आजोळ पाणीदार करण्यासाठी अण्णा हजारेंकडून एक महिन्याचे निवृत्तीवेतन दान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर तालुक्यातील निंबळक – इसळक या गावांच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी  दुष्काळ मुक्तीयज्ञास आज आरंभ झाला. निंबळक येथील तलावाजवळ ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे हिवरेबाजार प्रकल्पाचे प्रवर्तक पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते नारळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आपले आजोळ असलेल्या निंबळक आणि इसळक गावांच्या पंचक्रोशीला पाणीदार करण्यासाठी पहिली मदत म्हणून आपले एक महिन्यांचे निवृत्तीवेतन १५ हजार रुपये अण्णांनी दिले. नगर तालुक्यातील निंबळक – इसळक या गावांच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी  दुष्काळ मुक्तीयज्ञास आज आरंभ झाला. स्नेहालय आणि अनामप्रेम या संस्थांनी या कामी पुढाकार घेतला. देहरे , विळद, वडगाव गुप्ता, अशा सखल भागातील गावांनाही या जलसंधारणाचा नैसर्गिक परिस्थितीमुळे लाभ होणार आहे.

यावेळी अण्णा म्हणाले की, “बऱ्याच उशिराने का होईना, परंतु लोकांना आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी आपणच रक्त आणि घाम गाळायचा आहे, याची जाणीव झालेली आहे. जाती-धर्म- राजकीय पक्षांचे भेदाभेद गाडून,  जी गावे एकजुटीने पाणी, शेती, माती आणि संस्कृती यांचे संवर्धन करतील त्यांनाच भविष्य राहील. पाणी ही संपूर्ण देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचा समान अधिकार सर्व नागरिकांना मिळाला पाहिजे तसेच पाण्याचा वापर करण्याबाबत तारतम्य आणि काटकसर अनुसरण्याची भविष्यात गरज आहे.अन्यथा पाणीदार गावे पुन्हा दुष्काळी होण्याचा धोका आहे, असेही अण्णांनी यावेळी नमूद केले.

कौस्तुभ विकास आमटे यांचे आनंदवन प्रगती सहयोग अभियान, भारतीय जैन संघटना आणि आमिर खान यांचे पाणी फाउंडेशन यांनी महाराष्ट्रातील जनसामान्यात जल क्रांतीची प्रेरणा रुजवून मोठे ऐतिहासिक कार्य केले आहे, असेही अण्णांनी नमूद केले.

संपूर्ण महाराष्ट्रातून येथे श्रमदानासाठी येणाऱ्या युवा कार्यकर्त्यांची निवास आणि भोजनाची सुविधा स्नेहालय संस्थेत करण्यात आली आहे.या उपक्रमास आर्थिक सहयोग देण्याची किंवा श्रमदानाची इच्छा असलेल्यां निंबळक आणि इसळक येथील नागरिकांनी योगेश गेरंगे यांच्याशी 9404977723 या क्रमांकावर तर  बाहेरील नागरिकांनी सुनील मोरे यांच्याशी 9011001138 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.