
>> स्पायडरमॅन
बेरोजगारी ही खरे तर जागतिक समस्या आहे. मात्र हिंदुस्थानसारख्या देशात त्याच्या झळा जरा जास्तीच तीव्रतेने लागत असतात. इंटरनेटच्या आगमनानंतर नोकरी शोधण्यासाठी इंटरनेटच्या मदतीने अनेक पर्याय उपलब्ध झाले. नौकरी डॉट कॉम, जॉब्ससारखी नोकरी शोधण्यासाठी सहज पर्याय उपलब्ध करून देणारी व्यासपीठे लोकप्रिय होत असतानाच लिंक्डिनसारखी पोर्टल नोकरीबरोबरच स्किल डेव्हलपमेंट अर्थात कौशल्य विकासाच्या संधीदेखील उपलब्ध करून द्यायला लागली आहेत.
मात्र एका ठरावीक वर्गालाच याचा जास्तीत जास्त फायदा मिळतो आहे याकडे दुर्लक्ष करता येत नाही. मजूर, एकल व्यावसायिक जसे की प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतारकामात तरबेज अशा अनेकांना डोळ्यांसमोर ठेवून त्यांना वाव देऊ शकेल असे फारच कमी पर्याय ऑनलाइन उपलब्ध आहेत. कोरोनाच्या तडाख्याने अनेकांच्या रोजगारावर सध्या गदा आलेली आहे. मात्र याच कोरोनाने सध्या तुम्ही ज्या कार्यक्षेत्रात काम करत आहात, त्याच्या जोडीला इतरही कौशल्ये आत्मसात करणे किती गरजेचे आहे अथवा आपल्या कार्यक्षेत्रातच अजूनही शिकण्यासारखे बरेच काही याची जाणीव बऱयाच लोकांना करून दिली आहे.
या सर्वांचाच विचार करून हिंदुस्थानच्या सर्वात मोठय़ा प्रोफेशनल नेटवार्ंकग अॅप ‘अपना’ने नॅशनक स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनबरोबर (एनएसडीसी) हातमिळवणी केली आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून मजूर व एकल व्यावसायिकांसाठी विशेष संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याच जोडीला आपल्या कार्यक्षेत्रात कौशल्य विकासासाठीदेखील त्यांना मदत केली जाणार आहे. यामुळे आपल्याच रहिवासी भागात कार्यक्षेत्र वाढवणे त्यांना शक्य होणार आहे. यासाठी त्यांना विशेष प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे त्यांना देशातील इतरही अनेक समूहांशी स्वतःला जोडणे शक्य होणार आहे. यातूनच बदलत चाललेले तंत्रज्ञान, व्यवसायातील नव्या संधी, भविष्यातील वाटचाल यासंदर्भात माहितीदेखील सहजपणे मिळवता येणार आहे.






























































