‘ऑकस’ गटाची स्थापना : चीनला शह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाला पायबंद घालण्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन यांनी एकत्र येत ‘ऑकस’ या नव्या गटाची स्थापना केली आहे. तिन्ही देशांच्या आद्याक्षरांचा समावेश असलेली ऑकस म्हणजे ऑस्ट्रेलिया, यूके आणि अमेरिका या तीन देशांमध्ये झालेल्या संरक्षण कराराला ऑकस असं नाव देण्यात आलं. सुरक्षा आणि संरक्षणविषयक ज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक क्षमता, पुरवठा साखळी यांची क्षमतावृद्धी क्षेत्रांत सहकार्य वाढविणे हा या गटाच्या स्थापनेमागील हेतू आहे.

ऑकस म्हणजे ऑस्ट्रेलिया, यूके आणि अमेरिका. चीनच्या वाढत्या विस्तारवादाला शह देण्यासाठी या तीन देशांमध्ये झालेल्या संरक्षण कराराला ऑकस असं नाव देण्यात आलं. याअंतर्गत ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुडय़ा दिल्या जाणार आहेत. दक्षिण चीन समुद्रासह प्रशांत महासागराच्या क्षेत्रातील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाला पायबंद घालण्यासाठी, चीनला लष्करीदृष्टय़ा टक्कर देण्यासाठी, चीनच्या सतत वाढणाऱया, जगातील सर्वात मोठा असणाऱया नौदलावर लक्ष ठेवण्यासाठी हा सैन्य करार महत्त्वाचा आहे.

या करारामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. फ्रान्स आणि इतर युरोपियन देशांमध्ये डावलले गेल्याची भावना आहे. फ्रान्सने ऑस्ट्रेलियाबरोबर केलेला अब्जावधी डॉलर्सचा करार केला होता, तो आता ऑस्ट्रेलिया रद्द करेल. हिंदुस्थान या करारामुळे आनंदी आहे.

जपान, ऑस्ट्रेलियासारखे देश चीनच्या विस्तारवादामुळे खडबडून जागे झाले असून, आपल्या संरक्षण धोरणाचा आक्रमक फेरविचार करीत आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या तीन देशांच्या नव्या महासागरी सहकार्याकडे या दृष्टीने पाहावे लागेल.

ऑकसअंतर्गत पहिलं पाऊल म्हणून आम्ही ऑस्ट्रेलियाच्या नौदलाकरिता आण्विक उर्जेने चालणाऱया पाणबुडय़ा निर्माण करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत, असं यामध्ये म्हटलं आहे. या पाणबुडय़ा मिळाल्याने जगात आण्विक ऊर्जेने चालणाऱया पाणबुडय़ा असलेल्या सात देशांच्या यादीत ऑस्ट्रेलियाही समाविष्ट झाला आहे. याआधी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन, हिंदुस्थान आणि रशिया यांच्याकडेच हे तंत्रज्ञान होतं.

या पाणबुडय़ा पारंपरिक पाणबुडय़ांपेक्षा जास्त वेगवान असतील. यांचा माग काढणं अत्यंत कठीण काम असेल. कितीही प्रगत पाणबुडय़ा असल्या तरी त्यांना काही काळाने सागराच्या पृष्ठभागावर यावे लागते, तेव्हा त्या शत्रूच्या नजरेला पडू शकतात. आण्विक पाणबुडय़ा प्रदीर्घ काळ पाण्याखाली राहू शकतात. यांमधून लांब अंतरावर मिसाईल मारा करण्याची सोय आहे. गेल्या 50 वर्षांत अमेरिकेने आपलं पाणबुडी तंत्रज्ञान ब्रिटनव्यतिरिक्त इतर कोणत्याच देशांना दिलं नव्हतं. त्यामुळे यंदाचा हा करार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजवर अणुशस्त्रांपासून दूर राहिलेला ऑस्ट्रेलिया आता अमेरिकी बनावटीच्या आण्विक पाणबुडय़ा घेणार आहे. या संरक्षण करारामुळे इंडो-पॅसिफिक विशाल जल-भूमी क्षेत्राचे राजकारण बदलणार आहे.

‘ऑकस’ची गरज का आहे?

एकेकाळी चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये व्यापारी संबंध चांगले होते, आता मात्र ते फारच बिघडले आहेत. 2019 साली दोन्ही देशांमध्ये 95 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता. चीनच्या ख्वावे 5 जी नेटवर्प पंपनीवर निर्बंध घातल्यापासून संबंधांमध्ये दुरावा आला. असे निर्बंध घालणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश होता. कोव्हिड-19 संदर्भात चीनची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी असं ऑस्ट्रेलियानं गेल्या वर्षी स्पष्ट केले. चीन ज्या क्वॉड समूहाला आपला शत्रू मानतो त्या समूहाचाही ऑस्ट्रेलिया सदस्य आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियाने चीनच्या बेल्ट अॅण्ड रोड योजेनेशी संबंधित दोन करारही रद्द केले. दक्षिण चीन समुद्र, पश्चिम पॅसिफिक क्षेत्रामध्ये चीनचा वाढता प्रभाव, हिंदुस्थान-चीन यांच्या संबंधातील दुरावा या सगळ्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया सरकारने जुलै महिन्यामध्ये आपल्या लष्करी खर्चात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला.

दक्षिण चीन समुद्र हा हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराच्या मधे येतो. तसेच त्याच्या आजूबाजूला चीन, तैवान, व्हीएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई, फिलिपाइन्स हे देश आहेत. जर हिंदी-पॅसिफिक क्षेत्रामध्ये चीनची पाणबुडी फिरत असेल तर येत्या काळात ती पश्चिम पॅसिफिक क्षेत्रामध्येही येऊ शकते. त्यामुळे भविष्यात ऑस्ट्रेलियाचा दबदबा कमी होऊ नये यासाठी ते प्रयत्न करणार आहे.

‘क्वॉड’पेक्षा ‘ऑकस’ वेगळे?

आधीच क्वॉड समूह असूनसुद्धा अमेरिकेला ऑकसची गरज का पडली? क्वॉडमध्ये ऑस्ट्रेलियासोबतच जपान आणि हिंदुस्थान हे देशसुद्धा आहेत. सध्या एक रशिया वगळला तर जगातले सगळे प्रभावी देश चीनच्या विरोधात एकत्र येत आहेत आणि हा नवा सामरिक करार त्याचेच एक रूप आहे. क्वॉडपेक्षा वेगळा ऑकस करार करण्यामागे अमेरिकेचा हेतू एक वेगळा मिलिटरी अलायन्स तयार करण्याचा आहे.

हिंदुस्थानला अमेरिकेशी जवळीक ठेवण्याबरोबरच रशिया आणि इराण यांच्याशीही संबंध कायम ठेवायचे आहेत. जपानचे चीनशी चांगले व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे जपानला चीनसोबतचे आपले सगळे संबंध संपवायचे नाहीत. त्यामुळेच क्वॉडऐवजी दुसऱया समूहाची गरज भासली असावी. हिंद-प्रशांत क्षेत्रात यापूर्वीच अमेरिका, हिंदुस्थान, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा क्वाड हा गट सक्रिय आहे. या गटाची बैठक येत्या 24 सप्टेंबरला वॉशिंग्टनमध्ये होणार आहे. त्याच्या आधीच ‘ऑकस’ गटाची घोषणा करण्यात आली आहे.

ऑकस करारामुळे फ्रान्स नाराज आहे. कारण यामुळे ऑस्ट्रेलियासोबत केलेल्या अब्जावधी डॉलर्सचा करार संपला आहे. अमेरिकेनं म्हटलं की, येणाऱया दिवसात फ्रान्सशी चर्चेतून हे मतभेद दूर केले जातील, तर ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मरीस पेन यांनी म्हटलं की, फ्रान्सची ‘निराशा’ आम्हाला कळते आणि आम्ही फ्रान्सला समजावून देऊ की ‘द्विपक्षीय संबंधांना आम्ही महत्त्व देत आहोत.’ 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन नौदलासाठी फ्रेंच डिझाईनच्या 12 पाणबुडय़ा तयार करण्याचं पंत्राट फ्रान्सला मिळालं होतं. या कराराची रक्कम सुमारे 50 बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी होती. त्यामुळे नाटोमध्ये अमेरिकेचा मित्र देश असलेल्या फ्रान्ससाठी ऑकस करार हा एक धक्का आहे.

जगात कोणतीही चीनविरोधी आघाडी झाली, तरी तिच्यासाठी हिंदुस्थानचे सहकार्य महत्त्वाचे असेल. आपण अणुशक्तीवर चालणाऱया तीन पाणबुडय़ा तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एक ‘आयएनएस अरिहंत’ ही पाणबुडी तयार झाली आहे. इतर पाणबुडय़ा नेमक्या कधी येतील, हे सांगणे कठीण आहे. म्हणजेच, पाणबुडय़ांचा हिंदुस्थानी नौदलामध्ये येण्याचा वेग वाढवणे गरजेचे आहे.