
>> अंकुश काकडे
अचूकपणे टिप्पणी करून राजकीय टोला लगावण्यात पवारसाहेब यांचा हातखंडा. कधी कधी एखाद्याची फिरकीदेखील घेतात. पवारसाहेब युवा आमदार झाले तेव्हा उल्हासदादा पवार हे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. एका केंद्रीय मंत्र्याला भेटण्यासाठी एकत्रपणे दिल्लीमध्ये गेले. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर टॅक्सीने केंद्रीय मंत्र्याच्या घराकडे निघाले. टॅक्सीमधून जात असताना पवारसाहेब उल्हासदादांना म्हणाले, आपण थोडी गंमत करू. टॅक्सीवाल्या सरदाराला त्यांनी त्या मंत्र्याच्या बंगल्याचा पत्ता सांगून विचारले, किती भाडे होईल? त्यावर सरदारजीने भाडय़ाची रक्कम सांगितली. पवारसाहेब म्हणाले, तुला भाडय़ाची संपूर्ण रक्कम आम्ही अगोदरच देतो. जेव्हा हे मंत्री बंगल्याजवळ आम्हाला घ्यायला येतील तेव्हा आम्ही तुला भाडय़ाचे पैसे देऊ करू. तेव्हा तू म्हणायचे, ‘‘नको नको… मला टॅक्सीच्या भाडय़ाचे पैसे अजिबात नको. तुम्ही या मंत्री साहेबांकडे आलात… ते जनतेसाठी, गोरगरीबांसाठी किती काम करतात… त्यांच्याकडे आलेल्या माणसांकडून मी पैसे कसे घेणार.. मला तुमच्याकडून भाडय़ाचे पैसे नको असं वारंवार म्हणून त्या मंत्र्यांना नमस्कार करून तू निघून जा,’’ असे बजावले. टॅक्सी मंत्र्याच्या बंगल्यामध्ये आली. मंत्रि महोदय समोरच होते. शरद पवारसाहेब, उल्हासदादा टॅक्सीतून उतरले. ठरल्याप्रमाणे ते टॅक्सीवाल्याला पैसे देऊ लागले. संबंधित मंत्रीदेखील हे सगळे पाहत होते. तेवढय़ात सरदारजीने नही नही साहब, नही… मै आपसे पैसे नही लूंगा… असे डायलॉग म्हणायला सुरुवात केली. काही वेळ ही डायलॉगबाजी चालू होती. पैसे न घेता सरदारजी टॅक्सी घेऊन निघून गेला. त्यानंतर मोठय़ा आविर्भावात हे केंद्रीय मंत्री या दोघांना घेऊन बंगल्यात चालू लागले. जाता जाता म्हणाले… बघ शरद, दिल्लीत मला किती लोक मानतात. बघितलं ना, टॅक्सीवाल्याने तुमच्याकडून पैसेदेखील घेतले नाहीत. त्या केंद्रीय मंत्र्यांकडून स्वतःचा मोठेपणा सांगितला जात असताना पवारसाहेब तेवढय़ाच आदराने प्रतिसाद देत होते. उल्हासदादांचा चेहरा मात्र खूप काही बोलत होता.



























































