लेख – हिंदुस्थान-जपान भागीदारीला नवे वळण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

समुद्री मार्गांचे टेहळणी तंत्रज्ञान (सर्व्हिलन्स टेक्निक) जपानकडे अत्यंत प्रभावी आहे. हिंदी महासागरामध्ये हिंदुस्थान, अमेरिका आणि जपान यांनी सागरी कवायती (मलबार एक्सरसाईज) केल्या. हा एक प्रकारे चीनला इशारा होता. त्याचप्रमाणे सागरी मार्गांची सुरक्षा यासाठी जपानची हिंदुस्थानला मोठी मदत होणार आहे. चीनला उत्तर देण्यासाठी हिंदुस्थानला स्वतःच्या ‘खऱया’ मित्रांची फळी उभी करावी लागेल. जपानशी मैत्री दृढ केल्याने मोठे फायदे होतील. जपानचे पंतप्रधान किशिदा यांचा हा दौरा हिंदुस्थान-जपान आणि जागतिक भागीदारीला नवे वळण देण्यात यशस्वी ठरला आहे.

जपानची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच हिंदुस्थान दौऱयावर आलेल्या पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी 19 मार्चला पुढील 5 वर्षांत हिंदुस्थानात 3.2 लाख कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे कोरोनामुळे चढ-उतार अनुभवत असणाऱया हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला बुस्टर मिळाले आहे.

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा शनिवारी दोन दिवसीय हिंदुस्थान दौऱयावर आले. यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय तथा रशिया-युक्रेन युद्धासह जागतिक महत्त्वाच्या अनेक मुद्दय़ांवर विस्तृत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी 14 व्या हिंदुस्थान-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागही घेतला.

परिषदेत पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान आपले जुने मित्र असल्याचे स्पष्ट केले. परराष्ट्रमंत्री म्हणून फुमियो किशिदा यांनी अनेक वेळा हिंदुस्थानला भेट दिली आहे. जपानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर फुमियो किशिदा यांचा हा पहिला हिंदुस्थान दौरा होता. गेल्या काही वर्षांत हिंदुस्थान-जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीमध्ये अभूतपूर्व प्रगती करण्यात पंतप्रधान किशिदा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हिंदुस्थान-जपान आर्थिक परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती, समृद्धी व भागीदारी जपान-हिंदुस्थानच्या संबंधांचा मुख्य आधार असल्याचे स्पष्ट केले. जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी यावेळी युक्रेन-रशिया वादावर शांततेने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली. जगभरातील अस्थिरतेचे वातावरण पाहता आज हिंदुस्थान-जपानमध्ये घनिष्ठ भागीदारी होण्याची गरज आहे. याप्रकरणी जागतिक नियम व कायद्यांनुसार शांततेने तोडगा काढण्याची गरज आहे. जपान हिंदुस्थानच्या मदतीने जगातील संघर्ष संपुष्टात आणण्याच्या दिशेने प्रयत्न करेल. तसेच युक्रेन व त्याच्या शेजारी देशांना मानवीय मदत पोहोचवण्याचाही प्रयत्न करेल.

क्वॉड परिषदेचे निमंत्रण
किशिदा यांनी यावेळी दोन्ही देशांत सायबर सुरक्षेशी संबंधित एक महत्त्वपूर्ण करार झाल्याचे स्पष्ट केले. हिंदुस्थान जपानचा एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे. त्यामुळे मी पंतप्रधान मोदींना टोकियोत होणाऱया क्वॉड परिषदेचे निमंत्रण देत आहे, असे ते म्हणाले.

क्वॉडचे मागील शिखर संमेलन ऑक्टोबर 2018 मध्ये जपानची राजधानी टोकियोत झाले होते. हिंदुस्थानसोबतचे द्विपक्षीय संबंध जपानच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण आजच्या स्थितीत केवळ अमेरिकेवर विसंबून राहणे पुरेसे नाही हे जपानच्या आता लक्षात आले आहे. हिंदुस्थान एक मोठा देश व उदयोन्मुख आर्थिक महासत्ता आहे. त्यामुळे जपानची त्याच्याशी अधिक मजबूत संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे.

जपानच्या राष्ट्रीय संरक्षण तज्ञांच्या मते, स्वतंत्र व खुल्या हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी हिंदुस्थान जपानचा सर्वात महत्त्वाचा भागीदार आहे. त्यामुळे हे संबंध अजून पुढे नेण्यासाठी पुढील वर्षी मार्च महिन्यात हिंदुस्थानी हवाई दल आपली सहा सुखोई लढाऊ विमाने जपानला पाठवेल.
हिंदुस्थान-जपान वार्षिक शिखर परिषद 2018 मध्ये टोकियो येथे झाली होती. हिंदुस्थान आणि जपान यांच्यात त्यांच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या कक्षेत बहुआयामी सहकार्य आहे. हिंदुस्थान-पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी यासाठी दोन्ही बाजूंना विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्याचे पुनरावलोकन आणि बळकटीकरण तसेच परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्दय़ांवर विचारविनिमय करण्याची संधी या शिखर परिषदेने दोन्ही बाजूंना दिली.

किशिदा यांनी जपानच्या पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेच ऑक्टोबर 2021 मध्ये पंतप्रधान मोदींशी संवाद साधला होता. त्यावेळी दोन्ही बाजूंनी आमची विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आणखी मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेनंतर जपानकडून हिंदुस्थानात पुढील पाच वर्षांत 4200 कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली. उभय देशांदरम्यान सायबर सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांसाठीच्या करारांवरही स्वाक्षऱया करण्यात आल्या.

ही भागीदारी शांतता, समृद्धी आणि विकास यांच्यासाठी आहे.जपान आणि हिंदुस्थान हे विशेष नीतित्मक आणि जागतिक भागीदार आहेत. उभय देशांत स्वातंत्र्य, लोकशाही, मानवाधिकार आणि कायद्याचे राज्य या जागतिक मूल्यांचा समान धागा प्रदीर्घ इतिहासातून जोडला गेला आहे. दोन्ही देशांचे परस्पर हितसंबंध हे दीर्घकालीन आहेत. हिंदुस्थान आणि जपान यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास 70 वर्षे होत असताना हा दौरा अत्यंत महत्त्वाचा होता.

हिंदुस्थान-जपान भागीदारी आणखी वाढवणे हे दोन्ही देशांसाठीच महत्त्वाचे आहे. यामुळे हिंदुस्थान-प्रशांत महासागर प्रदेशात आणि संपूर्ण जागतिक स्तरावर शांतता, समृद्धी आणि स्थिरतेला प्रोत्साहन मिळेल.

समुद्री मार्गांचे टेहळणी तंत्रज्ञान (सर्व्हिलन्स टेक्निक) जपानकडे अत्यंत प्रभावी आहे. हिंदी महासागरामध्ये हिंदुस्थान, अमेरिका आणि जपान यांनी सागरी कवायती (मलबार एक्सरसाईज) केल्या. हा एक प्रकारे चीनला इशारा होता. त्याचप्रमाणे सागरी मार्गांची सुरक्षा यासाठी जपानची हिंदुस्थानला मोठी मदत होणार आहे. चीनला उत्तर देण्यासाठी हिंदुस्थानला स्वतःच्या ‘खऱया’ मित्रांची फळी उभी करावी लागेल. चीनला रोखण्याचा एक मार्ग आहे जपान. जपानशी मैत्री दृढ केल्याने मोठे फायदे होतील. लोकशाहीप्रधान राष्ट्रांच्या एकजुटीचा पर्याय उभा करण्यात हिंदुस्थानने पाऊल उचलायला हवे, असे करताना चीनला काय वाटेल, या गोष्टीचा फार बागुलबुवा करण्याचे कारण नाही. पंतप्रधान किशिदा यांचा हा दौरा हिंदुस्थान-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला नवे वळण देण्यात यशस्वी ठरला आहे.