
मालवणमधील स्कुबा डायव्हिंग म्हणजे पर्यटकांचे आकर्षण. आतापर्यंत दिवसाच्या उजेडात स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घेता येत होता. यापुढे रात्रीच्या वेळीही पर्यटकांना समुद्रतळाची सफर करता येणार आहे. त्यासाठी ‘आरमार’ ही अत्याधुनिक स्कुबा डायव्हिंग बोट तारकर्ली येथे आज दाखल झाली. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तिचे लोकार्पण करण्यात आले. मालवण येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या इंडियन इन्स्टिय़ूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटिक स्पोर्टस्च्या (इसदा) ताफ्यात दाखल झालेली ही ‘आरमार’ बोट देशातील अशी पहिलीच बोट आहे.
सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीवर जैवविविधतेचा खजिना असलेल्या निवति रॉक आणि परिसरातील समुद्रीतळाची सफर या बोटीच्या माध्यमातून पर्यटकांना घडणार आहे. रडार, इलेक्ट्रॉनिक नेव्हिगेशन, सोनार अशी यंत्रणा या बोटीत आहे. तारकर्ली-देवबाग येथील स्कुबा डायिंव्हग सेंटरमधील उपलब्ध यंत्रणेचीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी पाहणी केली.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, पर्यावरण सचिव मनीषा म्हैसकर, एमटीडीसी संचालक जयश्री भोज, जिल्हाधिकारी के. मंजुलक्षमी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, संदेश पारकर यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी कार्यकर्त्या आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध असेल तिथे प्रकल्प होणार नाही
आदित्य ठाकरे यांनी यावेळी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘नाणारला स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध होता. रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत. इथे इंडस्ट्री आली पाहिजे. मात्र कुठे प्रदूषण होत असेल आणि स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध असेल तिथे प्रकल्प होणार नाही. नाणार प्रकल्प कुठे नेता येईल याची चाचपणी करून पुढे जात आहोत. त्याबाबतची चर्चा सुरु आहे.’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
कोकणातील ‘कृषी पर्यटन’ ग्लोबल मॅपवर आणणार
कोकणातील कृषी पर्यटन जागतिक नकाशावर आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून हिरव्यागार कोकणचा निसर्ग आहे तसाच ठेवून पर्यटन विकासाला गती देऊ, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगारही वाढतील. त्याचप्रमाणे समुद्रकिनारे आणि मंदिरांच्या विकासालाही सरकार प्राधान्य देत आहे असे ते म्हणाले. त्या-त्या जिह्याला पटेल आणि शोभेल असे पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
























































