सुधारक कार्यकर्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> भगवान परळीकर

वेगवेगळय़ा गोतावळय़ात गुंतूनही मराठीपण जपणारा सामान्य माणूस अशीच बेन्नूर सरांची ओळख साऱया महाराष्ट्राला होती. ते मुस्लिम समाजाचे असले तरी त्यांना उर्दू भाषेचा फारसा गंध नव्हता. त्यांचे मराठी भाषेवरच प्रभुत्व होते. उत्कृष्ट इंग्रजी येत असूनही ते जाणीवपूर्वक मराठी भाषेतूनच लेखन व प्रबोधन करीत होते. त्यामुळेच ते महाराष्ट्रातील मुस्लिम साहित्य संमेलनाचे अध्वर्यू बनले. अनेक वेळा मित्रमंडळींत आणि साहित्यिकांत बोलताना ‘मी मराठी मुसलमान आहे’ असे ते सहजपणे सांगत. कुठलीही वैचारिक गुलामगिरी न करणारा हा सुधारक विचारवंत जे भावेल ते स्वीकारत गेला.

मुस्लिम समाजात सुधारणावादी चेहरे मुळातच कमी आहेत. प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर हे अशाच अपवादात्मक मुस्लिम विचारवंतांपैकी एक. प्रामुख्याने स्त्रीशिक्षण, स्त्रीहक्क, मुस्लिम स्त्रियांचे स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि सबलीकरण याबाबत हा बंडखोर विचारवंत कायम आग्रही राहिला. 1950-60 च्या दशकात महाराष्ट्रात पुरोगामी आणि शाहू-आंबेडकर-फुले यांच्या विचारांचा वसा ज्या पिढीने घेतला आणि त्याला अनुसरून वाटचाल सुरू केली त्या ‘चळवळय़ा’ पिढीचे प्रा. बेन्नूर हे एक प्रतिनिधी. अर्थात या वर्तुळात आयुष्यभर कार्यरत राहूनही बेन्नूर हे कधीही कुठलेही ‘वादी’ बनले नाहीत हे त्यांचे वैशिष्टय़ होते. मार्क्सवादी, समाजवादी, आंबेडकरी चळवळींशी त्यांचा शेवटपर्यंत घनिष्ठ संबंध राहिला. या विचारांशी, चळवळींशी त्यांची नाळही जुळली होती. ते त्या विचारांना बांधील राहिले, पण त्या विचारांचे ‘गुलाम’ ते बनले नाहीत. हमीद दलवाईंसारख्या मुस्लिम सुधारक विचारवंतासोबत काम करताना ते सत्यशोधक चळवळीशी जोडले गेले, मात्र पुढे त्यातूनही ते बाहेर पडले. डॉ. असगर अली इंजिनीयर आणि डॉ. मोईन शाकीर यांच्या सहवासामुळे त्यांचे सुधारणावादी विचार आणखी पक्के झाले. बेन्नूर कुटूंबीय मूळचे कर्नाटकातील हुबळीचे. मुंबई प्रांतात न्यायालयात नोकरी करीत असल्याने बेन्नूर यांच्या वडिलांची सोलापूरच्या जिल्हा न्यायालयात बदली झाली. फक्रुद्दीन बेन्नूर हे जिल्हा न्यायालयात त्यावेळी लेखनिक म्हणून काम करीत. एम.ए.चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संगमेश्वर महाविद्यालयात अध्ययनाला सुरुवात केली. राज्यशास्त्र्ा हा त्यांचा विषय. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून संगमेश्वर महाविद्यालयात ते लोकप्रिय होते. त्याच वेळेस त्यांनी अनेक वर्तमानपत्रांतून अभ्यासपूर्ण लिखाणास सुरुवात केलेली होती. प्रा. बेन्नूर सुरुवातीपासूनच चार भिंतींमध्ये रमले नाहीत. संशोधकांसाठी अभ्यासू वृत्ती जोपासताना परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या विविध चळवळीत त्यांनी स्वतŠला जोडून घेतले. अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, मुस्लिम ओबीसी आंदोलन, इतिहास पुनर्लेखन समिती या संस्थांच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील मराठी लेखकांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मुस्लिम सत्यशोधक चळवळीत काम करताना तोंडी तलाक आणि बहुपत्नीत्व या मुस्लिम समाजातील वाईट रूढींबाबत त्यांची मते ठाम होती आणि ती ते प्रभावीपणे मांडत.

1972 च्या दरम्यान सोलापुरात खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून कॅपिटेशन फी घेतली जाई आणि गरीब व हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जायचा. ही कॅपिटेशन फी रद्द व्हावी आणि शासनाने हे वैद्यकीय महाविद्यालय ताब्यात घ्यावे यासाठी तीक्र आंदोलन झाले. त्या आंदोलनात डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. अरुण लिमये वगैरेंबरोबर प्रा. बेन्नूर यांचाही सक्रिय सहभाग होता. या आंदोलनाचा परिणाम असा झाला की शासनाने ते महाविद्यालय ताब्यात घेतले. आज ते डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय म्हणून परिचित आहे. याच काळात युक्रांद आणि समाजवादी चळवळीशीही प्रा. बेन्नूर जोडले गेले. 1970 च्या दशकात दलित पँथर चळवळीतही सरांचा सक्रिय सहभाग होता. या काळात साजऱया होणाऱया डॉ.आंबेडकर जयंती उत्सवात तसेच महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने व्याख्याने देणारे ते एकमेव प्राध्यापक असत. पुढे शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अध्ययन केंद्रातर्फे गांधीवादावर संशोधन करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि महात्मा गांधी हा त्यांचा श्रद्धेचा विषय बनला. गांधीजींच्या हिंद स्वराज्य पुस्तिकेवर विस्तृत मांडणी करणारे त्यांनी दोनशे पानांचे पुस्तक लिहिले. प्रा. बेन्नूर सरांचा मूळ पिंड कार्यकर्त्याचा असल्यामुळे वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवर आणि विषयांवर अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यासू मांडणी करीत असत आणि उपायही शोधत असत. ते अनुसूचित जातीजमाती आणि राखीव जागांचेही खंदे समर्थक म्हणून सक्रिय राहिले. हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर त्यांनी प्रचंड लेखन केले. मुस्लिम समाजातदेखील जातीव्यवस्था असल्यामुळे मुस्लिम ओबीसी चळवळीत ते सातत्याने सक्रिय असायचे. मुख्य म्हणजे एवढय़ा वेगवेगळय़ा गोतावळय़ात गुंतूनही मराठीपण जपणारा सामान्य माणूस अशीच बेन्नूर सरांची ओळख साऱया महाराष्ट्राला होती. ते मुस्लिम समाजाचे असले तरी त्यांना उर्दू भाषेचा फारसा गंध नव्हता. त्यांचे मराठी भाषेवरच प्रभुत्व होते. उत्कृष्ट इंग्रजी येत असूनही ते जाणीवपूर्वक मराठी भाषेतूनच लेखन व प्रबोधन करीत होते. त्यामुळेच ते महाराष्ट्रातील मुस्लिम साहित्य संमेलनाचे अध्वर्यू बनले. अनेक वेळा मित्रमंडळींत आणि साहित्यिकांत बोलताना ‘मी मराठी मुसलमान आहे’ असे ते सहजपणे सांगत. कुठलीही वैचारिक गुलामगिरी न करणारा हा सुधारक विचारवंत जे भावेल ते स्वीकारत गेला. मुस्लिम असो की हिंदू, जमातवादावर तुटून पडणाऱया प्रा. बेन्नूर यांना गेल्या सोमवारीच मानपत्र प्रदान करण्यात येणार होते, मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि मुस्लिम समाजाला नवी दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा एक विचारवंत आणि सुधारक कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला.

– [email protected]