
>> अॅड. प्रतीक राजूरकर
विद्वत्तेचे क्षितिज ओलांडून आपल्या अचाट बुद्धिमत्तेने सर आयझॅक न्यूटन यांनी विविध शोध लावले. मानवाची बुद्धी किती अमर्याद असू शकते हे न्यूटन यांनी जगाला दाखवून दिले. दृष्टीआड असणाऱया अनेक गुपितांची रहस्ये न्यूटन यांनी उलगडली. गणितज्ञ, शास्त्रज्ञ, राजकारणी या आणि अशा अनेक उपाधींनी न्यूटन जगाला परिचित आहेत. न्यूटन यांनी लावलेले शोध त्यांच्या अफाट बुद्धिमत्ता, चिकाटी व चिकित्सक वृत्तीची प्रचीती देणारे आहेत. सामान्य शेतकरी ते असामान्य शास्त्रज्ञ असा सर आयझॅक न्यूटन यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या विद्यार्थीदशेत न्यूटन यांनी सृष्टीतील अनेक रहस्यांची जगाला करून दिलेली ओळख विस्मयचकित करणारी आहे.
जुलिअन कालगणनेप्रमाणे आयझॅक न्यूटन यांचा जन्म 25 डिसेंबर 1642 साली ग्रँथम इंग्लंड येथे झाला. आयझॅक यांचा जन्म वैद्यकीय शास्त्राप्रमाणे मुदतीपूर्वीच ( Premature Baby) झाल्याची नोंद आहे. आयझॅक यांचे वडील शेतकरी होते, परंतु वडिलांचा मृत्यू आयझॅक यांच्या जन्माच्या काही महिने अगोदर झाला. आयझॅक तीन वर्षांचे असताना त्यांच्या आईने स्मिथ नामक एका श्रीमंत व्यक्तीसमवेत विवाह केला. स्मिथला आपल्या संसारात सावत्र मुल नको होते. त्या कारणास्तव आयझॅकचे बालपण आपल्या आजी-आजोबांच्या सहवासात गेले. लहान वयात मातृत्व असूनही आयझॅकचे बालपण हिरावले गेले. परिणामी आयझॅकला एकटेपण अधिक जवळचे वाटू लागले. एकटेपणात आयझॅकची एकाग्रता प्रचंड वाढली. याच एकाग्रतेतून न्यूटन यांच्या देदीप्यमान कामगिरीने इतिहास निर्माण केला.
1665 साली न्यूटन 23 वर्षांचे असताना इंग्लंडला प्लेगची मोठी साथ आली होती. न्यूटन तेव्हा ट्रिनिटी महाविद्यालय पेंब्रिज येथे विद्यार्थी होते. प्लेगच्या साथीने पेंब्रिज शहर बंद पडले. साहजिकच महाविद्यालयसुद्धा बंद करण्यात आले. न्यूटन आपल्या आजोळी परतले. बाहेर प्लेगचा हाहाकार सुरू असताना न्यूटन मात्र आजोळी विलगीकरणात होते. 1665 ते 1667 जवळ जवळ दोन वर्षे प्लेगने थैमान घातले असताना न्यूटन जगाला आश्चर्यचकित करणारे शोध लावत होते. अर्थात तेव्हा न्यूटन यांना सर ही उपाधी मिळाली नव्हती. याच काळात विलगीकरणात असतांना न्यूटन यांनी आपल्या आयुष्यातील तीन मोठे शोध लावले. न्यूटन यांच्या या शोधात त्यांच्या विलगीकरणाचा निश्चितच काही प्रमाणात वाटा आहे असे म्हणता येईल.
न्यूटन यांना बालपणापासूनच गणित विषयाची प्रचंड आवड होती. 1666 साली न्यूटन यांनी गणित विषयाला हात घातला. फ्रेंच गणितज्ञांनी एका मर्यादेपर्यंत हाताळलेला विषय न्यूटन यांनी हातावेगळा केला. पॅलक्यूलस गणितातील एक शाखा म्हणून आज प्रचलित आहे. विलगीकरणात असताना न्यूटन यांनी यावर शोधनिबंधांची एक शृंखला लिहून काढली, मात्र प्रकाशित केली नाही. गणित विषयाला आपल्या आविष्काराच्या बेरजेने न्यूटन यांनी अधिक उंचीवर नेऊन ठेवले. पुढे 1670 साली जर्मन गणितज्ञ गॉटफ्राइड लेईबनीझने यांनी स्वतः चा पॅलक्यूलसचा नवा शोध प्रकाशित केला. त्यावर दोघांत वाद झाल्याची नोंद आढळते. न्यूटन यांनी आपले अनेक शोध बरेच दिवस प्रकाशित न करण्याची सवय असल्याचे लेखकांनी लिहिले आहे.
विलगीकरणाच्या काळात आपल्या खोलीतील खिडकीत लहानसे छिद्र करून न्यूटनचे नवे प्रयोग सुरू होते. खिडकीतून येणारा प्रकाश भिंगातून न्याहाळत न्यूटन यांनी रंग, प्रकाश वर्णपटाचे सखोल विश्लेषण केले. न्यूटन यांनी वर्णपटाच्या प्रत्येक रंगात गडद व पांढऱया प्रकाशाचे मिश्रण असल्याचा शोध लावला.
आपल्या आजोळी न्यूटन यांना लाभलेला एकांतवास अनुकूल ठरत होता. घराच्या आवारात असलेल्या झाडावरून सफरचंद खाली पडले आणि न्यूटनच्या बुद्धीला अनुरूप असे का झाले? असा साहजिक प्रश्नसुद्धा पडला. झाडावरचे सफरचंद आकाशाकडे का जात नाही? ते खालच्या भागातच का पडते? यासारख्या असंख्य प्रश्नांनी न्यूटन बेचैन झाले. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावत न्यूटन यांनी जगाला कधीच न पडणाऱया प्रश्नांचे उत्तर शोधून काढले होते. एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की समाधान होते, परंतु न्यूटनलाच हा प्रश्न का पडला? या प्रश्नातच न्यूटनच्या अफाट बुद्धीमत्तेची प्रचीती येते. लहान प्रश्नात अनेकदा मोठी उत्तरे दडलेली असतात. अगदी न्यूटन म्हणतात त्याप्रमाणे ‘आपल्याला फक्त एका थेंबाचे ज्ञान आहे, आपल्याला जे माहिती नाही तो महासागर आहे.’ योग्य व्यक्तीला योग्य प्रश्ने पडल्यावर त्यातून सुयोग्य उत्तरे मिळतात.
वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी न्यूटन यांची पेंब्रिज विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. न्यूटन यांच्या वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती अतिशय नगण्य असायची. त्याला कारण न्यूटनची शिकवण्याऐवजी शिकण्याची जिज्ञासा असे म्हणता येईल. 30 वर्षे न्यूटन हे पेंब्रिज विद्यापीठात कार्यरत होते. प्लेगच्या संकटकाळात आलेल्या संधीचे न्यूटन यांनी सोने केले. न्यूटनच्या आयुष्यातील तीन महत्त्वाचे शोध हे प्लेग काळात लागले. आज पुन्हा एकदा कोरोनाच्या साथीने जगभरात थैमान घातले आहे. जगात कुठेतरी या संकटाचे संधीत रूपांतर करणारा न्यूटन भविष्यात समोर येईलच. इतरांनीसुद्धा विषाणू संसर्गाची साखळी तोडून नव्या अविष्कारांची साखळी जोडण्याचे चिंतन करावे. आजच्या परिस्थितीत न्यूटनच्या महान आविष्काराचा हाच गुण उपयुक्त ठरेल.
1665 साली न्यूटन 23 वर्षांचे असताना इंग्लंडला प्लेगची मोठी साथ आली होती. न्यूटन तेव्हा ट्रिनिटी महाविद्यालय पेंब्रिज येथे विद्यार्थी होते. प्लेगच्या साथीने पेंब्रिज शहर बंद पडले. न्यूटन आपल्या आजोळी परतले. बाहेर प्लेगचा हाहाकार सुरू असताना न्यूटन मात्र आजोळी विलगीकरणात होते. याच काळात विलगीकरणात असताना न्यूटन यांनी आपल्या आयुष्यातील तीन मोठे शोध लावले. न्यूटन यांच्या या शोधात त्यांच्या विलगीकरणाचा निश्चितच काही प्रमाणात वाटा आहे असे म्हणता येईल.





























































