
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बंद करण्यात आलेले नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बुधवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढला असला तरी मुंबई आणि परिसरातील नागरिकांना अन्नधान्य आणि भाजीपाल्याची कमतरता भासणार नाही. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती आराखडा तयार झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत एपीएमसीमध्ये अन्नधान्य आणि शेतमालाची खरेदी-विक्री सुरू होणार आहे.
राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी येत्या 30 एप्रिलपर्यंत वाढविल्यायानंतर बंद असलेले एपीएमसी मार्केट पुन्हा सुरू करण्यासाठी अतिरिक्त पणन संचालक अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीला संजीव जयस्वाल, कोकण आयुक्त शिवाजीराव दौंड, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण, सहसचिव अविनाश देशपांडे, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, एपीएमसीच्या धान्य मार्केटचे संचालक निलेश वीरा आदी उपस्थित होते. या बैठकीत मार्केट सुरू करण्यासाठी कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एपीएमसी प्रशासनाने मार्केट चालू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
व्यापारी, माथाडी कामगारांच्या बैठका
एपीएमसीमधील धान्य, भाजीपाला आणि कांदा – बटाटा मार्केट सुरू करण्यासाठी संबंधित मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या आणि माथाडी कामगारांच्या बैठका प्रशासन घेत आहे. त्यांना सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. बुधारपासून मार्केट सुरू करण्याची सर्व तयारी प्रशासनाने केली आहे, असे एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले.

























































