जवानांवर दगडफेक करण्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य हवे का? अनुपम खेर यांचा नसिरुद्दीन शाह यांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

देशात सध्या कोणीही उठतो आणि जवानांवर दगडफेक करतो, त्यांच्याबाबत अपशब्द वापरतो. हे कमी स्वतंत्र्य आहे का? यापेक्षा आणखी किती स्वातंत्र्य अभिनेता नसिरुद्दीन शाह यांना देशात हवे आहे, असा खडा सवाल आज अभिनेता अनुपम खेर यांनी केला आहे. नसरींना जे म्हणायचे होते ते म्हणाले, पण ते खरे आहे असा त्याचा अर्थ होत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.देशातील वातावरण सध्या दूषित बनले आहे. पोलीस अधिकाऱयाच्या जिवापेक्षा सध्या गाईला जास्त महत्त्व आले आहे. स्वातंत्र्यावर गदा येत आहे. त्यामुळे मुलांना देशाबाहेर ठेवावे असे वाटत असल्याचे मत नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अनुमप खेर यांनी नसिरुद्दीन यांना आणखी किती स्वातंत्र्य हवे, असा सवाल केला. हिंदुस्थानात आज एवढे स्वतंत्र्य आहे की आपल्या सीमेचे रक्षण करणाऱया जवानांवर हात उचलत आहेत. कश्मीरमध्ये त्यांची वाहने अडवून हल्ले केले जात आहेत यापेक्षा आणखी जास्त स्वातंत्र्य हवे का, असा सवाल केला आहे.

नसिरुद्दीनच्या मुलांनी चिंता करण्याची गरज नाही – नक्वी
हिंदुस्थान हा सहिष्णू देश आहे. येथे सर्वजण गुण्यागोविंदाने राहत आहेत. कोणालाही टार्गेट केले जात नाही. ही देशाची परंपरा आहे. त्यामुळे नसिरुद्दीन शाह यांच्या मुलांनी चिंता करू नये, भीतीखाली वावरू नये असे मत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्पष्ट केले आहे.

नसिरुद्दीन शहा यांना फासावर चढवा
नसिरुद्दीन शहा यांच्या वक्तव्याबाबत सपा नेते आझम खान यांना विचारले असता, नसिरुद्दीन यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर बोट ठेवले आहे. त्यांची ही कृती देशद्रोहासारखी आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ फासावर चढवले पाहिजे असे उपरोधिक मत व्यक्त करत त्यांची पाठराखण केली. नसिरुद्दीन शाह मुसलमान आहेत, त्यांनी दाढी ठेवली आहे तसेच देशातील परिस्थितीवर ते बोलत असल्याने ते फाशीच्या शिक्षेसाठी पात्र आहेत, असेही ते म्हणाले. तसेच महिलांवर अत्याचार करणाऱयांचा, ऑसिड टाकणाऱयांचा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव केला पाहिजे, भाजप अध्यक्ष अमित शहांना देशाचे राष्ट्रपती बनवले पाहिजे, अशीही उपरोधिक टोलेबाजी आझम खान यांनी केली.