खाणं आणि बरंच काही – प्रसादाची गोडी

>> आरती देवगावकर

पदार्थाला धार्मिक अधिष्ठान लाभले के त्या वेळी तयार होणाऱया प्रसादाला एक अद्भुत चव लाभत असावी. साधा शिरा असो वा पंचामृत, पण जेव्हा सत्यनारायणाची पूजा करतो, त्या दिवशी तो अधिक चविष्ट लागतो. नैवेद्याच्या स्वयंपाकाला अशी न्यारी चव असते. म्हणूनच त्या प्रसादाची गोडीही वेगळी असते.

नुकत्याच होऊन गेलेल्या होळीच्या वेळी यंदा मी हिमाचल प्रदेशातील एका लहानशा गावात होते. त्या गावातील मुख्य रस्त्यावर एक लहानशी टेकडी व त्यावर लहानसेच मंदिर आहे, जिथे 10-15 पायऱया चढून जाता येते. होळी पौर्णिमेच्या दुसऱया दिवशी या मंदिरापाशी गावातील स्त्र्ाया आणि तरुण मुले जमली. त्यांनी मोठी चूल पेटवली आणि त्यावर मोठय़ा कढईत केशरी शिरा तयार केला. काही जण त्यात गुंतलेले असताना दोघींनी भल्यामोठय़ा परातीत पीठ मळायला सुरुवात केली. तोवर आणखी काही महिला घरातून पोळपाट, लाटणे घेऊन आल्या. मग हसत खेळत, गाणी गात त्यांनी पुऱया लाटायला सुरुवात केली. थोडय़ाच वेळात शिरा-पुरीचा नैवेद्य देवाला दाखवून मग सर्वांना वाटायला सुरुवात झाली. गावातील लोकांसोबतच रस्त्यावरून येणाऱया जाणाऱया पर्यटकांना अगत्याने थांबवून कागदी ताटलीतून प्रसाद दिला जात होता. त्यावरून मला आपल्या कोकणात होणाऱया होळीच्या सणाची आठवण होणे अपरिहार्यच होते. सगळय़ा गावाने एकत्र येऊन काही कृती करणे, तिला धार्मिक अधिष्ठान असणे आणि त्यामुळे त्या वेळी तयार होणाऱया प्रसादाला एक अद्भुत चव लाभणे हा मला वाटते, सार्वत्रिक अनुभव असावा. बघा ना, साधा शिरा, पण आपण जेव्हा सत्यनारायणाची पूजा करतो, त्या दिवशी तो अधिक चविष्ट लागतो. कोणत्याही नैवेद्याच्या स्वयंपाकाची अशी न्यारी चव असते.

हिंदुस्थान हा तसा कितीतरी मोठा देश. त्यात इथे अनेक धर्म, जाती आहेत. प्रत्येक धर्मांचे आपापले दैवत आहे, त्यांचा निश्चित असा पूजाविधी आहे. तिथे निरनिराळय़ा प्रकारचे प्रसाद मिळतात. तिरुपती बालाजी आणि शिर्डी या दोन्ही तीर्थस्थानांबद्दल वेगळे काही सांगण्याची गरजच नसावी. अतिशय श्रद्धेने लोक या ठिकाणी भेटी देत असतात. कापराचा वास असलेले, भरपूर सुक्या मेव्याचा वापर केलेले, साजूक तुपातील मोठे बुंदीचे लाडू (श्रीवारी) ही बालाजीची खासीयत! या प्रसादाचे वैशिष्टय़ म्हणजे, याला ‘जीआय’ मानांकनही प्राप्त झालेले आहे. तसेच, पण आकाराने किंचित लहान लाडू शिर्डीला मिळतात. तिरुपतीला गोविंदस्वामींच्या मंदिरात दिला जाणारा चित्रान्नाचा किंवा दहीभाताचा प्रसाद भाविकाला शांत करतो. मथुरेतील बाळकृष्णाला बेसनाच्या लाडवांबरोबर बटाटय़ाची सुकी भाजी आणि कचोरी आवडते. त्यामुळे त्याचा प्रसाद असतो.

आपल्याला जे आवडते ते देवाला अर्पण करावे हा विचार नैवेद्यामागे असल्याचे आपल्याला दिसून येते. याची आपल्या दृष्टीने मजेशीर वाटणारी काही उदाहरणे दिसतात. यात केरळमधील अलेप्पी येथे भगवान बाल मुरुगन मंदिरात देवाला चक्क चॉकलेटचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याचाच प्रसादही भक्तांना दिला जातो. लहान मुलांनाच काय, मोठय़ांनाही आवडेल असाच हा प्रसाद नाही काय! त्याचप्रमाणे कोलकात्यात टांगरा भागात एक चायनीज कालीमाता मंदिर आहे. तिथे देवीला चायनीज नूडल्स, चॉप सूप, भात आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो.

राजस्थानमधील नाथद्वारा इथे असणाऱया श्रीनाथ मंदिरात माथाडी किंवा थोर नावाचा नैवेद्य दाखवला जातो. तुपात तळून साखरेच्या पाकात मुरलेली ही मिठाई तोंडात टाकताच विरघळते. अगदी तोंडाचे बोळके असणारे लहानगे आणि वृद्ध यांनाही हा प्रसाद सहजी ग्रहण करता येतो. याच राज्यातील करणीमाता मंदिर प्रसिद्ध आहे. इथे दाखवला जाणारा दुधाचा नैवेद्य आधी उंदरांच्या तोंडाला लावून नंतर तो प्रसाद म्हणून वाटला जातो.

शेगावच्या मंदिरात पिठले-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि प्रसादाचे जेवणही तेच मिळते. मध्य प्रदेशातील छतरपूर जिह्यातील हनुमानाचे एक प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे बागेश्वर धाम सरकार. इथे माँ अन्नपूर्णा रसोई आहे. तिच्या माध्यमातून दररोज अनेक भक्तांना जेवण दिले जाते. मंगळवारी 10 हजारांहून अधिक भक्त या प्रसादाचा लाभ घेतात. अशाच प्रकारे अनेक मंदिरांत तसेच गुरुद्वारांमध्ये लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दररोज एक लाखाहून अधिक लोक जेवून उठतात. त्यांच्यासाठी दोन लाख रोटय़ा आणि दीड टनाच्या जवळपास डाळ वापरली जाते. 7 हजार किलो कणीक, 1 हजार 200 किलो तांदूळ, 1 हजार 300 किलो मसूर आणि 500 किलो साजूक तूप रोजच्या स्वयंपाकासाठी लागते. शिर्डी संस्थानात एका वेळी 5 हजार 500 लोक बसून जेवू शकतील एवढा मोठा प्रसाद कक्ष आहे, ज्याला ‘प्रसादालय’ म्हटले जाते. इथेही दररोज एक लाखाहून अधिक लोक जेवतात. उडुपी येथील मंजुनाथ मंदिरात गेल्या 21 पिढय़ा एका कुटुंबाकडे प्रसादाची व्यवस्था आहे. इथे स्वयंपाकात दररोज 70 क्विंटल तांदूळ, 15 क्विंटलच्या आसपास भाज्या आणि 2 हजार नारळ वापरले जातात. इथल्या हॉलमध्ये एका वेळी 2 हजार 500 लोक जेवायला बसू शकतात. ओडिशातील बिमलादेवी मंदिरात 25 हजार लोकांची जेवणाची व्यवस्था होते. इथे दररोज सुमारे 50 हजार लोकांना प्रसाद दिला जातो. इथले वैशिष्टय़ म्हणजे, इथे स्वयंपाक मातीच्या भांडय़ात तयार केला जातो. स्थानिक लोक असे मानतात की, माता लक्ष्मी स्वतः इथे स्वयंपाक करते आणि इतर 700 स्वयंपाकी तिला मदत करतात. इस्कॉनच्या अक्षय पात्र योजनेबद्दल काही लिहिले नाही तर हा लेख अपूर्णच राहील. कर्नाटकातील हुबळी येथील त्यांच्या स्वयंपाकघरातून पाच तासांहूनही कमी वेळात स्वयंचलित यंत्रांच्या मदतीने जवळपास दीड लाख लोकांचे जेवण तयार केले जाते. इथून अनेक शाळांमध्ये मुलांना प्रसाद म्हणून दुपारचे जेवण पुरवले जाते.

अशी अनेक मंदिरे आणि त्यांच्या प्रसादाच्या अनेक परी. काही ठिकाणी मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो, काही ठिकाणी मदिरेचाही. जवळपास सगळीकडे जो नैवेद्य दाखवला जातो, तो प्रसाद म्हणून परत मिळतो, तर राजस्थानातील दौसामधील मेहंदीपूर बालाजी मंदिरासारख्या काही ठिकाणी प्रसाद न घेताच परतायची प्रथा पाळली जाते. शेवटी काय, मनातली श्रद्धा महत्त्वाची. ती असेल तर रोजच्या जेवणालाही प्रसादाचे पावित्र्य प्राप्त होते. हे पावित्र्य जपू या.

(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)

[email protected]