अजित बद्दल थोडेसे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अजित वाडेकर, ज्येष्ठ क्रिकेटपटू

>> विक्रम गोखले

अजित वाडेकर. क्रिकेट विश्वातील सुवर्णाक्षरे. माझ्या या मित्राने माझ्या सांगण्यावरून चित्रपटात प्रशिक्षकाचा अभिनय केलाय. या आठवणी माझ्यासाठी नेहमीच स्मरणीय ठरतील.

अजित वाडेकर आणि माझी कधीपासून ओळख आहे हे मला आठवत नाही एवढी वर्षे आमच्या मैत्रीला झाली. रोज भेटत नसलो तरी कधीही भेटलो तर अगदी काल परवा भेटल्यासारखेच गप्पा मारायचो. प्रसन्न असं त्याचं व्यक्तिमत्त्व. आमच्या मैत्रीत आम्ही कायम अंतर ठेवून ती जपली. उगाच मित्र आहे म्हणून नेहमी फोन करा, भेटा असे नाही, पण कधीतरी भेटलो तर वेळ कमी पडायचा इतकी आमची मैत्री. शांत स्वभावाचा, सगळय़ांशी अगदी अदबीने बोलणारा. त्याच्या वागण्यात कधी उद्धटपणा जाणवलाच नाही. दररोज न भेटताही आमच्यात चांगली मैत्री आम्ही जपली होती. ‘बाळा’ या चित्रपटाच्या निमित्ताने मी त्याला फोन केला होता. हा चित्रपट क्रिकेट या विषयावर आधारित असल्याने क्रिकेट प्रशिक्षक या भूमिकेसाठी अजित वाडेकर यांचे सगळय़ांनी नाव सुचवले. मी अजितला चित्रपटाबद्दल सांगितले तर त्याने मला काही अभिनय वगैरे जमणार नाही असे सांगत थेट नकार दिला. पण त्याला जेव्हा मी सांगितले, अरे तुला अभिनय कुठे करायचा आहे? जसे तू आता माझ्याशी बोलतोयस अगदी तसेच तुला तिथे वागायचे आहे. कुठेही तू अभिनय करतोयस असे वाटायला नको आणि तुला कुठे अडचण आलीच तर मी आहे ना? मग कशाला एवढा विचार करतोस? आणि त्याचा नकार लगेच होकारात बदलला.

वाडेकर प्रेमळ, माणसं जपणारा, उत्तम प्रशिक्षक, यशस्वी कर्णधार असा विलक्षण माणूस होता. चित्रपटात काम करताना कुठेही तो अभिनय करतोय असे जाणवत नाही. इतकी सहजता त्याच्या कामात दिसतेय. त्याने पहिल्यांदाच चित्रपटात काम केले तो प्रदर्शित होत असताना तो मात्र जगात नाहीये याची खंत आहे. त्याची उणीव नक्कीच जाणवेल. क्रिकेटचं गणित त्याला जमलं होतं

क्रिकेट हे एक गणित आहे. ते त्याला चांगले कळले होते. त्यामुळे येणारा बॉल त्याला कळायचा. कुठला बॉल कोणत्या दिशेने मारायचा, एखादा बॅटस्मन कोणत्या बाजूला बॉल मारू शकतो याची त्याला चांगली जाण होती. तो घाई करणारा अजिबात नव्हता. म्हणून तो उत्तम होता. चांगला मित्र गेल्याचे दुःख आहे.

आजचे क्रिकेट आक्रमक
आजचे क्रिकेट हे आक्रमक आहे. आज क्रिकेटमध्ये बॅट-बॉलवरून हाणामाऱया होतात. आजचे क्रिकेटपटू सगळे आक्रमक आहेत आणि ती आक्रमकता आवडते. मी आयपीएल मॅचेस बघतो. धोनी, विराट कोहली, सेहवाग हे आक्रमक आहेत. मुळूमुळू बोलणारे कोणी राहिलेले नाही. .

बॅटिंग कधी जमली नाही
शाळेत असताना मी खूप क्रिकेटवेडा होतो. मला फिल्डिंग आणि बॉलिंग करायला आवडायचे. त्यांची गणितं छान जमली होती, पण बॅटिंग फारशी जमली नाही. एकदा असेच पुण्यात प्रभात टिळक स्वीमिंग पूलजवळ आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि बॉलिंग टाकल्यावर मी कॅच पकडायला हात वर केला आणि चिमणी हातात आली होती.

कसोटी क्रिकेटची सर नाही
मला कसोटी क्रिकेट आवडायचे. त्याची सर कुठे येणार नाही. माझ्या मते कसोटी क्रिकेट म्हणजे खरे क्रिकेट. खरंच कसोटी क्रिकेट पाहताना खूप धमाल यायची. खेळाडूंचा कस लागायचा, पण अलीकडे ट्वेंटी-ट्वेंटी, एकदिवसीय क्रिकेट खेळण्याकडे खेळाडूंचा कल असतो. पण खरी गंमत कसोटी क्रिकेट पाहण्यातच आहे.

क्रिकेटचा मोठा चाहता
मी क्रिकेट खेळत नसलो तरी क्रिकेटचा मोठा चाहता आहे. अजित आणि मी भेटलो की अनेकदा आमच्या क्रिकेट या विषयावर तासन्तास गप्पा रंगायच्या. मला आपल्या क्रिकेटचा अभिमान आहे. मला आठवतंय जेव्हा सुनील गावस्करने कसोटीत दहा हजार धावा केल्या त्यावेळी मी अक्षरशः रडलो होतो. ते आनंदाश्रू होते, अभिमान होता आणि आजही आहे. त्यानंतर एकदा आपण पाकिस्तान विरोधात क्रिकेट जिंकलो त्यावेळी मी शूट करत होतो त्यावेळी सगळय़ांना माझ्याकडून जेवण दिले होते. असे अनेक किस्से आहेत.