हॉटेलिंग, मजा… की…?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अदिती लिमये, शेफ

आजपासून उपहारगृह सुरू होत आहेत. प्रदिर्घ कालावधीनंतर हॉटेलिंगची मजा अनुभवता येणार आहे. पण अर्थात राज्य शासनाचे सर्व नियम काटेकोर पाळूनच!

कोरोना संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून उपाहारगृह व्यवसाय संपूर्णतः बंद होता. बंद झालेला हा व्यवसाय पुन्हा कधी सुरू… काहीच सांगता येत नव्हते. यादरम्यान येथील कर्मचारी वर्गाने स्वतःचे पोट भरण्यासाठी, कुटुंबासाठी कामाची वेगळी वाटही धरली. कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, इतर छोटा-मोठा कर्मचारी वर्ग, अस्सल खवय्ये…अशा साऱयांच्याच ऐनवेळच्या भुकेची आग मिटवणारी ही उपाहारगृहे बंद होती. पण आता मात्र या साऱयांनाच दिलासा मिळणार आहे. कारण आजपासून राज्यातील सर्वच उपाहारगृहे नव्या नियमांसह सुरू होत आहेत!

प्रॅक्टिकली विचार करावा!
सरकारच्या नियमानुसार 50 टक्के क्षमतेनुसार आम्ही उपाहारगृहे उघडू शकतो, पण पन्नास टक्के क्षमतेमध्ये त्यांनी दोन टेबलांच्या मध्ये सामाजिक अंतर तीन ते साडेतीन फूट असलं पाहिजे. आज मुंबईतील काही रेस्टॉरंट एवढी छोटी आहेत की साडेतीन फूट अंतर दोन टेबलांच्या मध्ये ठेवावं लागलं तर दहा टक्के क्षमतेनेच आम्हाला उपाहारगृह सुरू करावं लागेल. आम्हालाही विचार करूनच उपाहारगृहे सुरू करावे लागतील. सरकारने स्पा आणि सलून सुरू केले आहेत तर रेस्टॉरंटमध्ये तीन साडेतीन फुटांचं अंतर का?

रेस्टॉरंटचं बुकिंग फोनवरून घ्या किंवा डिलिव्हरीच्या मेन्यूचार्टऐवजी मोबाईलचे ऍप घ्या. असे ऍप जे आधीच हॉस्पिटॅलिटी ग्रुपमध्ये डेव्हलप होत आहेत. फोनवर मेन्युकार्ड मिळेल आणि ऑर्डर देता येईल. म्हणजे वेटर आणि ग्राहकांचा प्रत्यक्ष संपर्क जेवढा कमी करता येईल तेवढं आम्ही बघू. पण आता सांगितलेले नियम प्रॅक्टिकल वाटत नाहीत. कारण लोकांनी नियम तोडणार, असं व्हायला नको. उडिपी आणि छोटय़ा रेस्टॉरंटमध्ये टेबल शेअरिंग असतं. टेबल शेअरिंग करताना सांगितलंय की मध्ये प्लॅस्टिकची शिल्ड घाला. अशा वेळी सर्वात जास्त संसर्ग होऊ शकतो. कारण आपल्या तोंडाची वाफ त्या प्लॅस्टिकच्या शिल्डवर जाते. अशावेळी खूप काळजी घ्यावी लागेल. एक माणूस प्लॅस्टिकचे कव्हर धुवायला प्रत्येक ग्राहक उठल्यानंतर ठेवावा लागेल. टेबल शेअर असेल तर एक जण उठल्यावर त्यावर सॅनिटायझर मारू शकत नाही कारण बाकीचे तीन जण त्याच टेबलावर जेवत असणार.

मास्क घातल्यानंतरही आपण काय बोलतो हे एकमेकांना कळत नाही. ऑर्डरही दोन तीन वेळा विचारून घ्यावी लागते. त्यामुळे अशा छोटय़ा छोटय़ा अडचणी असल्या तरी ग्राहक, मालक आणि उपाहारगृहाचा कर्मचारी वर्ग तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारचं सहकार्य यामुळेच हे शक्य होऊ शकतं.

– मेन्यू कमी केले आहेत. जिथे पन्नास पदार्थ होते तिथे पंचवीस ते तीस करू.
– जसे पदार्थ वाढतील, आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. त्याप्रमाणे स्टाफही वाढवू.
– वेटरसह सर्व स्टाफ मास्क वापरण्यासह सगळ्या नियमांचे पालन करणार आहोत. यातही डिस्पोझेबल वस्तू वापरण्याचा आम्ही विचार करत आहोत. डिस्पोझेबल वापरले तर त्या वस्तू धुवाव्या लागणार नाहीत, मात्र यासाठी ग्राहकांनीही आम्हाला सहकार्य करावे.
– आम्हाला ग्राहकांसह आमच्या सहकाऱयांचीही काळजी घ्यावी लागते.