
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]
आपल्याकडे सैन्यभरती म्हटली म्हणजे हजारो युवक येतात, पण फारच थोडय़ा युवकांचा सैन्यात नंबर लागतो. अर्थात चीन किंवा पाकिस्तानविरुद्ध चालणाऱया प्रदीर्घ महायुद्धाकरिता मोठय़ा संख्येने सैनिकांची गरज भासेल. त्यावेळी सैन्यात भरती होण्याकरिता नागरिकांच्या मनात देशप्रेम जागृत करावे लागेल. तसे झाले तरच ते सैन्यात भरती होतील. सध्या रशिया, युक्रेन, युरोप आणि इतर देशांत युद्धासाठी सैनिकांची कमतरता भासत आहे. मात्र तशी स्थिती भारतात निर्माण होणार नाही.
आज जगात 60 ठिकाणी युद्ध सुरू आहेत. त्यातील दोन महत्त्वाच्या युद्धभूमी आहेत युक्रेन-रशिया आणि इस्रायल-हमास. या युद्धभूमीवर वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र, तंत्रज्ञान वापरले जात आहे. या युद्धभूमी प्रयोगशाळा बनल्या आहेत. कुठले तंत्रज्ञान जास्त प्रभावी आहे आणि कुठले नाही, हे स्पष्ट होत आहे. विमाने विरुद्ध ऑण्टिएअरक्राफ्ट क्षेपणास्त्र यामध्ये क्षेपणास्त्रांचा विजय झाला आहे. रणगाडे विरुद्ध ऑण्टिटँक क्षेपणास्त्रांमध्ये क्षेपणास्त्र जिंकली आहेत. रणगाडय़ांची बरबादी ही दोन्ही देशांच्या रणगाडा लढाईत झाली नाही. त्यांना छोटय़ा, कमी किमतीच्या, लपून आणि लांबून फायर केलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांनी बरबाद केले. रशियाच्या काळ्या समुद्रातील मोठय़ा विमानवाहू नौका, इतर युद्धनौका लांबून फायर केलेल्या क्षेपणास्त्रांनी डुबवल्या आणि त्यानंतर रशियन नौदल लढण्याकरिता पुढे आलेच नाही. क्षेपणास्त्रांमुळे होणारे नुकसान असह्य झाल्यामुळे रशियन हवाई दलाने या लढाईमध्ये फारसा भाग घेतला नाही. हवाई दलापेक्षा ड्रोन्स कितीतरी जास्त पटीने प्रभावी ठरले आहेत.
महागडी लढाऊ जहाजे, फायटर विमाने, रणगाडे हे पांढरे हत्ती बनले आहेत. शत्रूची जहाजे, फायटर विमाने, रणगाडे, मोठी शस्त्र, जी आकाशातून ओळखता येतात, त्यांना लांबून क्षेपणास्त्र फायर करून बरबाद करता येते. मात्र या युद्धामध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, शस्त्र आणि शस्त्र चालवणारा सैनिक यामध्ये सैनिक हा जास्त महत्त्वाचा आहे. रशियामध्ये लढण्याकरिता लढाऊ युवकांची कमी पडत आहे. कारण श्रीमंत रशियन पहिलेच रशिया सोडून युरोप आणि इतरत्र पळून गेलेले आहेत. अनेक रशियन युवक सैन्यात भरती व्हायचे नाही म्हणून देशामध्ये कुठेतरी लपून बसलेले आहेत. युद्ध थांबवा म्हणून रशियामध्ये अनेक ठिकाणी निदर्शने होत आहे.
सैनिकांच्या बाबतीत युक्रेनची परिस्थितीसुद्धा फारशी चांगली नाही. त्यांना पण लढणाऱया सैनिकांची कमी पडत आहे. कारण हजारो मारले गेले किंवा जखमी झाले. युक्रेनचे अनेक नागरिक विविध कारणे काढून निर्वासितांबरोबर युक्रेनच्या बाहेर पळून गेले आहेत. युक्रेनचे अनेक युवक युद्धभूमीवर जायला तयार नाहीत.
असा प्रचार करण्यात आला होता की, युक्रेनचे नागरिक हे देशावर जास्त प्रेम करतात आणि देशाकरिता लढण्याकरिता पण तयार आहेत. मात्र हे काही प्रमाणातच सत्य आहे. अनेक नागरिक स्वतःचा प्राण वाचवण्यामध्येच गुंतलेले आहेत. युक्रेनच्या सैनिकांचे सरासरी वय आहे 45 वर्षे. याचाच अर्थ तरुणांच्या ऐवजी मध्यमवयीन सैनिक युद्धभूमीवर जास्त आहेत. 45 वर्षांच्या मध्यमवयीन सैनिकाची जर पंचवीस वर्षीय तरुण सैनिकांशी चकमक झाली तर काय होईल? अर्थातच तरुण सैनिक जिंकेल. युरोपमधल्या अनेक लहान देशांत सैन्यात जाण्याकरिता तरुण मंडळीच उरलेली नाहीत.
चीनचीसुद्धा अवस्था अशीच दयनीय आहे आणि चिनी नागरिकसुद्धा सैन्यामध्ये जायला तयार नाही. श्रीमंत देश झाल्यामुळे बहुतेक चिनी नागरिक हे श्रीमंत मध्यमवर्गीय झालेले आहेत आणि यामुळे ते शहरात राहणारे नाजूक युवक बनले आहेत, जे तिबेटसारख्या युद्धभूमीवर जायला तयार नाही. सध्या चीनबरोबरचा संघर्ष हा लडाख, अरुणाचल, सिक्कीममध्ये होत आहे. या युद्धभूमीवर आधुनिक शस्त्रांचा फारसा उपयोग नाही. इथल्या सैनिकांमध्ये ताकद, सहनशीलता, स्टॅमिना, वेगवेगळ्या कठीण परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती, कठीण परिस्थितीत तग धरण्याची क्षमता यांची गरज आहे. भारतीय सैन्यात हे गुण आढळतात.
चिनी सैनिक एक वर्षाचे प्रशिक्षण घेतात, त्यात तीन महिन्यांचे प्रशिक्षण हे साम्यवादी पक्षाचे कार्यकर्ते कसे व्हावे, हे असते. चिनी सैनिक प्रशिक्षण घेऊन फक्त दोन वर्षे सैन्यात असतात. त्यामुळे सैन्यातून बाहेर पडल्याने रोजीरोटीसाठी काय कमवायचे याची काळजी त्यांना असते. परिणामी युद्धात लढण्यात त्या सैनिकांना रस नाही.
सैनिक आणि अधिकारी यांच्यात दुरावा आहे. भारतीय सैन्याधिकारी आणि सैनिक यांच्यातील संबंध अत्यंत उत्तम आहेत. ते एखाद्या बटालियन किंवा रेजिमेंटमध्ये एकत्र असतात. ते आपल्या बटालियन किंवा रेजिमेंटला स्वतःचे दुसरे घरच समजतात. पूर्ण आयुष्यभर त्यांची रेजिमेंट, बटालियन हीच त्यांची ओळख असते. ही मैत्री शेवटपर्यंत सुरू असते. ‘गलवान’मध्ये आपले कमांडिंग अधिकारी कर्नल बाबू यांच्यावर चिनी सैनिकांनी हल्ला केला तेव्हा कुठल्याही परिणामांचा विचार न करता संख्येने कमी असलेल्या भारतीय सैनिकांनी चिन्यांवर हल्ला करून त्यांना कसे रक्तबंबाळ केले हे आपण पाहिले आहे.
भारतीय सैन्याची सर्वात मोठी ताकद आहे त्यांचे अधिकारी किंवा ऑफिसर्स. अधिकाऱयांची परंपरा आहे की, ते युद्धजन्य परिस्थितीत आपल्या सैनिकांचे नेतृत्व सर्वात पुढे राहून करतात. त्यामुळेच दरवर्षी अनेक सैन्याधिकारी देशासाठी प्राणाचे बलिदान देतात. त्यांच्या पराक्रमामुळे देशाला विजय मिळतो. सैनिकांना लढण्यासाठी मिळणारे प्रोत्साहन, आक्रमकता ही अधिकाऱयांमुळे येते. याचा चिनी सैन्यामध्ये अभाव आहे.



























































