अनुभूती –  जीवन कृतार्थतेची पंढरीची वारी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अपर्णा परांजपे

आषाढी एकादशी आली की, सगळय़ांना पंढरीच्या वारीचे वेध लागतात. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे पायी वारी होणार नसली तरी त्यामुळे विठ्ठलाचे भक्त आणि वारकरी यांच्या भक्ती आणि ओढ यात जराही कमी नाही. कारण त्यांच्यासाठी पंढरीची वारी ही जीवन कृतार्थतेचा मार्ग दाखवते.

ज्येष्ठ महिन्याचा कृष्ण पक्ष सुरू झाला की विठ्ठलभक्तांना, विशेषतः वारकऱयांना वेध लागतात पंढरपूरच्या वारीचे. ‘वारी’ शब्द ‘वार’ या मूळ संस्कृत शब्दापासून आला आहे. अर्थ आहे पाणी किंवा द्रव पदार्थ. वारी म्हणजे प्रवाहीपण. नदीच्या पाण्याचे गंतव्य जसे समुद्रात सामावून जाणे तसेच वारकऱयांचे गंतव्य आहे परमात्मा पांडुरंगात सामावून जाणे/एकरूपता पावणे. सर्व संत असेच भगवंताशी एकरूपता पावले, ‘देव ते संत देव ते संत । निमित्त त्या प्रतिमा।।’. हे पूर्णत्व लाभेपर्यंत भक्ताची वारी थांबतही नाही व संपतही नाही.

मराठीत ‘वारी’ शब्दाचा अर्थ आहे खेप किंवा फेरा. जी वारंवार केली जाते ती वारी. या अर्थाने जन्म मग मृत्यू, पुन्हा जन्म परत मृत्यू हे जन्म-मृत्यूचे चक्र म्हणजे पण वारीच. ‘वारकरी’ शब्दाचा विग्रह काही जण ‘वार-करी’ किंवा ‘वारी-करी’ असा करतात. जे आपल्या ठिकाणी असलेल्या दोष-विकारांवर वार करून भगवंताला प्राप्त करतात ते वार-करी. मात्र जे वारी करतात ते वारकरी असा अर्थ सर्वमान्य आहे. पण ‘वारी कशाची’ हा भाग महत्त्वाचा. पाहूया काही उदाहरणे ः 1) निव्वळ प्रापंचिक जिवांना संसार बंधनामुळे करावी लागते ती जन्म-मरणाची वारी. 2) एकच गोष्ट पुनः पुन्हा करणे म्हणजे पण वारीच. एखादा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत वारंवार नापास झाला की पूर्वी ‘किती वाऱया केल्या?’ असा प्रश्न विचारला जायचा. 3) चंचल चित्ताच्या साधकांना निश्चय न टिकल्याने घडते ती संकल्प-विकल्पांची वारी. ते एखादा सत्संकल्प करतात, परंतु कृतीला सुरुवात करायच्या आधीच विकल्प जागतो व कृती घडतच नाही. मग पुन्हा नव्याने संकल्प करतात. ही संकल्प-विकल्पांची वारी. यामुळे त्यांच्या बुद्धीला स्थिरताच येत नाही. यावर उपाय श्री ज्ञानोबाराय सांगतात, ‘ऐसे वैराग्य हे करी। तरी संकल्पाची सरे वारी । सुखे धृतीच्या धवळारी । बुद्धी नांदे ।।’.

वर वर्णिलेल्या ‘वारी’ने जीवनाला केवळ अपूर्णतेचाच अनुभव येतो. मात्र जी वारी जिवाला पूर्णतेचा/कृतार्थतेचा मार्ग दाखविते ती आहे ‘पंढरीची वारी.’

काय विशेष आहे या पंढरपूरच्या वारीत? जे संतांनी उपदेशिलेल्या तत्त्वज्ञानाला अनुसरून पंढरीची वारी करतात त्यांच्यातील ‘मी कोणीतरी वेगळा आहे’ हा अहंकार गळून पडल्याने द्वैत/दुजाभाव संपतो आणि अद्वैताचा अनुभव येतो. यालाच ‘अहं ब्रह्मास्मि’ची अनुभूती किंवा ‘आत्मसाक्षात्कार’ म्हणतात. संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबाराय म्हणतात, ‘तैसे माझिये साक्षात्कारी । सरे अहंकाराची वारी। अहंकारलोपी अवधारी । द्वैत जाय ।।’- श्रीज्ञाने.अ.11ओ.694.

एखाद्याला प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की, ही कृतार्थता, पूर्णत्व किंवा मोक्ष पंढरपूरला गेल्यानेच कसा काय मिळणार? पंढरपुराचे वैशिष्टय़ आहे परमात्मा पांडुरंग श्रीविठ्ठल, जो सगुण-साकार होऊन आपल्या प्रिय भक्तांसाठी कंबरेवर हात ठेवून वाट पाहत उभा आहे. इतिहास संशोधक भांडारकरांच्या मते ‘विष्णू’ या शब्दाचा कानडी अपभ्रंश ‘विट्टी’ असा होतो व यापासूनच ‘विठ्ठल’ हे नाव रूढ झाले. या संप्रदायाचा उगम कर्नाटकातून झाला असल्याचे पण मानले जाते. कारण चौंडरस, पुरंदरदास, कनकदास या प्राचीन संतकवींनी श्रीविठ्ठल हेच दैवत वर्णिले आहे. तसेच ‘पंडरिगे’ या कानडी शब्दापासून पंढरपूर हे नाव आले असावे. श्रीज्ञानोबारायांच्या ‘कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु’; श्रीनामदेवरायांच्या ‘कानडा विठ्ठल वो । उभा भिवरेतीरी ।।’ तर श्रीएकनाथ महाराजांच्या ‘तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरिये।।’ या अभंगांतून ‘श्री विठ्ठल’ हे नाव कर्नाटकातून रूढ झाल्याचे दिसून येते. शिवाय महाराष्ट्रातून श्रीविठ्ठलमूर्ती कर्नाटकात नेण्यात आली होती आणि नंतर श्रीभानुदास महाराजांनी ती पुन्हा महाराष्ट्रात आणल्याचाही इतिहास आहे. अजूनही याबाबत संशोधन सुरूच आहे. असे असले तरीही भक्तहृदयातील भक्तिभावाला मात्र यामुळे काहीही न्यूनत्व येत नाही. श्रीविठ्ठल हे दैवत सर्वांनाच आपलेसे वाटते. कारण ते मुळातच सर्वव्यापी परब्रह्मतत्त्व आहे, ‘नेणो ब्रह्म वाट चुकले । उघडे पंढरपुरासि आले।।’.

श्रीविठ्ठल हे भगवान श्रीकृष्णाचेच रूप असल्याने पंढरपुरास दक्षिण द्वारका असेही म्हणतात. श्रीएकनाथ महाराज म्हणतात, ‘पावन पांडुरंगक्षिती। जे का दक्षिणद्वारावती। जेथ विराजे श्रीविठ्ठलमूर्ती । नामे गर्जती पंढरी।।’. संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबाराय म्हणतात, ‘पुंडलिकाच्या भावार्था । गोकुळीहुनि जाला येता।।’.

काळ्या पाषाणाच्या सावळ्या, सुंदर विठ्ठलमूर्तीचे दर्शन होताच भक्तांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात. ‘विठ्ठला…पांडुरंगा…मायबापा…’ एवढेच शब्द मुखातून उत्कटतेने बाहेर पडतात. अशा या विठ्ठलमूर्तीत हरी व हर यांचे ऐक्य पाहायला मिळते. भक्त (हर) व भगवंत (हरी) यांचे ऐक्य. श्रीविठ्ठलमूर्तीच्या मस्तकावर शिवपिंडी आहे. संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ‘पुंडलिकाचे भाग्य वर्णावया अमरी । नाही चराचरी ऐसा कोणी ।। विष्णुसहित शिव आणिला पंढरी । केले भीमातीरी पेरवणे जेणे।।’. आपल्या निस्सीम भक्ताला मस्तकी धारण करणारा देव अन्यत्र कोठेही नाही. शैव व वैष्णव संप्रदायाचा येथे झालेला समन्वय हे भागवतधर्माचे अनन्यसाधारण वैशिष्टय़ आहे.

श्रीविठ्ठल उपास्य दैवत असलेल्या भागवत संप्रदायाचा प्रारंभ जरी सहाव्या शतकात झालेला असला तरी त्याला वैभव, चैतन्य प्राप्त झाले ते संत श्रीज्ञानेश्वर महाराज व संत श्रीनामदेव महाराज यांच्या काळापासून. संत नरहरी महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत सावता महाराज, संत चोखोबा, संत रोहिदास महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई यांसारख्या सर्व संतांनी त्यात अमूल्य भर घातल्याने भागवत संप्रदाय अधिक पुष्ट झाला. प्रत्येकाने आपापल्या शैलीत ओव्या, अभंग, भारूडे, रूपक काव्य, दोहे इ.भक्तिरसपूर्ण काव्य रचून जणू भक्तीची बागच फुलवली आणि त्यातील भक्तीचा सुगंध दूरवर सहजच पसरला. भक्ती, ज्ञान व विवेक दृढ करून माणसातील स्वार्थी, लोभी, संकुचित वृत्तींवर मात करून सहृदयता, परोपकार, निःस्वार्थता, निष्कामता, प्रेम, सहिष्णुता इ. सद्गुणांची जोपासना करायला प्रवृत्त करून उदार व विशाल बनविले. सर्व भेदभावाचा निरास करणारे, सर्वांना एका भक्तीच्या रंगात रंगून टाकणारे असे पंढरपूर हे भूवैकुंठच असल्याचे संतांनी सांगितले आहे. भागवत धर्ममंदिराचे अध्वर्यू संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबाराय पंढरपूरचे माहात्म्य वर्णन करताना म्हणतात, ‘बाप तीर्थ पंढरी। भूवैकुंठ महीवरी।। भक्त पुंडलिकाचे द्वारी । कर कटावरी राहिला ।। काशी अयोध्या कांची अवंती । मथुरा माया गोमती । ऐशी तीर्थे इत्यादिके आहेती । परि सरी न पवती पांडुरंगी ।।…’

अशा या पंढरपूरच्या वारीला जाण्याचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. गेल्या वर्षीही लॉकडाऊनमुळे जाता आले नव्हते. निदान या वर्षी तरी… ही एकच आशा प्रत्येक वारकऱयाच्या मनात आहेच. एकीकडे महामारीच्या संकटामुळे आलेल्या मर्यादा तर दुसरीकडे पंढरीची ओढ! भक्तहृदयाची घालमेल सुरू आहे. ‘जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी ।।’ अशी अवस्था त्यांची झाली आहे. अशा वेळी ‘तो’ दयाघन, भक्तकामकल्पद्रूम, परचित्तलक्षणांचा रावो आपल्या भक्तांना भेटल्यावाचून राहील का? परंतु तो भक्त निष्काम, निरपेक्षपणे निरहंकारी होऊन निरंतर भक्ती करणारा हवा. भगवंतालाही अशा आपल्या प्रिय भक्ताच्या भेटीची ओढ असतेच. तोसुद्धा त्याच्या भेटीसाठी उतावीळ असतो. मग असा भक्त जेथे भगवंताला आळवील, त्याचे नामसंकीर्तन करील, भगवंताचे व भगवद्भक्तांचे चरित्र गाईल तेथेच पंढरपूर साकार होईलच की! भगवंताने स्वतः असे अभिवचन दिले आहे, ‘परी तयापाशी पांडवा । मी हारपला गिंवसावा । जेथ नामघोषु बरवा । करिती माझा ।। तैसे माझ्या गुणी धाले । देशकालातें विसरले। कीर्तने सुखी झाले। आपणपांचि ।। कृष्ण विष्णु हरि गोविंद। या नामाचे निखळ प्रबंध । माजि आत्मचर्चा विशद। उदंड गाती।।’ – श्रीज्ञाने.अ.9.

जे स्वधर्माचे आचरण चोख व निःस्वार्थपणे करतात ते पंढरपुरास गेले नाही तरी परमात्मा त्यांच्या हृदयात प्रकटतो. पंढरपूरजवळील अरणी गावात मळ्याची राखण करणारे, पंढरपुरास जाणाऱया वारकऱयांची प्रेमाने सेवा करणारे संत सावता माळी कधी पंढरपुरास गेले नाहीत, परंतु श्रीविठ्ठल त्यांच्या हृदयात प्रकटले. निष्काम कर्मयोगी भीष्माचार्यांच्या अंत्यसमयी ते स्वतःहून प्रगटले. आपणही जर अशी निस्सीम भक्ती करू, स्वधर्माचे/कर्तव्याचे चोख पालन करू तर ‘काया ही पंढरी । आत्मा पांडुरंग ।।’ याची अनुभूती घेऊ शकू.

– [email protected]