
>> आसावरी जोशी
लडिवाळ… सुंदर… राजस गणपती बाप्पा.. प्रत्येकाचाच आवडता… सुहृद. त्याच्या या निखळ… निर्लेप प्रेमळपणातूनच त्याने त्याच्याशी जोडले गेलेले प्रत्येक नाते तितक्याच जिवापाड जपले… सांभाळले… पाहूया त्याच्या प्रत्येक नात्याचे रेशीमरंग…
अतिशय लडिवाळ स्वभाव… केवळ नजरेनेच प्रत्येकाला आपलेसे करून घेण्याची विलक्षण हातोटी… त्याच्यावर कधी रागावताच येत नाही, कोणालाच… अतिशय शुभंकर तो… केवळ त्याच्या दर्शनानेच संवेदनक्षम मनातील पापबुद्धी नष्ट होते. त्याचे प्रेमळ रूप, वात्सल्याने ओतप्रोत भरलेले डोळे, तुंदिल तनु, गरगरीत पोट, अतिप्रिय मोदक, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, सजग विनोदबुद्धी आणि सगळय़ावर त्याचा अतिशय प्रेमळ स्वभाव. आपल्या भक्तांत सहज मिसळून. एकरूप होण्याची सहज वृत्ती. त्याचा आपल्या घरी ऐसपैस चालणारा दहा दिवसांचा पाहुणचार. या साऱयातून त्याचे प्रत्येकाशी एक सुंदर, अलवार नाते विणले गेले आहे. अगदी रेशमागत. प्रत्येकाशी असलेले नाते तो समरसून जगतो, अनुभवतो. तो कोणालाही दुखावत नाही, पण योग्य त्या गोष्टीच करतो. करवून घेतो. प्रत्येक नात्याशी प्रामाणिक राहतो. त्याचे नाते त्याच्या आईशी, वडिलांशी. भावाशी, निसर्गाशी, समस्त मुक्या, निष्पाप प्राण्यांशी, त्याच्या प्राणप्रिय भक्तांशी. या समस्त सृष्टीशी.
लाडका लेक
विविध चमत्कृतीपूर्ण घटनांमुळे तो जन्मापासून आईचा विशेषच लाडका. मायलेकांनी त्याच्या जन्मापासूनच विज्ञानाचे सामर्थ्य सगळय़ा जगाला दाखवून दिलेले. पौराणिक काळात स्टेमसेल पद्धत वापरून आपल्या बाळाला जन्माला घालणारी आदिमाया ही खऱया अर्थाने विज्ञाननिष्ठ माता आणि त्वचेवरील पेशींनी तिच्या हृदयाशी जोडला गेलेला तिचा बालगणपती. आपल्या आईचा प्रत्येक गुण त्याने शब्दशः घेतला. यातूनच तो 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती झाला. अतीव विज्ञाननिष्ठ झाला. हल्लीच्या भाषेत आपला बाप्पा म्हणजे खऱया अर्थाने ममाज बॉय! पदोपदी तिचे मन जपणारा, तिला सांभाळणारा, तिच्या आवडीनिवडींचा स्वतःइतकाच विचार करणारा. तिच्या हाताचा प्रत्येक पदार्थ त्यातील माया समजून उमजून तितक्याच मायेने, आवडीने खाणारा. सोबत तिच्या तामसी आवडीही हसत हसत जपणारा, म्हणूनच तर त्याच्य ओढीने घरोघरी माहेरवाशीण होऊन ती आपलीही हौसमौज हक्काने आणि मोकळेपणाने पुरवून घेते. लेकही तिचे हे मोकळेपण मनापासून अनुभवत असतो. यातूनच मायलेकांमधील सामंजस्य, निखळ प्रेम, माया, या नात्यातील गोडवा आणि नितळ सच्चेपणा ठसठशीत होत जातो.
शिवशंकराचा मोठेपणा त्याने कायमच जपलेला. वडिलांनी दिलेले रूप त्याने मनापासून स्वीकारले. भोळय़ा शिवाच्या आत्मलिंगाचे रक्षणही याच सजगतेतून आणि परिपक्वतेतून केले. अर्थात आपल्या बुद्धिचातुर्याने. कैलासावरील समस्त गणांचा तो अधिपती झाला आपल्या कर्तृत्वाने.
धाकटेपणा
कार्तिकेय. गणेशाचा मोठा भाऊ. तोही गणेशाप्रमाणेच अयोनिज असल्याचे दाखले मिळतात. पण सर्वांगसुंदर रूप त्याला लाभले. रेखीव, मानवी चेहरा. पिळदार शरीरयष्टी. सारेकाही निर्लेप. कुठेही व्यंगवैगुण्य नाहीच. असे म्हणतात, ही दोन्ही भावंडे प्रकृतीने जरी दोन टोकाची असली तरी अतिशय परस्परपूरक आहेत. गणेश हा सुखसमृद्धीचा, प्रज्ञेचा अधिपती, तर कार्तिकेय हा रक्षणकर्ता. दोघेही एकत्रितपणे या पृथ्वीतलावर परमानंद, सौख्य, साफल्य, समाधान कसे नांदेल याची दक्षता घेतात.
त्याचे सवंगडी
प्राण्यांशी त्याचा फार जवळचा संबंध. त्याचे वाहन उंदीर. महाउपद्रवी, सगळय़ांना नकोसा. पण नकोशाला जवळ करण्यासाठी खूप मोठे धैर्य लागते. प्रवाहाविरुद्ध पोहोण्याची क्षमता असावी लागते. यातूनच त्याने मुषकाला आपलेसे केले. हत्तीशी तर तो जन्मापासूनच जोडलेला. तो म्हणजेच गजराज आणि गजराज बाप्पाचे प्रतिरूप. ऐश्वर्य, समृद्धी, लक्ष्मी सारेकाही त्या ऐरावताच्या ठायी एकवटतात. अगदी कैलासावरील नंदीशीही त्याचे नाते ममतेचे. या साऱया विविध प्राण्यांना तो आपुलकीची, प्रेमाची, सुरक्षिततेची ऊब देतो. कोणीही ज्येष्ठ अथवा कनिष्ठ नाही हे आपल्या कृतीतून सांगत राहतो आणि त्याच्या स्पर्शाने हे सारे प्राणिमात्र समृद्ध तेजाने झळाळून उठतात.
निसर्गाशी बांधिलकी
पर्यावरण त्याचा आत्मा. निसर्गातील प्रत्येक गोष्ट त्याच्या आवडीची. घरोघरी तो मातीचा होऊन येतो. मातीतूनच प्रगटतो. मातीत उमलणाऱया पर्ण-फुलांनी तो सजतो. जास्वंद, दूर्वा त्याच्या आवडीच्या. फळं,भाज्यांनी त्याचे मखर सजते. लालबुंद डाळिंब, मातीशीच नाते सांगणारे उकडीचे गोरेपान मोदक सारेच कसे अगदी त्याच्या मनाजोगे. निसर्गाचा हात तो जराही सोडत नाही. मातीतून अवतरलेला तो समुद्राच्या लाटांवर आरूढ होऊन हिमवानाकडे निघतो. परतीच्या प्रवासातील दहीभाताची शिदोरीही त्याचा साधा राजसपणा अधोरेखित करणारी.
आपला बाप्पा
आपल्या भक्तांच्या प्रत्येक सुखदुःखात तो अगदी मनःपूर्वक गुंतलेला, रमलेला. आपल्या साऱया गोष्टीत त्याला आत्यंतिक रस. या ओढीतूनच तो दरवर्षी आपल्या घरी ऐसपैस दहा दिवस मुक्कामी येतो. आपल्या प्रत्येक गोष्टीत रममाण होतो. आपण जे देऊ ते खातो. नेसवू ते नेसतो. आपली प्रत्येक गोष्ट गोड मानून घेतो.
त्याच्याकडे पाहिले की साधेपणातील गूढ सहज उलगडते. आपल्या श्रांत क्लांत मनावर त्याची मायेची फुंकर खूप महत्त्वाची ठरते.. त्याची लालस ऊर्जा जगण्याचे बळ देते, संघर्ष करण्याची शक्ती देते. तो आपल्याला निसर्गावर, आईवर, प्राणिमात्रांवर प्रेम करायला शिकवतो. किंबहुना सारे जगणेच तो शिकवतो; पण आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्याच सोबतीने विचार करायला हवा. क्षणभर थांबून. त्याच्या निसर्गाची, त्याच्या समुद्राची आपण खरोखर काळजी घेतो? मुक्या, निष्पाप प्राण्यांना जपतो की त्यांचा फक्त वापर करून घेतो? आईवर निखळ माया करतो, तिचा मानस किती जपतो? थोडासा विचार करूया, त्याच्यासमोर बसूनच. हे हृदयीचे ते हृदयी घालून…



























































