उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी

>>अश्विन बापट

मंगळवेढ्याच्या माळी कुटुंबीयांचा बासुंदीचा चार पिढ्यांचा व्यवसाय असून त्यांच्या बासुंदीला मागणी वाढत आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ बासुंदीसारखे फ्लेव्हर्स आणण्याचा बीएससी अॅग्री झालेल्या बालाजी माळी यांचा मानस आहे.

पणजोबा, आजोबा, वडील आणि आता मुलगा. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण व्यवसायातला गोडवा आणि दर्जा त्यांनी टिकवून ठेवलाय. ही कहाणी आहे मंगळवेढ्यातील माळी कुटुंबाची. बालाजी माळी ही त्यांची चौथी पिढी सध्या बासुंदी व्यवसायात पाय घट्ट रोवून आहे.

या गोड वाटचालीबद्दल बालाजी यांना विचारलं असता ते म्हणाले, “आमचे पणजोबा मंगळवेढ्याहून बसने येत आणि पहाटे साडेपाच-सहापासून घरोघरी जाऊन बासुंदी पी करत. पुढे ती परंपरा आजोबा, वडील आणि मीही सुरू ठेवली. हा व्यवसाय आम्ही पुढे अधिक व्यापक केला. माझे काका सोमनाथ माळी यांचं आता अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन मला लाभत असतं.”

आज मंगळवेढ्यातील घराच्या परिसरातच बासुंदी उत्पादनाचं काम चालतं. जिथे 6 ते 7 कामगार आहेत. तसंच माझी आजी आणि काकू या व्यवसायाकडे बारकाईने लक्ष ठेवून असतात. आज माझ्याकडे एकूण 14 मशिन्स आहेत, ज्यावर ही बासुंदी तयार करण्याचं काम केलं जातं. याकरिता लागणारी धग मात्र लाकडाच्याच चुलीवर दिली जाते. आमच्याकडे दिवसाला सुमारे 200 किलो बासुंदी विकली जाते. मंगळवेढ्यासह सांगोला, जत, सांगली, सोलापूर इथेही बासुंदीला खूप मागणी आहे. अगदी पुण्यातही 40 ते 50 किलो बासुंदीची डिमांड आहे. आमच्या बासुंदीचं वैशिष्ट्य म्हणजे दूध, साखर आणि वेलची पूड यांनीच ती बनलेली असते. कोणतेही आर्टिफिशल फ्लेव्हर्स, प्रिझर्व्हेटिव्हज् यात आम्ही घालत नाही. बासुंदीव्यतिरिक्त आमच्या खव्यालाही खूप मागणी आहे. लग्नाच्या मोसमात गोड पदार्थासाठी, खास करून गुलाब जामसाठी 200 ते 250 किलो खवा पी होत असते.

दिवाळीसारख्या सणाच्या वेळीही बासुंदीची ऑर्डर वाढत असते. एका दिवाळी पाडव्याला 483 किलो ही आमची सर्वाधिक पी झालेली बासुंदी आहे. तसंच आमचं एक युनिट पंढरपूरमध्ये आहे, जिथे पनीर, दही, श्रीखंड, लोणी, तूप ही उत्पादनं असतात. रोज 100 किलो दही तसंच 20 ते 30 किलो पनीरची पी तिकडे होत असते. आमच्या गुरुकृपा बासुंदीला लोक मंगळवेढ्याची बासुंदी म्हणूनच ओळखतात. आमच्या या भागाचं नाव या पदार्थामुळे मोठं झालं याबद्दल आनंदच आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ बासुंदीसारखे फ्लेव्हर्स आणण्याचा माझा मानस आहे, असंही बीएससी अॅग्री झालेल्या बालाजी माळी यांनी आवर्जून सांगितलं.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोड्युसर – सीनियर न्यूज अँकर आहेत.)