
सामना प्रतिनिधी, लासलगाव
कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक असतानाही लासलगावचे मंडल अधिकारी स्वयंघोषणापत्र स्वीकारले जाईल अशी चुकीची माहिती देत दिशाभूल करीत आहेत, असे निवेदन लासलगाव पत्रकार संघाच्या वतीने निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांना देण्यात आले.
मंडल अधिकारी चंद्रशेखर नगरकर हे कांदा अनुदानाकरिता शेतकऱ्यांची अडवणूक करून मनमानी करत असल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावर बाजू मांडताना नगरकर यांनी प्रतिज्ञापत्र बंधनकारक नसून, कोऱ्या कागदावर स्वयंघोषणापत्र करून दिले तरी शेतकऱ्यांना अनुदान मिळेल, असा खुलासा केला होता.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील जिल्हा निबंधक कार्यालयाने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. तरी चुकीची माहिती देत विनाकारण शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत असल्याबाबत लासलगाव पत्रकार संघाने तहसीलदार दीपक पाटील यांची भेट घेत निवेदन दिले. नागरिकांच्या कर्ज प्रकरणाच्या, खरेदीखत, तसेच वारसाच्या नोंदीसाठी लासलगावचे तलाठी, महसूल मंडल निरीक्षक नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोपही संघाने केला आहे. याबाबत लवकरच लासलगावला भेट देवून नागरिकांच्या तक्रारी व कागदपत्रांची पाहणी करणार असल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. त्याप्रसंगी अध्यक्ष उमेश पारिक, हारून शेख, अरुण खांगळ, शेखर देसाई, राकेश बोरा, नीलेश देसाई, समीर पठाण उपस्थित होते.



























































