स्त्रियांनो, या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका, हिरानंदानी रुग्णालयाच्या डॉ. सुजाता चक्रवर्ती यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्त्रिया सदैव कामात गुंतलेल्या असतात. स्त्रियांच्या एकाच वेळी विविध प्रकारची कामं करण्याच्या कौशल्याचं सगळ्यांनाच कौतुक असतं. घर, कुटुंब, ऑफिस या सगळ्यासोबत असंख्य गोष्टींची त्या एकाचवेळी काळजी घेत असतात, मात्र यामुळे काही वेळा तब्येतीकडे दुर्लक्ष होऊ शकते. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022च्या औचित्याने चला आपण सा-याच जणी आपल्या तब्येतीकडे थोडे अधिक लक्ष देण्याची शपथ घेऊया, म्हणजे शरीराने दिलेल्या धोक्याच्या सूचनांकडे आपले दुर्लक्ष होणार नाही.

काही महिलांना कष्टाची कामे केल्यानंतर धाप लागल्यासारखे वाटते. हृदयाच्या स्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्यास अशी धाप लागू शकते. महिलांना ‘सायलन्स हार्ट अॅटॅक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समस्येचा धोका अधिक असतो. या दुखण्यामध्ये छातीत वेदना होत नाहीत, तर श्वास न पुरणे, प्रचंड थकवा ही या आजाराची अधिक सर्रास दिसून येणारी लक्षणे आहेत. याखेरीज अॅनिमिया किंवा फुफ्फुसांचा आजार हीसुद्धा धाप लागण्यामागची कारणे असू शकतात. शिवाय छातीत वेदना होणे, हृदयाचे ठोके जलद पडणे, बाहू, खांदे किंवा जबडा यात वेदना होणे किंवा धाप लागणे हे हृदयविकाराचे कारण असू शकते.

हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या धमन्या स्पॉन्टिनिअस डिसेक्शन (Spontaneous dissection) हा एक दुर्मिळ आजार आहे, या आजाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे. यामध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीला आपोआप छेद जातो. यामध्ये अचानक थकवा येणे, अवयव किंवा चेहऱ्यामध्ये अचानक शक्ती नसल्यासारखे वाटणे हे स्ट्रोकचे लक्षण असू शकते. अचानक मेंदूमध्ये गोंधळ होणे, जीभ लुळी पडणे, दृष्टी धूसर होणे आणि चालण्यास कष्ट होणे ही स्ट्रोकची इतर लक्षणे दिसू शकतात. या आजारात पाळीच्या समस्याही उद्भवू शकतात. यामध्ये रक्तस्त्रावाचे प्रमाण, कालावधी, स्त्रवण्याचा वेग, वेदनांचे प्रमाण या गोष्टींकडे स्त्रियांनी गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे काखा आणि मानेजवळची त्वचा काळवंडणे किंवा त्वचेवर अनेक ठिकाणी चामखीळ येणे ही प्रीडायबेटिसची लक्षणे असू शकतात. त्वचेवर जाड थर तयार होणे किंवा पापुद्रे निघणे ही अॅक्टिनिक किंवा सोलर केरॅटोसिससारख्या कॅन्सरपूर्व स्थितीची लक्षणे असू शकतात. त्वचेवरील चामखीळांचा आकार, लहान-मोठेपण किंवा रंग यांच्यात होणा-या बदलांकडे लक्ष ठेवा तसेच एखाद्या नव्या ठिकाणी ती उगवत नाहीत ना हेही पाहणे आवश्यक आहे तसेच स्त्रियांनी स्तनांची तपासणीही वेळोवेळी गरजेचे आहे. शिवाय कामाच्या टेबलावर, गाडीत सतत डुलकी लागत असेल तर ते ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया हा आजाराचे लक्षण असू शकते. या आजारात रात्रभर श्वासोच्छवास सुरू राहतो, बंद होतो किंवा तुम्ही मोठ्याने घोरता. यावर काहीच इलाज न केल्यास त्यातून कार्डिओव्हॅस्क्युलर समस्या किंवा वजनवाढ संभवू शकते. तसेच प्रचंड थकवा, दृष्टीदोष, अतिताण याशिवाय मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीराच्या कोणत्याही वेगळ्या परिणामाकडे दुर्लक्ष न करता तुमच्या डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या.
—