दर्या उफाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मरीन ड्राइव्ह येथे उसळणाऱया अजस्र लाटा अंगावर घेण्याच्या नादात दोन तरुण बुडाल्याची घटना घडल्याला 24 तासही उलटले नाहीत तोच पुन्हा या लाटा अंगावर घेण्यासाठी मरीन ड्राइव्हचा किनारा गर्दीने तुडुंब भरला. एकीकडे समुद्राला आलेली भरती, चार मीटरपर्यंत उसळणाऱया लाटा आणि दुसरीकडे जीवावर उदार होत बेभान झालेली तरुणाई असेच चित्र मरीन ड्राइव्हसह गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव, दादर, जुहू येथील चौपाटय़ांवर पाहायला मिळाले.

मरीन ड्राइव्हचा समुद्र किनारा, क्विन्स नेकलेस हा मोहात पाडतोच. एरव्हीही सायंकाळच्या सुमारास या किनाऱयावर उसळणारी गर्दी मोठी असते. मागील वर्षी याच किनाऱयावर उसळणाऱया लाटांसोबत सेल्फी घेण्याच्या नादात एक तरुणी वाहून गेली. यावर्षीही अशीच घटना घडून दोन तरुण लाटांसोबत समुद्रात खेचले गेले. त्यामुळे सकाळपासूनच मरीन ड्राइव्ह पोलिसांनी या किनाऱयावर कडक बंदोबस्त ठेवत. येथील कठडय़ावर उभ्या राहणाऱया तरुण-तरुणींना खाली उतरवण्यास सुरुवात केली. पण काहीही करून या लाटांचं थ्रिल अनुभवायचंच असा चंग बांधलेल्या या तरुणाईपुढे पोलिसांनीही हात टेकले. कुणी प्रेयसीला त्या कठडय़ावर उभा करून फोटो घेत होता. तर कुणी स्वतः मित्र-मैत्रिणींसोबत सेल्फी घेत होता. खाली उतरून काय करायचं ते करा, इतकं पोलिसांनी समजावल्यानंतरही त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जात होते.

कचराही अंगावर घेतला!
भरतीबरोबर मोठय़ा प्रमाणावर समुद्रात टाकला जाणारा कचराही किनाऱयावर येत असतो. चार मीटरपर्यंत उसळणाऱया लाटा सोबत कचरा घेऊन किनाऱयावर धडकत होत्या. यामुळे मरीन ड्राइव्ह असो की अन्य चौपाटय़ा या ठिकाणी कचराच कचरा झाला होता. महापालिकेकडून तत्काळ हा कचरा साफ केला जात होता, मात्र लाटा अंगावर झेलण्यासोबत तरुणाईकडून हा कचराही अंगावर घेतला जात होता.