‘होका’ला धोका?

213

होकायंत्र किंवा मरीनर्स कंपास आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. माझ्याकडे पेपरवेट म्हणून एक छानसं होकायंत्रच ठेवलंय. त्यातल्या सुईचं लाल टोक उत्तर ध्रुवाकडे आपोआप जातं आणि त्यामुळे उत्तर दिशा समजते. इसवी सनापूर्वी ग्रीक संशोधकांनी याचा शोध लावला. त्यांनी मॉतेशिया नावाच्या भागात सापडणाऱया आणि म्हणून ‘मॅग्नेट’ म्हटल्या जाणाऱया नैसर्गिक लोहचुंबकाची सळई बनवून ती लाकडाच्या खाचेत बसवली. ती लाकडाची पट्टी पाण्यात तरंगत ठेवल्यावर एक टोक विशिष्ट दिशेला दाखवू लागली. त्यावरून उत्तर-दक्षिण दिशा ओळखणं सोपं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यातून पुढे जहाजांना दिशादर्शक ठरलेल्या ‘मरीनर्स कंपास’चा म्हणजे सागरी प्रवासाला उपयुक्त ठरणाऱया ‘होकायंत्रा’चा वापर सुरू झाला. कित्येक वर्षे या यंत्राने बोटींना उत्तर-दक्षिण दिशा दाखवल्या.

पृथ्वीच्या गाभ्यात लोह आणि निकेल धातूंचा तप्त रस आहे. त्याच्या पृष्ठभागावर होणाऱया वादळी हालचालींमुळे या चुंबकीय ध्रुवांमध्ये वेगाने बदल होत आहे. तप्त लोहरसाने निर्माण केलेल्या विद्युतक्षेत्राच्या परिणामातून पृथ्वीला चुंबकीय ध्रुव लाभले आहेत. एकेकाळी पृथ्वीचा ध्रुवताऱयासापेक्ष असणारा ध्रुव म्हणजे पृथ्वीच्या अक्षाचा ध्रुव आणि चुंबकीय धुव एकच होते. चुंबकीय उत्तर ध्रुव सरकत असल्याची माहिती संशोधकांना होतीच, परंतु तो इतक्या वेगाने सरकत असेल याची कल्पना नव्हती. चुंबकीय उत्तर ध्रुव दरवर्षी 15 ते 55 अशा कमी-जास्त वेगाने सरकत असून कालांतराने पृथ्वीच्या उत्तर-दक्षिण चुंबकीय ध्रुवांची दिशा पूर्णपणे बदलणार आहे. हा बदल पूर्णत्वाला गेला की, पुन्हा पृथ्वीचा भौगोलिक आणि चुंबकीय ध्रुव समान होतील आणि ‘होका’ यंत्राचा वापर अचूक ठरेल. परंतु सध्या मात्र चुंबकीय ध्रुव-चलन ‘होका’ यंत्राला ‘धोका’ देऊ शकतं. 2017 मध्ये कॅनडाच्या आर्क्टिक भागात असलेला पृथ्वीचा चुंबकीय उत्तर ध्रुव 55 किलोमीटरनी रशियातील सायबेरियाकडे सरकला आहे. याचा परिणाम फोनमधल्या ‘कंपास’वर आणि काही इलेक्ट्रॉनिक गोष्टींवर होऊ शकतो का आणि झाला तर त्यावरचे उपाय यावर विचार सुरू असेलच. अर्थात आता जीपीएस सिस्टम सर्वत्र वापरली जात असल्याने जुन-पुराणे होकायंत्र वापरण्याचा प्रश्न येत नाही. जगात कोणत्याही वाहनाने फिरताना अचूक दिशा समजतेच.

पूर्वी मात्र दूरवर चालत प्रवास करणाऱया हय़ूएन त्संगसारख्या प्रवाशाला आणि त्यापेक्षाही जास्त दर्यावर्दी लोकांना रात्रीच्या वेळी दिशादर्शक ताऱयाची गरज भासायची. म्हणूनच जगातल्या सर्व संस्कृतींना अढळपद लाभलेला ध्रुवतारा ठाऊक होता. पृथ्वीचा भौगोलिक अक्ष ज्याकडे रोखला आहे तो ध्रुव तारा आपल्या महाराष्ट्रातून क्षितिजापासून 19 ते 20 अंशांवर दिसतो. संध्याकाळी दिसू लागलेला ध्रुवतारा रात्रभर तिथेच असतो आणि त्यावरून आपसूकच इतर दिशा कोणत्या ते समजून येतं. उत्तरेकडे दिसणारा ध्रुवताराही कालांतराने बदलतो तो पृथ्वीच्या परांचन गतीमुळे. फिरत्या भोवऱॊयाचं वरचं टोक जसं किंचित डुलताना दिसतं तसा हा प्रकार. मात्र ध्रुवताऱयात बदल व्हायला हजारो वर्षे लागतात. पूर्वी लुबान नावाचा तारा पृथ्वीचा भौगोलिक ध्रुव अचूक दाखवायचा. सध्या दिसतो तो ध्रुवताराही आणखी बारा-तेरा हजार वर्षांनी बदलेल आणि नंतर अभिजीत किंवा ‘व्हेगा’ हा सध्या रात्री आकाशात दिसणारा ठळक तारा ‘धुवतारा’ होईल.

पृथ्वीचा चुंबकीय ध्रुव मात्र वेगाने बदलतो. पृथ्वीच्या निर्मितीनंतर चार अब्ज वर्षांत तो अनेकदा उलटा-पालटा झाला आहे. मात्र गेल्या 7 लाख 80 हजार वर्षांत तो पूर्णपणे बदलला नाही. 1830 पासून ते आतापर्यंत पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचं चलन सुमारे 2000 किलोमीटर झालं आहे. त्यामुळे होकायंत्राला सध्या तरी फारसा धोका नाही. याचा अर्थ होकायंत्र चुकीचा ध्रुव दाखवेल असा नसून प्रवासासाठी आपल्या उपयोगी पडणारा पृथ्वीचा भौगोलिक उत्तर ध्रुव आणि चुंबकीय उत्तर ध्रुव यात फरक पडेल इतकंच.

उद्या समजा सौर वाऱयांसारख्या काही कारणाने जीपीएस, सॅटेलाइटसारख्या यंत्रणा काही काळ थबकल्या तर आकाशदर्शकांना रात्रीच्या प्रवासाचा प्रश्न येणार नाही. कारण त्यांना सप्तर्षी किंवा शर्मिष्ठा (कॅसिओसिआ) या तारकासमूहांवरून ध्रुवतारा नि पर्यायाने उत्तर दिशा सापडेल, पण बाकीच्यांचं काय? त्यासाठीच भूगोलाइतकं नव्हे तर खगोलाचं थोडं तरी ज्ञान हवं. कारण आपला ‘भू’गोल हा विराट ‘ख’गोलाचाच एक सूक्ष्म भाग आहे एवढे लक्षात असू द्यावे.

आपली प्रतिक्रिया द्या