
>> अभय मिरजकर
आपल्याकडे अनेक प्रकारचे वृक्ष, वेली आहेत. सर्वांचा काही ना काही तरी उपयोग आहे. वेद काळापासून पूजनीय असणारा व अलौकिक सामर्थ्याचा पवित्र वृक्ष म्हणजे पिंपळ होय. ज्याला आपण बोधीवृक्ष म्हणूनही संबोधतो. याला अक्षयवृक्ष असेही म्हणतात. अनेक रोगांवर रामबाण इलाज म्हणूनही पिंपळ उपयोगी आहे. हा वृक्ष भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर, जेथे जागा मिळेल तेथे वाढतो. पिंपळास अश्वत्थ, बोधीवृक्ष, बोधिद्रुम फायकस रिलिजिओजा…अशी नावे आहेत. वडाच्या कुळातील हा वृक्ष आहे. तसेच मोठा पानझडी वृक्ष असून सर्व धर्मीय याला पवित्र मानतात. मंदिरांमध्ये जाणीवपूर्वक तो लावण्यात येतो. बुद्धिवर्धक वृक्ष आहे. गौतम बुद्धांना याच वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती म्हणून याला बोधीवृक्ष असे संबोधले जाऊ लागले.
पिंपळाची पाने साधी, एकाआड एक, निमुळत्या टोकाची, अंडाकृती, तळाशी काहीशी हृदयाकृती, लांब देठाची व लोंबती असून उपपर्णे अंडाकृती खवल्यासारखी असतात. कोवळेपणी प्रथम पाने तांबूस तपकिरी असतात नंतर ती हिरवी होतात. पक्ष्यांकडून विष्ठेतून पिंपळाचे बी कोठेही नेले जाते, ते रूजून अत्यंत अनपेक्षित ठिकाणी झाडे उगवलेली आढळतात. पिंपळाची उंची 10 ते 15 मीटरपर्यंत वाढते. खोड पांढरट गुलाबी, लाल, गुळगुळीत, तंतुमय असते.
वेद काळापासून हा वृक्ष पूजनीय आहे. प्रथम हा वृक्ष प्रजापतीचे प्रतीक मानले जाई. परंतु नंतर विष्णूचे प्रतीक मानले गेले. भगवान विष्णूचा जन्म या झाडाखाली झाला असे पुराणात लिहिले आहे. या वृक्षाला दैवी महत्त्व आहे किंवा याला ज्ञानी वृक्ष म्हणतात. भगवान श्रीकृष्ण या झाडाखाली बसले असताना व्याधाचा बाण लागून निजधामास गेले असा उल्लेख आहे. भगवद्गीतेतील विभूती योगामध्ये वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे असे भगवंतानी म्हटले आहे. या झाडाचा प्रत्येक भाग औषधी आहे. दिवसा व रात्री दोन्ही वेळा हा वृक्ष हवेत प्राणवायू सोडतो हे याचे खास वैशिष्टय़ आहे. पिंपळाच्या झाडाच्या प्रत्येक भागामध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे या झाडाचा उपयोग विविध आजारांना दूर ठेवण्यासाठी केला जातो.
या झाडाची पाने, साल, देठ, बिया, फळे यांचा औषधी बनवण्यासाठी उपयोग होतो. याचे लाकूड निकृष्ट प्रकारचे आहे त्यामुळे याचा केवळ जू, आगपेटीच्या काडय़ा, पळी, पाळी यासाठी वापर केला जातो. साल कमावण्यासाठी व रंगवण्यासाठी वापरली जात होती. याच्या चिकापासून गोंद बनवला जात होता. अशक्त माणसाने नियमितपणे पिंपळाला प्रदक्षिणा घातल्यास त्याचे आरोग्य सुधारते. कारण त्याला भरपूर शुद्ध हवेचा पुरवठा होतो. लहान मुलांची वाचा सुधारावी किंवा बोलण्यातील तोतरेपणा कमी व्हावा म्हणून या झाडाची पिकलेली फळे खाण्यास देतात. अंगाला खाज, पुरळ, त्वचा काळी होणे अशा विकारांत हा काढा उपयुक्त आहे. कडुलिंबाच्या तेलात या सालीचे चूर्ण मिसळून केलेले मलम त्वचा रोगात बाह्य उपचारासाठी अतिशय गुणकारी आहे. वसंत ऋतूत येणारी ताजी फळे खाल्यास स्मरणशक्ती वाढते. मानसिक श्रम करणाऱया व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना ही फळे गुणकारी आहेत. याची पाने हत्तीला अधिक आवडतात.
आध्यात्मिक दृष्टीने याचे महत्त्व आहे. श्रावण महिन्यात दर शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ असणाऱया मारुतीचे पूजन करतात.तसेच शनिवारी या झाडाला पाणी घालून त्याला प्रदक्षिणा घालणे पवित्र मानले जाते. श्रावण आणि कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीपासून अमावास्येपर्यंत या वृक्षाला पाणी घातल्यास पितर संतुष्ट होतात अशी समजूत आहे. शनिवारी भगवान विष्णू आणि लक्ष्मी या वृक्षावर वास करतात अशीही समजूत आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी या वृक्षाचे पूजन केल्यास संतती आणि संपत्तीचा लाभ होतो. पिंपळाच्या पाच प्रकारच्या पानांचे पूजन केले जाते. हिरवी पाने सौंदर्यासाठी. कोवळी पाने संतती प्राप्तीसाठी. पिकलेली पाने पतीच्या दीर्घआयुष्यासाठी. वाळलेली जाळीदार पाने सुख व समृद्धीसाठी. फाटलेली पाने धन प्राप्तीसाठी.
– [email protected]

























































