
सामना ऑनलाईन । पारनेर
देशाच्या लोकपालपदासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. सी. घोष यांचे नाव निश्चित झाल्यानंतर समाधान व्यक्त करीत पद्मश्री, पद्मभूषण तसेच देशविदेशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाले, त्यापेक्षाही अधिक आनंद आपणास झाल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली.
हजारे म्हणाले, गेल्या नऊ वर्षांपासून देशातील जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलने केल्यामुळे सरकारला हा कायदा करावा लागला व लोकपालची नियुक्ती करावी लागली. न्यायव्यवस्था ही देशाची सर्वोच्च व्यवस्था आहे. न्यायालयाने सरकारला अनेकदा फटकारल्यानंतर सरकारला लोकपाल नियुक्तीचा निर्णय घ्यावा लागला. जनतेमध्ये, न्यायव्यवस्थेत किती ताकद आहे याचा अनुभव देशातील जनतेने आज घेतला आहे. लोकपाल नियुक्तीच्या निर्णयामुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. देश, समाजाच्या हितासाठी न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून असे अनेक कायदे लागू करता येतील.
लोकपाल नियुक्ती हा आपला विजय आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, सन 2011 मध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशातील जनतेने लोकपालच्या नियुक्तीसाठी मोठे आंदोलन केले. केवळ शहरातच नव्हे, तर लहानमोठय़ा खेडय़ांमध्येही आंदोलने झाली. देशातील जनता रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारला झुकावे लागले व कायदा करावा लागला. जनतेची शक्ती व न्यायव्यवस्थेचा हा विजय आहे. पद्मश्री, द्मभूषणबरोबरच देशविदेशातील अनेक सर्वोच्च पुरस्कार मला मिळाले. त्यावेळी झाला नव्हता इतका आनंद आज झाला आहे. देश व समाजहितासाठी टाकलेले हे मोठे पाऊल असल्याचेही हजारे म्हणाले.
माझा लढा प्रवृत्तीविरोधात!
मोदी सरकारने कलम 44 रद्द करणे योग्य नव्हते. भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने हे कलम अत्यंत महत्त्वाचे होते. सरकारी अधिकारी, जनप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत. त्यांच्यासह पत्नी, मुले यांच्या नावावरील संपत्ती त्यांनी प्रतिवर्षी घोषित करणे या कलमामध्ये बंधन घालण्यात आले होते. मात्र, हे कलम हटविण्यात आल्याने बेनामी संपत्तीचा मार्ग खुला झाला आहे, मात्र 2013 मध्ये तयार करण्यात आलेला कायदा मात्र आजही मजबूत आहे. लोकपालची नियुक्ती झाल्याने आता अधिकारी, जनसेवक यांना त्याची भीती असेल. भ्रष्टाचाराला ब्रेक लागेल. लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती झाल्यानंतर हा कायदा काय आहे हे जनतेला समजण्यासाठी देशातील प्रत्येक भाषेमध्ये पत्रके तयार करून त्याचे वितरण आपण करणार असल्याचे हजारे म्हणाले. माझा लढा सरकारविरोधात नाही प्रवृत्ती विरोधात असल्याचे ते म्हणाले.
























































