विविध भागांतील कार्यकर्त्यांसह वारकऱ्यांनी राळेगणसिद्धीस भेट दिली. वारकऱ्यांनी भजन करून हजारे यांच्या आंदोलनाला पाठींबा व्यक्त केला. देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. आरोपींना शिक्षा होईपर्यंत वेळेचा अपव्यय होतो. या आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी हजारे यांची मागणी आहे. या मागणीसाठी त्यांची राळेगणसिद्धीच्या संत यादवबाबा मंदीरात मौन व्रत धारण करून सरकारचे लक्ष वेधले आहे.
आंदोलनास पाठींबा देणाऱ्या कार्यकर्त्यांना हजारे भेटत आहेत. त्यांच्या भूमिका जाणून घेत आहेत. हजारे कागदावर संदेश लिहून त्यांना मार्गदर्शनही करीत आहे. आंदोलनादरम्यान हजारे यांच्या दिनचर्येमध्ये फारसा फरक झालेला नाही. यादवबाबात मंदीरातील खोलीमध्ये मौनादरम्यान ते वाचन मनन करीत असून भेटीसाठी कार्यकर्ते आल्यानंतर खोलीबाहेर येत लिखीत संदेश त्यांना देत आहेत. रविवारी जळगाव, चाळीसगाव येथून आलेल्या कार्यकर्त्यांनी हजारे यांची भेट घेउन पाठींबा दर्शविला. एकादशी असल्याने पिंपळनेर येथे येणाऱ्या वारकऱ्यांनी परतताना आठवणीने हजारे यांची भेट घेत पाठींबा व्यक्त केला. रात्री पिंपळनेर व राळेगणसिद्धी येथील वारकऱ्यांनी राळेगणसिद्धीत भजन करून पाठींबा दर्शविला.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन, महिलांवरील अत्याचारारप्रकरणी न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची तात्काळ सुनावणी करून दोषींना शिक्षा द्यावी अशी हजारे यांची मागणी आहे. महिलांवर होत असलेले अत्याचार, त्यानंतर आरोपींना शिक्षा देण्यात होत असलेला विलंब यामुळे आपण व्यथीत असून आत्मक्लेश म्हणून आपण मौनव्रत आंदोलन करीत आहोत. पिडीत महिलांना न्याय मिळाला पाहिजे अशी आपली मागणी असल्याचे हजारे यांनी लिखीत संदेशाद्वारे स्पष्ट केले. मात्र, हजारेंने आत्मक्लेशासाठी सुरू केलेल्या या आंदोलनात ग्रामस्थांसह राज्यभरातील नागरीक राळेगणसिद्धीत येऊन पाठींबा व्यक्त करीत आहेत.


























































