मन करा रे प्रसन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अर्चना रायरीकर, आहारतज्ञ

जगभरात 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा झाला. मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य यांचा खूप जवळचा असा संबंध आहे.

बरेचदा आपण असं बघतो की, अथक प्रयत्नांनंतरदेखील लोक आपल्या आरोग्याबाबतीतले ध्येय किंवा उद्देश गाठू शकत नाहीत. जास्त करून हा फंडा ज्याला वजन कमी करण्याची इच्छा आहे, त्याच्याबाबत लागू पडतो. कितीही चांगलं पोषक डाएट दिलं, तरीही तेदेखील लोक पूर्णपणे पाळू शकत नाहीत. अधूनमधून हे डाएट मोडतं! याचाच अर्थ मनावरचा ताबा राहत नाही. विशेषकरून ताण-तणाव असेल तर ताणामुळे खूप गोड खाणं किंवा खूप खारट पदार्थ जसे की, चिप्स खाणे हे खूप लोकांच्या बाबतीत घडतं. परंतु हे तात्पुरते बरे वाटणे असते आणि शरीरावर मात्र याचा घातक परिणाम होत असतो.
बरेच लोक विविधता ताणतणावातून जात असतात आणि अशा वेळेस कोर्टिसोल नावाचे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये तयार होत असते. खरे तर हे आपल्या शरीराचे नैसर्गिक असे तणावापासून बचाव करण्याचे शस्त्र आहे. कामाचे छोटे छोटे ताण आपल्या मागे असतात. त्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स तयार होत असतात. ते जेव्हा काम करते तेव्हा बाकीचे हार्मोन्स आपले काम नीट करू शकत नाहीत.

इतर हार्मोन्स नीट काम करत नसल्यामुळे नीट झोप न लागणे, पचनशक्ती मंदावणे असे विविध परिणाम आरोग्यावर त्याचे होऊ लागतात. यामुळे मग मधुमेह, लठ्ठपणा, ब्लड प्रेशर असे विकार वाढू लागतात.
आपण ऐकतो की, एखाद्याचा अचानक हृदयविकाराने मृत्यू झाला. हे कधी कधी खूप जास्त दिवस ज्याला ताणतणाव आहे आणि त्यामुळे शरीरावर जे नकारात्मक परिणाम झालेले आहेत त्यामुळे असू शकते. त्यामुळे चांगले आरोग्य हवे असेल तर पहिल्यांदा आपल्या ताणतणावाच्या व्यवस्थापनावर काम करणे फार गरजेचे आहे.

स्ट्रेस हार्मोन्स कमी करण्यासाठी…
1. एकतर वेळेवर उठणे, वेळेवर जेवणे, रात्री लवकर जेवण करणे… या गोष्टींमुळे आपल्या हार्मोन्सवर आपले नियंत्रण येणे हे शक्य होते. त्यामुळे झोपही चांगली लागते. एका अभ्यासावरून असे लक्षात आले की, जे लोक संध्याकाळी सहा वाजता जेवतात आणि त्यानंतर तीन तासांनी म्हणजे नऊ वाजता झोपतात, त्यांचे स्ट्रेस हार्मोन्स हे इतर लोकांपेक्षा खूप कमी आहेत.

2. दुसरा म्हणजे ध्यानधारणा करणे. ध्यान केल्यानंतर आपले स्ट्रेस हार्मोन्स कमी व्हायला मदत होते आणि शरीरातील न्युरो ट्रान्समीटरदेखील चांगल्या पद्धतीने काम करायला लागतात. ध्यानधारणेने खूप चांगल्या पद्धतीने वजन कमी होऊ शकते, मधुमेह, हृदयविकार असे धोके कमी होतात आणि आपली वयोमर्यादा वाढायलादेखील मदत होते.

3. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल सद्भावना व्यक्त करणे. यामुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढायला मदत होते.