दखल- तिमिरातूनी तेजाकडे  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अस्मिता येंडे 

स्वतसाठी जगणारे तर बरेच असतात, पण फक्त स्वतपुरता विचार न करता आपले जीवन समाजासाठी अर्पण करणारी माणसेही आपल्या असामान्य कर्तृत्वाने अधिक उठून दिसतात. ज्या समाजात आपले व्यक्तित्व आकाराला येत असते, त्या समाजाप्रति आपण काहीतरी देणे लागतो, ही जाणीव ठेवून जगणारी माणसे इतरांच्या आयुष्याला प्रकाशमान करतात. काही व्यक्ती अशा असतात, ज्या आपल्या अमूल्य कार्याने कायम स्मरणात राहतात. त्यांचा आदर्श हा पुढील पिढीनेही घ्यावा, अशा व्यक्तिमत्त्वांचा जीवनप्रवास मुक्त पत्रकार, लेखक दिलीप प्रधान यांनी ‘साठवणीतली माणसं’ या लेखसंग्रहातून नेमकेपणाने टिपला आहे.

लेखक दिलीप प्रधान हे खरे तर इंटिरियर डिझायनर. पण साहित्याची, कलेची आवड ही मनात रुजलेली असल्याने आणि लहानपणी वाचनाचे झालेले संस्कारांमुळे त्यांनी नव्वदीच्या दशकात ‘दै. मुंबई सकाळ’ आणि नंतर ‘दै. सकाळ’ या वर्तमानपत्रांसाठी ज्या ध्येयवादी व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती घेतल्या, त्यातील निवडक मुलाखतींना लेखांच्या स्वरूपात शब्दबद्ध करून पुस्तकरूपात वाचकांसमोर प्रस्तुत केले आहे.

या पुस्तकात अहिल्याबाई रांगणेकर, दत्ताजी ताम्हणे,  जॉर्ज फर्नांडिस, मधू लिमये, पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर, बाळासाहेब ठाकरे, नानी पालखीवाला, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, ग . प्र. प्रधान, पद्मभूषण राम प्रधान अशा दहा दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या जगण्याचे सूत्र, त्यांची विचारधारा अगदी सोप्या शब्दांत लेखकाने विशद केली आहे.

तंत्रज्ञानात गुंतलेल्या आताच्या पिढीला यातील नावेही परिचित नसतील. त्यांना या व्यक्तींच्या कार्याची ओळख व्हावी, त्यांचे देशासाठी व समाजासाठी असलेले योगदान सगळ्यांना प्रेरणा देईल, या हेतूने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. लेखक हे फक्त साहित्य नाही, तर कला, संगीत, ाढाrडा अशा विविध क्षेत्रांतील घडामोडींवर लेखन केले आहे, तसेच समाजातील विविध समस्यांना आपल्या लेखणीतून वाचा फोडली आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना त्यांची लेखनशैली अधिक प्रभावी वाटते. कोणताही लेख कुठेही वाहवत गेलेला दिसून येत नाही. अगदी नेमक्या पद्धतीने महत्त्वपूर्ण घटक या लेखांतून अधोरेखित केले आहेत.

या मुलाखती घेताना प्रधान यांनी त्या-त्या व्यक्तींना नेमक्या प्रश्नांतून सहजपणे बोलके केले आणि ते व्यक्तिमत्त्व आणखी बहरत गेले. या मुलाखतींच्या दरम्यान लेखकाला जो सहवास लाभला, त्या सहवासातून त्यांच्यावर ज्या गोष्टींचा प्रभाव पडला, त्या व्यक्तींचे कोणते विशेष त्यांना भावले, हेसुद्धा आवर्जून नमूद केले आहे. लेखकाला अभिप्रेत असलेला अर्थ, त्यामागील भूमिका वाचकांपर्यंत पोहोचेल, याची खात्री आहे.

लेखसंग्रह : साठवणीतली माणसं  

लेखक : दिलीप प्रधान

प्रकाशक : सिद्धार्थ प्रकाशन  

मूल्य : 325 रुपये