सिनेमा- भूत बंगला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रा. अनिल कवठेकर

सिने मनोरंजनामध्ये भयकथा हे एक माध्यम बऱयाच जणांचे आवडते आहे. भयकथा म्हणजे भुतांच्या कथा. हे सिनेमे घाबरण्यातल्या आनंदासाठी पाहिले जातात. बऱयाचदा तर भयानक दृश्यांच्या वेळी चित्रपटगृहात किंकाळ्याही ऐकायला मिळतात आणि गंमत म्हणजे ते दृश्य इतके भीतिदायक नसते.

थिएटरमध्ये जाऊन भयकथा बघण्यात एक वेगळी गंमत असते. कारण माणसाला भीतीतूनही आनंद मिळतो आणि म्हणून असे चित्रपट चालतात.

चित्रपटसृष्टीत भुतांच्या कथांचा एक साचा ठरलेला आहे. पडका वाडा किंवा हवेली, नेमक्या वेळी लाइट जाणे, सगळ्या घटना रात्रीच्या वेळी घडणे, अचानक कुठून तरी रडण्याचा वा हसण्याचा आवाज येणे, कंदील पेटवणे, भीती निर्माण करणारे गाणे असणे. गुमनाम है कोई…, रैना बरसे रिमझिम…, कही दीप जले कही दिल…, आयेगा आनेवाला… अशी गाणी वातावरण निर्मिती करतात. भुतांवर सर्वाधिक चित्रपट निर्मिती जर कोणी केली असेल तर ती रामसे बंधूंनी केली. दरवाजा, हॉटेल, दो गज जमीन के नीचे… पण त्यांच्या चित्रपटांमध्ये जे भूत असायचे ते इंग्रजी असायचे. हातात मेणबत्ती घेऊन पांढऱयाशुभ्र कपडय़ातली तरुणी. हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये मेणबत्ती घेतली जात नाही. तरीही त्यांचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा होता. त्यामुळे भुतांचा चित्रपट पाहताना आपण ही सगळी गणिते घेऊनच पाहायला जातो.

‘भूत बंगला’ या बाबतीमध्ये पूर्ण अर्थाने वेगळा होता. मेहमूदच्या सुरुवातीच्या काळात नायक म्हणून त्याने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा ‘भूत बंगला’! यात घाबरण्यापेक्षा अनेक प्रसंगांतून भीती वाटण्याच्या ठिकाणी कसे विनोद घडू शकतात, त्याचे दिग्दर्शन अतिशय वेगळ्या पद्धतीने मेहमूदने केलेले आहे. एखादी भयकथा विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न हिंदी चित्रपटसृष्टीत कोणी केलेला नाही. तो मेहमूदने केला होता. संगीतकार राहुल देव बर्मन अर्थात आर. डी. बर्मन याने या चित्रपटामध्ये मेहमूदबरोबर खूप धमाल उडवून दिलेली आहे. ‘भूत बंगला’ चित्रपटाचा वेगही चांगला आहे. पहिले दृश्य सुरू होते तेव्हाच पहिला खून होतो आणि एक बाई एका लहान मुलाला घेऊन धावताना आपल्याला दिसते. त्यात तिच्या धावण्याच्या मागे असलेले आरडीचे उत्कंठा वाढवणारे संगीत आहे.

रेखा (तनुजा) परदेशातून परतलेली आहे आणि ज्या दिवशी ती येणार त्या दिवशी तिच्या वडिलांचा खून होतो. या भूत बंगल्यातील दोन नोकर खरोखर भीतिदायक चेहऱयांचे आहेत. लखिया ही त्या बंगल्यातील स्वयंपाकीण आहे, पण तिच्या चेहऱयावरचे भाव पाहिल्यानंतर तिच्या हातचे खाण्याची कोणाला इच्छा होणार नाही. ही लखिया सारखी कोणाला तरी भेटत असते. त्यामुळे प्रेक्षकांनी अशा छोटय़ा छोटय़ा घटनांचा विचार करून मुख्य खुनी कोण, यापासून दूर जावे अशी कथेची रचना, जी प्रत्येक भयपटात पाहायला मिळते.

मेहमूदच्या अंगी असणाऱया विनोद कौशल्याचा नायक असतानाही तो जास्त उपयोग करून घेतो. नायक एंट्रीला मोटरसायकलवर वाकून उभा आहे आणि तोंडाने वायरलेसचा आवाज काढतोय. रेखाचे अंकल शामलाल संपूर्ण चित्रपटभर  त्यांच्यावर संशय जाईल असे जाणीवपूर्वक वागताना दिसतात. अनेक वेळा फोनवर त्यांचाच आवाज ऐकू येतो आणि त्यांचा आवाज ऐकून आपण त्यांच्याविषयी विचार करावा अशी रचना दिग्दर्शकाने केलेली आहे, पण चाणाक्ष प्रेक्षक अशा गोष्टींना फसत नाहीत. त्यांना अशा चित्रपट मांडणीचा अनुभव असल्यामुळे जे दिसते ते नसते हे सूत्र भयपटातही लक्षात ठेवायचे असते आणि चाणाक्ष प्रेक्षक ते लक्षात ठेवतातही. बंगल्यामध्ये खून होतात म्हणून पोलीस त्यांना मुंबईतल्या त्यांच्या घरी राहायला बोलावतात. इथे आपल्याला अमीन सयानी पाहायला मिळतो. बीच क्लबवर आमीन निवेदन करताना आपण ऐकतो. इथे पुन्हा दोन गाणी लागोपाठ होतात आणि मेहमूदच्या नृत्य कौशल्याची आणि त्याने उडवून दिलेल्या धमाल गमतीचा आपण अनुभव घेतो. आवो ट्वीस्ट करे… हे गाणे उपस्थितांना आवडते आणि रेखापेक्षा जास्त गुण मेहमूदला मिळतात. इथेच नायक आणि नायिकांमध्ये संघर्ष घडतो.

रेखा आपल्या मैत्रिणींना घेऊन सहलीला जाते. पाऊस येतो आणि मग पुन्हा त्यांना त्याच बंगल्यात यावे लागते. बंगल्यातील लाईट जाणे व घाबरणाऱया मैत्रिणी, सिगारेटचे तुकडे, दरवाजा बाहेरून बंद होणे, कंदील आपोआप विझणे, पावलांचा आवाज येणे, मी तुला ठार करणार आहे… असा धुरातून येणारा आवाज. त्यामुळे इथे स्पष्ट होते की, चित्रपटाचे नाव जरी ‘भूत बंगला’ असले तरी इथे भूत नसून खुनी आहे.  त्याला सगळ्यांचा खून का करायचाय? कशाबद्दल करायचा आहे? की तो बदला घेतोय? मैत्रिणींसोबत रेखा जेव्हा त्या बंगल्यात येते तेव्हा बंगल्यात घडणाऱया घटनांपेक्षा त्या मैत्रिणींच्या भीतीच्या किंकाळ्यांनीच आपल्याला जास्त भीती वाटते. तिचे काका बाहेर गेल्यानंतरच तिला फोन येतो. तिला संशय येतो, ती व्यक्त करते, पण तिचे काका तिच्याशी का तुसडेपणाने वागतात ते कळत नाही. ती जेव्हा जेव्हा घरात एकटी असते तेव्हाच तो फोन येतो. इथे घाबरण्याचा अतिशय सुंदर अभिनय तनुजाने केला आहे.

मेहमूदच्या दिग्दर्शनाचा एक वेगळा पैलू इथे सांगता येईल. मेहमूद जेव्हा रात्री रेखाच्या संरक्षणासाठी तिला भेटायला येतो तेव्हा घाबरलेली रेखा मोहनला समोर पाहून दरवाजा बंद करते. मोहन आणि त्याचे मित्र इमारतीच्या खाली उभे असतात. एक दारुडय़ा तरुणांची टोळी तिथे येते आणि तिथे असणाऱया भिकाऱयाचा व्हायलिन तोडून टाकते. तो भिकारी मोठमोठय़ाने रडू लागतो. त्याला मदत करण्याकरिता मेहमूद आणि त्याचे मित्र त्या दारुडय़ा मित्रांशी हाणामारी करतात; पण ही हाणामारी एका कथेसारखी आहे. साधारणपणे हेलनच्या कॅबेरा नृत्यांमध्ये एक कथा असायची आणि ती कथा सादर करताना हेलन नृत्य करायची. तोच फॉरमॅट थोडय़ा वेगळ्या पद्धतीने मेहमूदने येथे वापरलेला आहे.

‘जागो सोने वालो, सुनो मेरी कहानी…’ या गाण्यातले संगीत आहे, त्या गाण्याच्या मधल्या संगीतावर नृत्य करत, उडय़ा मारत व त्यात नृत्यातील अनेक पदन्यास करत त्या टोळक्याची युथ क्लबशी होणारी मारामारी दाखवण्याचं काम मेहमूदने केलेले आहे. मला वाटते, मेहमूदने केलेला प्रकार एकमेवाद्वितीय असावा. असा नृत्यातील मारामारीचा सिक्वेन्स माझ्या पाहण्यात आलेला नाही. विनोदाच्या जागा तो सोडत नाही. काही संवादांतून आपल्याला जाणवते की, तो जेव्हा काठीने मातीत काही लिहीत असतो तेव्हा कोणी विचारतो, “क्या कर रहे हो?” तेव्हा तो चेहरा निर्विकार ठेवून म्हणतो, “लाइन मार रहा हूं.” विनोदाच्या जागा पकडण्याची जी त्याची खासीयत होती ती काही संवादांतून इथे जाणवते; पण इथे जास्त जाणवते ते मेहमूदचे दिग्दर्शन. म्हणजे प्रतिध्वनीचा उपयोग इथे मेहमूदने सुंदर केलेला आहे. यासोबतच मेहमूद आणि आरडी, दोघेही जेव्हा त्या भूत बंगल्यामध्ये प्रवेश करतात, ती धमाल पाहताना चित्रपटातील भुताचे भय शिल्लक राहते का? हा प्रश्न पडावा. यात भुतांसाठी एक गाणे आहे. या नाचणाऱया भुतांबरोबर आरडी आणि मेहमूद दोघेही नाचतात. सिंहाचा हलणारा मुखवटा आहे, वाघाची हलणारी शेपटी आहे. हलणाऱया, सरकणाऱया खुर्च्या आहेत. अंगावर येणारी भांडी आहेत, पण तरीही त्या दोघांचा अभिनय पाहून आपण घाबरत नाही, तर हे संपूर्ण दृश्य आपण एन्जॉय करतो. तुम्ही हा चित्रपट त्यातील गमती जमतीसाठी नक्कीच पहा. भयकथेचीसुद्धा एखादा दिग्दर्शक विनोदी मांडणी कशी करू शकतो हे पाहण्यासाठी ‘भूत बंगला’ हा चित्रपट नक्कीच पहा.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)