अखिलेश घरात आणि पक्षातही अपयशी; भाजपने लगावला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलायमसिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपने त्यांचे पक्षात स्वागत केले असून त्यांच्यामुळे पक्षाला बळकटी येणार असल्याचे म्हटले आहे. अपर्णा यांनी भाजपात केल्याने अखिलेश यादव घरात आणि पक्षातही अपयशी ठरल्याचा टोला भाजपने लगावला आहे.

अपर्णा यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्या कार्याने प्रेरीत होत भाजपात प्रवेश केला आहे, असे भाजपने म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होत आहे. मुलायमसिंह यांची सूनच भाजपात प्रवेश करत असल्याने अखिलेश यादव घरात तसेच पक्षातही अपयशी ठरले आहेत, असा टोला भाजपने लगावला आहे. अखिलेश मुख्यमंत्री म्हणूनही उत्तर प्रदेशात अपयशी ठरले होते. त्यांच्या कार्यकाळात कोणतेही ठोस विकासकार्य झाले नाही. त्यांच्या कार्यकाळात राज्याचा विकास थांबला होता. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याचा विकास होत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

भाजपात प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी पक्षाची सदस्यता देत राष्ट्रकार्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने आपण प्रेरीत झालो आहोत. राष्ट्र आपल्यासाठी सर्वप्रथम आहे. आपण राष्ट्राची सेवा करण्यासाठी भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्राची सेवा करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे त्या म्हणाल्या . भाजपने रोजगार, महिला सक्षमीकरण आणि राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. या पक्षाच्या कार्याची प्रेरणा घेत आपणही भाजपच्या माध्यमातून देशाची सेवा करणार आहोत. याआधीही आपण मोदी आणि योगी यांच्या कार्याचे नेहमीच कौतुक केले आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अपर्णा यादव यांना 2017 विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने लखनऊ कँटमधून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. आपल्या पराभवाला परिवारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर यादव यांच्या कुटुंबात आलबेल नसल्याचे दिसून आले होते. मुलायमसिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतीक यादवच्या अपर्णा पत्नी आहेत. अपर्णा यादव यांनी याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. त्यांनी राम मंदिर निर्माणासाठी 11 लाख 11 हजारांची देणगीही दिली होती. तसेच दत्तात्रेय होसबळे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरकार्यवाह झाल्यानंतर अपर्णा यांनी त्यांच्यासोबतच फोटोही शेअर केला होता.

उत्तर प्रदेशात भाजपने मुलायमसिंह यांच्या सुनेलाच पक्षात आणून समाजवादी पक्षाला धक्का दिला आहे. आता अपर्णा यादव भाजपात दाखल झाल्या असून त्यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे. लखनऊ कँट मतदारसंघात रिटा बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी याची प्रबळ दोवदारी असून इतरांचेही या मतदारसंघावर लक्ष आहे. त्यामुळे त्यांना नेमकी कुठल्या मतदारसंघात उमेदवारी मिळणार याची चर्चा आहे. मात्र, त्यांना जास्त पाठबळ नसल्याने त्या भाजपात दाखल झाल्याने पक्षाला किती फायदा होणार किंवा समजावादी पक्षाला किती धक्का बसेल, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.