यो हौशेचा मौजेचा नाताळ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  >> बर्नार्ड लोपेस

हिंदुस्थानी संस्कृतीत जसा सणावारांच्या आनंदाचा तोटा नाही, तसा ख्रिस्ती सणावारांच्या यादीतही सणांचा तोटा नाही. वारशातच उत्सवप्रियता लाभलेला वसईतील ख्रिस्ती माणूस यातील खूपसे सण मोठ्या आवडीने साजरे करतो. वसईतील नाताळ सण असाच उत्साहाने साजरा केला जातो.

उत्सवप्रियता ही आपल्या हिंदुस्थान देशाची ओळख आहे, मग ती राष्ट्रीय असो की सामाजिक असो. या सर्वांवर कळस म्हणजे हौसेने, श्रद्धेने साजरे होणारे धार्मिक उत्सव. बहुआयामी पंगोरे असलेले कितीतरी सण या विविधतेने नटलेल्या नि परंपरांचा अभिमान बाळगणाऱया आपल्या देशात साजरे केले जातात. त्यातलाच एक धार्मिक उत्सव म्हणजे ख्रिसमस.

पोर्तुगीज अमलाखाली वसईत ख्रिस्ती धर्म रुजला. पण हा इतिहास फार तर सात-आठशे वर्षांपूर्वीचा. तत्पूर्वी म्हणजे जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी येशुख्रिस्ताच्या बलिदानानंतर विविध देशी सुवार्ता सांगण्यासाठी गेलेल्या समकालीन प्रेषितांपैकी सेंट थॉमस यांनी केरळात मलाबार येथे प्रथम ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला असा इतिहास आहे. एर्नाकुलम जिह्यातील कोवाकुट्टू येथील चर्च हे हिंदुस्थानातील सर्वात जुने चर्च. ख्रिस्ती धर्माच्या अनेक पंथापैकी सिरियन या एक सर्वात जुन्या उपासना पद्धतीचा वापर करणारे हे चर्च ख्रिस्तकाळानंतरच्या पाचव्या शतकात बांधले गेले. केरळात ख्रिस्तकाळानंतर पहिल्या शतकातील उत्तरार्धात पाऊल पडलेल्या या ख्रिस्ती धर्माचे मूळ गोवा, दीव-दमण, दादरा नगर हवेली आणि वसई या प्रांतात मात्र पोर्तुगीजांनी रुजवले. असं असलं तरी काही भाषिक व धार्मिक उपासना विधीतील बदल सोडले तर वसईतील ख्रिस्ती लोकांची मूळ संस्कृतीच्या चालीरितीशी असलेली नाळ काही तुटली नाही. वसई किनारपट्टीवरील साधारण 14/15 किलोमीटर लांबीच्या पट्टय़ातील कोळी, वाडवळ, मुस्लिम, सामवेदी, भंडारी या समाजातील काही लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.

हिंदुस्थानी संस्कृतीत जसा सणावारांच्या आनंदाचा तोटा नाही तसा ख्रिस्ती सणावारांच्या यादीतही सणांचा तोटा नाही. वारशातच उत्सवप्रियता लाभलेला वसईतील ख्रिस्ती माणूस यातील खूपसे सण मोठय़ा आवडीने साजरे करतो. ईस्टर हा येशूच्या पुनरुत्थानाचा सोहळा, सेंट जॉन द बाप्टिस्ट या भविष्यवादी संताचा सण, आपापल्या धर्मग्रामातील आश्रयदात्या संतांचा व नवीन वर्षाच्या आगमनाचा उत्सव म्हणून न्यू इयर. पण या सर्वांवर कडी म्हणजे उत्साहाने व हौसेने किमान आठवडाभर साजरा होणारा एकमेव सण म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माचा सोहळा अर्थातच ख्रिसमस… नाताळ!

नाताळ म्हणजे प्रसूतीचा सण. सृजनाचा सोहळा. यातील धार्मिक श्रद्धेचा भाग वगळता येणारच नाही. कारण ‘अजन्मा जन्मासी आला’ हे समीकरणच मुळात विज्ञानाच्या चाकोरीत व श्रद्धेच्या परिघाबाहेर राहून मान्य होणे शक्य नाही. मुळातच या ख्रिस्ती समाजाची जडणघडण ही हिंदुस्थानी संस्कारांची असल्याने या आयात झालेल्या धर्माशी त्याची सोयिस्करपणे सांगड घातली गेली आहे. वसईतील ख्रिसमसला एकाच वेळी दोन संस्कृती संगमाची जोड आहे. नाताळ म्हटलं की सर्वसामान्य भाविकांच्या डोळ्यासमोर उभं राहणारं दृश्य म्हणजे इस्रायलमधील बेथलहेम गाव. गाईच्या गोठ्यावजा एका गुंफेत जन्माला आलेलं दैवी बाळ.

देवाचं घर बाई गुरांचा गोठा

नाही त्या ओटा नि खिडक्या तोटा…

देवाच्या घराला चांदोबा दिवा

वाजविते हवा मंजुळ पावा…

अशी गाणी गात (carol singing) कॉन्व्हेट स्कूलमधे शिकणारी लहान लहान मुलं गावागावातून सांताबाबासोबत फिरत असतात. भाषिक संस्कृतीचा याहून सुंदर मिलाफ दुसरा काय असू शकतो.

गावागावात नाताळगोठे सजवण्याची चुरस लागते. कधी कधी यात स्पर्धा ही भरवल्या जातात. निकष मात्र जास्तीत जास्त लोकहिताचे संदेश देणारा, इको फ्रेंडली, वाजवी खर्चात नि कल्पकतेने केलेल्या सजावटीचा देखावा. काही वर्षांपूर्वी इथल्या नानभाट नावाच्या एका गावातील युवकांनी तलावाच्या अगदी मध्यभागी हा नाताळगोठय़ाचा देखावा उभारत आपल्या कल्पकतेची झलक दाखवली.

सुशेगाद गोव्यातील ख्रिसमस नि वसईतील ख्रिसमस यात विशेष फरक नसतो… पाश्चिमात्य संस्कृतीचा केक घरोघरी आवर्जून बनवला जातो. सोबत खास घरगुती पद्धतीने बनवलेली वाईन पाहुणचारासाठी वाढली जाते. मॅझपिन, कलकल, रोझकुकीज, मिल्कक्रीम कुकीज् …अशा विविध खाद्यपदार्थांसोबतच करंजी, चकली, चिवडा, लाडू अशा पारंपरिक पक्वान्नांचीही रेलचेल असते. दोन्ही संस्कृतीच्या खाद्यपदार्थांचा सुंदर मिलाफ इथे पाहवयास मिळतो…खरं तर खाण्यातील वैविध्य हेच सर्व सणवाराचे व्यवच्छेदक लक्षण. विंदालू, फुड्डी, सर्पतेल, टेपरात यासारखे बरेचसे पोर्तुगीज धाटणीचे पदार्थ… बिर्याणी, कबाब, तंदुरी वगैरे अरबी पदार्थांच्या जोडीला बसून ज्यू धर्मातूनच आपण दोन वेगळे झालेले भाऊ भाऊ आहोत याची जणू ग्वाहीच देत असतात.

तर अशा या ख्रिसमसच्या मध्यरात्री बारा वाजता साजरी होणारी पवित्र मिस्सा (चर्चमधे केली जाणारी प्रार्थना) हा एक वेगळाच अनुभव असतो. रस्त्यावरून जाताना घराघरातून दिसणारे ख्रिसमस स्टार…केकचा दरवळणारा गोड वास…सर्वत्र झगमगाट… रोषणाईने उजळून निघालेली घरं, चर्चेस्… नवीन कपडय़ांची मौज किरकिरी होऊ नये म्हणून ऐन थंडीतही स्वेटर्सचा मोह टाळून चर्चच्या आवारात मिस्साविधी साजरा करण्यासाठी जमलेली भाविकांची रंगबिरंगी गर्दी…सारंच खूप उत्साहवर्धक असते.

[email protected]