भटकंती डोळस व्हावी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशुतोष बापट

नुकतंच सुरू झालंय वर्ष असं म्हणे तोवर आपण 2021 या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात येऊन पोहचलोदेखील. वर्षभरातल्या अनेक निराशाजनक गोष्टी अशा वेळी आठवतात. पण त्या आता सगळ्या सोडून द्यायच्या. ‘झाले मोकळे आकाश’ या नात्याने नवीन गोष्टींची सुरुवात करायची वेळ आलीये. या वर्षीचा सूर्यास्त कुठून पाहावा याचा विचार करताना अनेक ठिकाणांची मनात गर्दी होते. आपल्या आजूबाजूला विविध ठिकाणे आपली वाट बघताहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे. अर्थात जे ठिकाण आपल्याला जवळचं तेच निवडलं जातं. महाबळेश्वर, पन्हाळा, कोकण इथे पर्यटकांची झुंबड असणार हे तर अगदी नक्कीच.

अशा वेळी कुठे जाऊन यंदाचा शेवटचा सूर्यास्त पहावा असं जर मला विचारलं तर मी सांगेन की,आपला सखा सह्याद्री आपल्या पाठीशी उभा आहे. त्याच्या सान्निध्यात अनेक अनगड ठिकाणे वसली आहेत. पर्यटक शक्यतो नसतात अशी अनेक ठिकाणे या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वसली आहेत. यापैकी कुठेही जावे आणि तिथून या सरत्या वर्षाला निरोप द्यावा आणि येणाऱ्या वर्षाचे स्वागत या सह्याद्रीच्याच साथीने करावे. यासाठी गिर्यारोहणच केले पाहिजे असे काही नाही. सह्याद्रीच्या सान्निध्यात अशी अनेक ठिकाणे आहेत की, जिथे सर्वसामान्य लोकसुद्धा जाऊ शकतील. उदाहरणार्थ रतनगडच्या पायथ्याचे रतनवाडी किंवा भंडारदरा, कोकणात असाल तर टिकलेश्वर-भवानीगड, प्रतापगडच्या पायथ्याचे रामवरदायिनीचे ठाणे असलेले पार गाव ही ठिकाणे सरसकट सर्वांना जाता येतील अशी आहेत. पण खरे विचारल तर एखाद्या किल्ल्यावरून सरत्या वर्षाला निरोप देण्यासारखे सुख कोणतेही नसेल. मग तो किल्ला कोणताही असो. ऐन थंडीच्या दिवसांत भणाणत्या वाऱ्यात एखाद्या बुरुजावर बसून नववर्षाचे स्वागत करणे यासारखी दुसरी चैन नाही.

नवीन वर्षाच्या स्वागतासोबत काही संकल्पसुद्धा करता येतील. आपली भटकंती अजून डोळस व्हावी, समृद्ध व्हावी यासाठी आपल्याला अनेक गोष्टी करता येतील. नुसतेच एखाद्या ठिकाणी गेले, फोटो काढले आणि परत आले असे करण्यापेक्षा त्या ठिकाणाचे वैशिष्ट्य काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, तिथल्या स्थानिक रुढी-परंपरा काय आहेत, स्थानिक लोक त्याबद्दल काही कथा दंतकथा सांगतात का हे आवर्जून बघायला हवे. अनेक जुनी मंदिरे आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात. त्यांची रचना कशी आहे, त्यावर कोणत्या मूर्ती आहेत हे आपल्याकडे नोंदवून ठेवावे. आता फोटो काढणे अगदीच सोपे झाले आहे. त्याचे फोटो काढून ते तज्ञांना विचारून घ्यावे.

महाराष्ट्रात अनेक अनगड ठिकाणे सर्वत्र विखुरलेली आहेत. प्रत्येक ठिकाणाची नोंद सरकार दरबारी झालेली असतेच असे नाही. अनेक नवीन स्थळे आपल्याला सापडू शकतात. अनेक नवीन आणि आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला मिळू शकतील. आपली भटकंती जर डोळस असेल तर या ठिकाणांचा आपण शोध घेऊ शकतो. वीरगळ, गद्धेगाळ, शिलालेख, कातळखोदचित्रे, एखादी विचित्र रूढी आपल्याला दिसू शकेल. त्याची जरूर नोंद घ्यावी. त्या ठिकाणाचे अंतर नोंदवून ठेवावे आणि याद्वारे प्राचीन वारसा जतन करण्यास हातभार लावावा. प्रवासाच्या सोयी, जेवणाखाण्याच्या सोयी बघून घ्याव्यात आणि त्या इतरांना सांगाव्यात. खेड्यामधले लोक मुळातच सहकार्य करायला तयार असतात. त्यांच्या काही समजुती, कथा असतात. त्या समजून घेऊन त्याच्याद्वारे मागोवा घेतल्यास एखादे दुर्लक्षित वारसास्थळ आपल्यालासुद्धा सापडू शकते. वर्षभराच्या या लेखमालेद्वारे हेच आपणा सर्वांना सांगायचा प्रयत्न केला की, आपली भटकंती डोळस ठेवा, चौकस ठेवा. विविध अनुभव आपणाला मिळोत आणि आपली भटकंती समृद्ध होवो. गरज आहे चाकोरीबद्ध फिरण्याऐवजी डोळे-कान उघडे ठेवून काहीतरी वेगळे बघायची आपली तयारी हवी. हा समृद्ध महाराष्ट्र आपल्या शेकडो हातांनी आपल्याला भरभरून देतो आहे. आपल्या झोळीत आपण किती आणि काय काय भरून घेतो ते आपल्यावर आहे. सह्याद्री, समुद्र आणि निसर्ग यांच्या हाकेला आपला प्रतिसाद उत्तम असायला हवा. आपली नाळ सह्याद्रीशी जोडलेली आहे, त्याच्या सान्निध्यात आपली भटकंती समृद्ध व्हावी, आपल्या ज्ञानात आणि अनुभवात मोलाची भर पडावी याच आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

[email protected]