रंगभूमी – पाऊस… पाऊस…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभिराम भडकमकर

वास्तववादी शैलीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणं श्रेष्ठ की केवळ शब्द आणि देहबोली यांच्या सहाय्याने रंगभूमीवर तो अनुभव देणं हे अधिक श्रेष्ठ या चर्चेला तसा शेवट नाही. परंतु एक मात्र खरं की, रंगभूमीवरचं नाटक संपतं, पण विरून जात नाही. प्रेक्षकांच्या मनामनात ते साठून राहतं. हेच तर नाटकाचं यश आणि बलस्थान आहे.

दि ल्लीमध्ये मॉस्को आर्ट थिएटर या रशियाच्या अत्यंत सुप्रसिद्ध अशा कंपनीचं नाटक सादर होणार होतं. नाटक अंतोन चेकोव्ह या जगप्रसिद्ध नाटककाराचं होतं. त्यामुळे नाटकाबद्दल उत्सुकता होतीच.

अंतोन चेकोव्ह हा अत्यंत महत्त्वाचा नाटककार रशियन राज्पांतीच्या आधीचा असल्यामुळेच की काय, पण त्याच्या नाटय़कृतीत प्रचाराचा भाग येत नाही. आत्ममग्न व्यक्तिमत्त्व, सामान्यांचं जग, त्यांचे परस्पर संबंध, स्वप्न, महत्त्वाकांक्षा आणि अपयश या सगळ्यातून तो एक विलक्षण नाटय़कृती आकारत जातो. मानवी स्वभावाच्या खोल तळापर्यंत जाणारा नाटककार म्हणून मला तो नेहमीच खूप आवडतो.

अंतोन चेकोव्ह काळ आणि स्थान म्हणजे टाईम आणि स्पेस ओलांडून कायमच काळावर मात करत राहणारा नाटककार आहे असं मला वाटतं. आता अशा चेकोव्हचं नाटक आणि तेही रशियन मंडळी सादर करत आहेत म्हटल्यावर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या पहिल्या वर्षाच्या आम्ही विद्यार्थ्यांनी गर्दी केली नाही तर नवलच नाटक सुरू झालं, नाटकात पावसाच्या संबंधी बोलणे सुरू असतानाच एका क्षणी रंगमंचावर ‘धो धो’ असा खरा पाऊस पडला. चक्क खरा पाऊस. सीन संपला, अंधार झाला. अर्धा-पाव मिनिट अंधार होता. आणि नंतर जेव्हा प्रकाश आला तेव्हा रंगमंचावर पावसाचा मागमूसही नव्हता. पाण्याचा थेंबही नव्हता. आम्ही चकित झालो. नाटक संपल्यानंतर आम्ही आत जायची धडपड केली, पण आम्हाला जाऊ दिले नाही. वास्तववादी शैलीतला हा पाऊस आम्हाला थक्क, अचंबित करून गेला.

ते दिवस उन्हाळ्याचे होते. पुण्याहून दिल्लीला गेलेल्या आमच्यासारख्यांना तर तो उन्हाळा झेपतच नव्हता. त्याच वेळेला आम्ही मोहन राकेश या आधुनिक हिंदुस्थानी रंगभूमीवरच्या सर्वश्रेष्ठ नाटककाराचं ‘आषाढ का एक दिन’ हे नाटक शिकत होतो आणि गंमत म्हणजे त्या नाटकाचं वाचन चालू असायचं तेव्हा वातावरण कुंद झाल्याचा भास व्हायचा. यात मी चमत्कारिक वगैरे काहीच सांगत नाहीये, तर ती त्या शब्दांची ताकद होती. जसं चेकोव्हचं नाटक एका अनाकलनीय अशा उदासीनतेचं मळभ तुमच्या मनात निर्माण करतं तसं.

पुढे कधीतरी ‘आषाढ का एक दिन’चा प्रयोग पाहिला. त्यातही सुरुवातच पावसाने होते, पावसाच्या चर्चेने होते, पावसाळी वातावरणात होते, पण खरोखर पाणी कुठेच पडत नाही आणि तरीही शब्द आणि देहबोली या माध्यमातून आपल्याला पाऊस पडतो आहे असे वाटू लागते. मग साहजिकच चर्चा सुरू झाली की, वास्तववादी शैलीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून पाऊस पडणं हे श्रेष्ठ की केवळ शब्द आणि देहबोली यांच्या सहाय्याने रंगभूमीवर पावसाचा अनुभव देणे हे अधिक श्रेष्ठ? खरं तर या चर्चेला तसा शेवट नाही.जर तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि ते नाटकाच्या प्रभावामध्ये, परिणामकारकतेमध्ये भर टाकणार असेल तर का नाही त्याचा वापर करायचा? असं मानणारा एक गट आणि दुसरा गट कशाला हव्यात या कुबडय़ा? जर शब्द आणि देहबोली रंगभूमीवरची वातावरण निर्मिती या सगळ्याच्या सहाय्याने पाऊस निर्माण करण्याचं आव्हान रंगकर्मी स्वीकारत असतील तर ते अधिक महत्त्वाचं, असं मानणारा एक गट.

रंगभूमीवरच्या अशा वादविवादांना एक ठरावीक शेवट नसतोच, उत्तर नसतंच. आपापला अंत:स्वर, आपापला पिंड समजून नाटक सादर करावं. लोकांपर्यंत पाऊस पोहोचतो की नाही हे महत्त्वाचं.

मी संभ्रमातच पडलो होतो. मला त्या पावसानंही अनुभव दिला होता आणि या नसलेल्या पावसानंही. मला तेही ग्रेट वाटत होतं आणि मला हेही आवडत होतं. पुढे पुढे आपल्याकडेही तंत्रज्ञान विकसित झालं. मग कधी कधी तंत्रज्ञान इतकं गडद झालं की, आशयावर मात करू लागलं. विशेषत ‘मल्टिमीडिया प्ले’नामक शैली आली आणि नाटक कशाला, सिनेमाच दाखवा असे म्हणायची वेळ दिल्लीतील अनेक नाटकांनी आणली.

मराठी नाटकात मात्र दोन नाटके आठवतात, ज्यांनी या शैलीचा चपखल वापर केला. एक विनय आपटे दिग्दर्शित ‘कुसुम मनोहर लेले’ आणि पुरुषोत्तम बेर्डे यांचे ‘जाऊ बाई जोरात’. तंत्रज्ञानाचा आशयाला अडथळा नाही. उलट इथे आशय गडद करायला उपयोग होत होता.

माझ्या ‘याच दिवशी याच वेळी’ या नाटकातही मी असा वापर केला होता. आधी प्रतिमा कुलकर्णी व नंतर कुमार सोहोनी यांनी त्याचे प्रयोग केले.

तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, पण ते नाटकाच्या ‘टीम’चा भाग वाटावे, अडचणींचा पाहुणा होऊन बसू नये असे मला वाटते. मशालीपासून प्रकाश योजनेचे विविध नवे तंत्र जसे चपखल ‘टीम’चा भाग झाले तसे.

एक मात्र खरे, ना चेकोव्हचा पाऊस मनातून जात ना मोहन राकेशांच्या ‘आषाढ…’चा!
रंगभूमीवरचं नाटक संपतं, पण विरून जात नाही. प्रेक्षकांच्या मनामनात ते साठून राहतं.
हेच तर नाटकाचं यशही आणि बलस्थानही!
[email protected]