स्लॅब कोसळल्याने महिला पोलीस कर्मचारी जखमी, औंध पोलीस स्टेशनमधील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

पोलीस ठाण्यातील स्लॅब कोसळून वायरलेस रूममध्ये काम करीत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. अश्विनी साळुंखे (30) असे जखमी महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.

महिला कर्मचारी साळुंखे या सोमवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास वायरलेस रुममध्ये सेवा बजावत होत्या. त्यावेळी अचानक स्लॅबचा सुमारे दीड फुटाचा तुकडा त्यांच्या डोक्यावर, अंगावर पडला. यामध्ये त्यांच्या हाताला व पाठीला मार लागला. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने साळुंखे यांना तत्काळ कराड येथील रुग्णालयात हलवले. दरम्यान, वायरलेस रुममधील टेबल, खुर्च्या व अन्य साहित्याचे नुकसान झाले आहे.

इमारतीचे ऑडिट होणे गरजेचे

औंध पोलीस स्टेशनची ही इमारत फार जुनी आहे. नुकतीच या इमारतीची रंगरंगोटी व परिसराची स्वच्छता केली होती. पण, ही इमारत संस्थानकालीन असल्याने या इमारतीच्या छतास व दुसऱ्या मजल्याच्या कामास बरीच वर्षे झाली आहेत. त्यामुळे औंध पोलीस स्टेशनच्या इमारतीचे ऑडिट करणे गरजेचे बनले आहे.