मार्केटिंग सल्ला: आधी पोटोबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अमोल पुंडे, मार्केटिंग सल्लागार 

व्यवसाय म्हटलं की, काही ना काही अडचणी या असणारच. मग तो व्यवसाय कितीही छोटा असो वा कितीही मोठा. त्यातही तुम्ही जर कारखानदार असाल तर नक्कीच जास्त अडचणी असणार. कारखानदारीला नियामक कायदे, प्रतिकूल जमीन आणि कामगार कायदे, दळणवळण, ऊर्जा पायाभूत सुविधा इत्यादी भेडसावणाऱया काही समस्या आहेत. फार कमी कारखानदार ह्या समस्यांवर काही प्रमाणात मात करून आजही आपला उद्योग चालवत आहेत. कारखानदाराला सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे कामगारांची. सर्वच कामगारांनी व्यवस्थित आणि वेळेवर काम केलं तर कारखानदार खूप काही साध्य करू शकतो. परंतु यासाठी फक्त अधिकचा पैसा देऊन कामगारांना खुश ठेवता येत नाही तर त्याचं मन जिंकता यायला हवं. कामगार जेव्हा मनापासून काम करतो तेव्हा त्याला काहीच सांगावे लागत नाही आणि त्याच्या मागेही लागावे लागत नाही.

अशाच एका कारखानदाराला कामगारांबद्दल एक समस्या होती. या कारखान्यात जी यंत्रसामुग्री होती त्यातील बरीचशी यंत्रे ही एकमेकांवर अवलंबून होती. जसे की सहा पैकी पाच यंत्रे चालू असून उपयोग नाही तर एकाच वेळी सहा यंत्रे चालू असायला हवीत तरच काम होऊ शकते. यासाठी सर्व कामगार वेळेत यायला हवीत. सकाळी 9 ची वेळ असूनही काही कामगार 9.15, 9.30 अशा वेळेला येत होते आणि त्यामुळे काम 9.30 नंतरच चालू होत असे. अर्धा तास उशीर तसा कमी वाटतो, परंतु काही ठिकाणी 5 मिनिट उशीरसुद्धा खूप असतो. या कारखानदाराच्या बाबतीतसुद्धा हीच अडचण होती, अर्धा तास उशिरामुळे बरंचस गणित चुकत होते. एका कारखानदाराची अडचण हा दुसरा कारखानदारच समजू शकतो. मी कारखानदार नसल्याने मला ती अडचण समजत नव्हती, परंतु माझं काम होतं कामगारांना वेळेवर येण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करणे.विचार आणि काम चालू झाले. काही मित्रांचे वडील हे कधीकाळी कारखान्यांमध्ये काम करायचे त्यांना भेटून मस्त गप्पा मारल्या. ते त्यांच्या कारखान्यातील जुन्या आठवणी सांगायचे. त्यात कारखान्यातील कोणत्या गोष्टी आवडायच्या कोणत्या नाही ते कळत नकळत सांगायचे. एक लक्षात आलं, कामगाराच्या इच्छा फार काही मोठय़ा नसतात. अगदी साध्या आणि माफक गरजा आणि इच्छा असतात आणि त्या जर पूर्ण होत असतील तर तो अगदी मनापासून काम करतो.

काही दिवसांनी त्या कारखानदाराला संपर्क करून सांगितले की कारखान्यात जे उपाहारगृह आहे तिथे सकाळचा नाश्ता हा भरपेट आणि मोफत उपलब्ध करून द्यायचा. आणि याची वेळ ही सकाळी 8 ते 9 एवढी असेल. सकाळी 9 ते 12 उपाहारगृह बंद ठेवायचे. परिणामी कामगार वेळेच्या आधी येऊ लागले आणि उपाहारगृह 9 वाजता बंद होत असल्याने काम 9 वाजता चालू होऊ लागले.

माझा उद्योजकांना हाच सल्ला असतो, फक्त पगार वाढवल्याने कर्मचारी आपल्यासाठी काम करत नसून त्याच्या इतरही गरजा असतात ज्यांचा योग्य तो विचार करून मार्ग काढायला हवा.
[email protected]