गोरेगावातील मोरारजी मिल म्हाडा संकुलातील कार्यकारिणी मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा! शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगाव येथील मोरारजी मिल म्हाडा संकुल बी-1 या गृहनिर्माण संस्थेतील कार्यकारिणी मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या हुकूमशाही आणि मनमानी कार्यपद्धतीमुळे तेथील रहिवासी त्रस्त आहेत. रहिवाशीयांच्या तक्रारीनंतर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच म्हाडाचे सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांची भेट घेतली असून सदर गृहनिर्माण संस्थेच्या कार्यकारिणी मंडळावर तत्काळ कारवाई करावी तसेच उपनिबंधकांच्या सहाय्याने तेथील कार्यकारी मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याबाबत विचार करावा, अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे.

वारेमाप पार्किंग चार्जेस आकारणे, शेअर सर्टिफिकेट देण्यास टाळाटाळ करणे, नियमबाह्य पद्धतीने दंड आकारणे तसेच सभासदांचा पाणीपुरवठा बंद करणे अशा कार्यकारिणी मंडळाच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे रहिवासी त्रस्त आहेत. त्यामुळे न्याय मिळविण्यासाठी येथील शेकडो रहिवाशीयांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत कक्षाच्या पदाधिकाऱयांनी म्हाडाचे सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांची भेट घेतली.

दोषींवर कारवाई होणार

सदर विषयाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संस्थेच्या कार्यकारी मंडळावर योग्य ती कारवाई करून रहिवाशीयांना न्याय देण्यात येईल, असे आश्वासन डॉ. विनोद घोसाळकर यांनी कक्षाच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी अस्थायी समिती सदस्य विजय मालणकर, अशोक शेंडे, निखिल सावंत, देविदास माडये, वनिता पटेल तसेच नियोजित कक्ष पदाधिकारी संजय पावले, प्रतीक्षा मांजरेकर व गृहनिर्माण संस्थेतील तक्रारदार उपस्थित होते.