विज्ञान रंजन – 400 वर्षे पावसाविना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>विनायक

पृथ्वीवर सुमारे 75 टक्के पाणी आणि 25 टक्के भूभाग आहे. अर्थात समुद्राच्या तळाशीही जमीनच आहे ही गोष्ट निराळी. परंतु सागरांच्या प्रचंड जलसाठय़ांमुळे आपला ग्रह अवकाशातून निळाशार दिसतो. सूर्यप्रकाशातील नील रंगाचं विकिरण पाणी आणि वातावरणात अधिक प्रमाणावर होत असल्याने आकाश जसं निळं दिसतं तसं समुद्राच्या पाण्यावरच्या प्रकाशाचं तेच होतं आणि जलपृष्ठाखाली काही अंतरावर पोचलेल्या सूर्यकिरणांचं विकिरण होऊन सागर-जल निळं दिसतं.

आता या आपल्या ग्रहावर एवढं पाणी असताना ‘दुष्काळ’ पडण्याची गरजच नाही असं साहजिक वाटेल. परंतु सागराच्या बाबतीत ‘किनारा तुला पामराला’ असल्याने आणि ते पाणी अतिशय खारट असल्याने थेट शेतीसाठी किंवा पिण्यासाठी वापरता येत नाही. अन्यथा समुद्रापासूनच मोठमोठे कालवे काढून दुष्काळ मिटवता आला असता. सागराचं खारं पाणी ‘गोडं’ केल्याविना आपल्याला त्याचा उपयोग नसतो. खाऱ्या पाण्याचा उपयोग फक्त मिठागरांसाठी होतो तोही महत्त्वाचाच आहे.

निसर्गाच्या किमयेने उन्हाळ्यात सागरी पाण्याची जेव्हा वाफ होते तेव्हा नैसर्गिक ‘उर्ध्वपतन’ किंवा खाऱ्या पाण्याचं ‘डिसॅलिनेशन’ करण्याची क्रिया घडते. सूर्याचा प्रखर प्रकाश सागरजलाचं वाफेत रूपांतर करताना त्यातल्या मिठाचं वाफेत रूपांतर होऊ शकत नसल्याने ‘गोड’ पाण्याचे ढग आकाशात तरंगायला लागतात. त्यांना थंडावा लाभला की गोडय़ा पाण्याचा धो धो पाऊस पडतो. प्रदूषण नसलेल्या ठिकाणचं पावसाचं पाणी अतिशय स्वच्छ असतं. तेच पिकांना आणि सर्व जीवसृष्टालाही ‘जीवन’ देतं.

मात्र पाऊस संपूर्ण पृथ्वीवर समप्रमाणात पडत नाही. कुठे महापूर येण्याइतकी अतिवृष्टी होते, तर कुठे पर्जन्यछाया, पावसाची नुसती हुलकावणी देते. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याला ‘मेघकृपे’ची वाट पाहावी लागते.

पृथ्वीवरचं ‘गोडं’ पाणी म्हणजे पावसाने पाडलेलं, बर्फाळ प्रदेशात गोठलेलं, वाहत्या नद्यांमधलं किंवा तळी विहिरी यात साठलेलं. या सगळ्याची गोळाबेरीज पृथ्वीवरच्या एकूण पाण्याच्या केवळ दोन टक्के इतकीच भरते. त्यातही निसर्गानेच केलेली त्याची विषम वाटणी.

यावर्षी आपल्याकडे पाऊस भरपूर झाला. त्यामुळे थंडीसुद्धा मार्चअखेरपर्यंत लांबेल असं वाटत असताना हा लेख लिहीत असतानाच दिवसाचं तापमान पस्तीस अंशावर गेलंय. मुंबईसारख्या शहरात, समुद्रसान्निध्यामुळे आर्द्रता (हय़ुमिडिटी) भरपूर. त्यामुळे लगेच घामाच्या धाराही लागतायत!

उन्हाळ्यात जमीन कोरडी पडायला लागली की, शेतं चिराळतात. पावसानेच ती डिखळं नंतर एकजीव होणार. त्यामुळे उन्हाळ्याची धग सहन करून पावसाची प्रतीक्षा करणं एवढंच आपल्या हाती. कृत्रिम पाऊस वगैरे तंत्र असतात. परंतु ती फारशी प्रभावशाली ठरलेली नाहीत.

ही गोष्ट झाली ती थोडा तरी पाऊस पडत असलेल्या भागांची. पण मग जिथे अजिबात पाऊस पडत नाही तिथे काय? किंवा एखाद्या भूभागावर सुमारे 400 वर्षांत पाऊसच पडला नाही किंवा नसेल तर?

…तसाही एक भाग पृथ्वीवरच आहे. ती अतिशुष्क भूमी आहे अॅटॅकॅमाचं वाळवंट! त्याचं वर्णन पृथ्वीवरचं सर्वात शुष्क वाळवंट असं केलं जातं. चिली देशाच्या उत्तर भागात हे रखरखीत वाळवंट पसरलं असून त्याचं क्षेत्रफळ 1 लाख 5 हजार चौरस किलोमीटर इतपं आहे. त्याला अॅन्डेस पर्वताच्या शुष्क उताराचा भाग जोडला तर ते 1 लाख 28 हजार चौरस किलोमीटर इतपं भरेल.

या ठिकाणचा वार्षिक पाऊस 0.04 ते 0.12 इंच एवढाच ‘पाऊस’ पडतो म्हणण्यापेक्षा मंद फवारा मारल्यासारखं करतो. त्यातही अॅटॅकमा वाळवंटातल्या बऱ्याचशा भागात 1570 ते 1971 या 400 वर्षांत ‘शून्य’ पाऊस झाला! म्हणजे एक थेंबही आकाशातून पडला नाही!

म्हणूनच पृथ्वीवरच्या या सर्वात प्राचीन वाळवंटी प्रदेशाची तुलना मंगळावरच्या शुष्क वातावरणाशी केली जाते. या वाळवंटाचा जो भाग उरुग्वे देशात येतो तिथे व्हायपिंग यानांनी मंगळ-पृष्ठाच्या तपासणीचे जे प्रयोग केले तसेच प्रयोग करून त्याची मंगलपृष्ठाशी तुलना केली. उद्या मंगळावर वस्ती करायची तर ‘अॅटॅकॅमा’ वाळवंटाचा ‘प्रयोगशाळा’ म्हणून चांगलाच उपयोग होणार आहे.

अशा विपरीत अतिउष्ण, शुष्क वाळवंटातही 500 प्रकारच्या खुरटय़ा वनस्पती तग धरून आहेत आणि कठीण कवचाचे घोरपडीसारखे कमी पाण्यावर तग धरणारे जीवही आहेत. मात्र समुद्र जवळच असल्याने, शून्य पावसाच्या प्रदेशातही आदिवासींची चिन्कोरो संस्कृती विकसित झालेली दिसते. विपत्तीवर मात करून जगण्याची माणसाची ‘जीवनेच्छा’ मात्र कधी शुष्क होत नसते हेच खरं.