हिंदुस्थानविरुद्ध हायब्रीड युद्ध

747

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये केलेल्या चिनी अतिक्रमणाला मीडियामध्ये खूप महत्त्व दिले जात आहे. मीडियात काहींचा सूर आहे की चीनबरोबरची आपली आक्रमकता आपल्याला महाग पडेल. मात्र चीन लडाखशिवाय हिंदुस्थानशी हायब्रीड युद्धही लढत आहे ज्याविषयी फारसे लिहिले जात नाही.

पाकिस्तान आणि चीन यांचे हिंदुस्थानशी असलेले वैर हे जगजाहीर आहे. त्यामुळे इतकी वर्षं हे देश हिंदुस्थानला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत आहे्त. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद आणि चीनच्या आक्रमक कारवाया आपल्याला माहीतच आहेत, परंतु २०१९ नंतर या दोन्ही देशांनी हिंदुस्थानविरुद्ध हायब्रीड म्हणजे संकरित युद्ध सुरू केले आहे. सध्या कश्मीर प्रश्नावर आणि हिंदुस्थान-पाकिस्तान संबंधात सगळे जग हे हिंदुस्थानच्या बाजूने आहे. पारंपरिक लढाई करण्याची पाकिस्तानची क्षमता नाही. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला कश्मीर खोऱ्यामध्ये फारसे यश सध्या मिळत नाही. कारण हिंदुस्थानी सैन्याची आक्रमक कारवाई. म्हणून हिंदुस्थानशी लढण्याकरता हायब्रीड युद्ध हा एक चांगला पर्याय निवडला आहे.

हायब्रीड वॉर (संकरित युद्ध) ही एक लष्करी रणनीती आहे. ज्यात पारंपरिक युद्ध हे राजकीय युद्ध, अनियमित युद्ध, सायबर युद्ध आणि मानसिक युद्ध यांचे मिश्रण आहे. हायब्रीड वॉरफेअर हे मुत्सद्देगिरी, निवडणूक हस्तक्षेप यासारख्या इतर प्रभावी पद्धतींना एकत्र करते. हा लढा केवळ शस्त्रास्त्रांनी लढला जात नाही तर त्यात लोकांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला जातो. संकरित युद्धात अफवा, चुकीची माहिती आणि बनावट बातम्या पसरवल्या जातात. सतत हे केल्याने सर्वसामान्यांचा विचार बदलू लागतो. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात असे करणे पूर्वीपेक्षा सोपे आहे. यामधील काही पैलूंवर आपण या लेखात विचार करू.

सायबर स्पेस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
शस्त्रास्त्रे आणि सैन्याच्या बळावर झालेल्या लढाईत बरेच नुकसान होते. अशी युद्धे खूप महाग असतात. परंतु हायब्रीड वॉर यापेक्षा वेगळे आहे आणि कमी किमतीत आपल्याला शत्रूचे नुकसान करता येते. तो आता आधुनिक युद्ध धोरणाचा एक भाग बनत आहे. सायबर स्पेस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकरित युद्धाची मुख्य शस्त्रे आहेत. हायब्रीड वॉरफेअरची ताजी शिकार हिंदुस्थान आहे. हिंदुस्थानची आस्मिता, सार्वभौमत्व, सभ्यता, सांस्कृतिक, सामाजिक वातावरण नष्ट करण्याचे हायब्रीड वॉरफेअरचे हे महत्त्वाचे साधन असल्याचे सिद्ध होत आहे. हायब्रीड वॉरफेअरमध्ये ऐतिहासिक, वांशिक, र्धािमक, सामाजिक, र्आिथक आणि भौगोलिक शोषणाचा गैरवापर करून, हिंसाचार वाढवून राजवट बदल किंवा सरकार बदल घडवून आणणे तसेच प्रस्थापित सरकारच्या विचारसरणीत बदल करणे असे प्रकार केले जातात. हिंदुस्थानला आस्थिर करण्यात पाक आणि चिनी गुप्तचर यंत्रणा सक्रियपणे गुंतल्या आहेत. हिंदुस्थान एक बहुसांस्कृतिक आणि बहुवंशीय राज्य आहे. जाती-जमाती, धर्म, राजकीय विचारसरणीतील मतभेदांचा वापर करून येथे हिंसाचार भडकवला जातो.

डिप्लोमसीची लढाई
अनेक कारणांमुळे चीन आणि पाकिस्तान हिंदुस्थानविरुद्ध हायब्रीड युद्ध जास्त प्रमाणात करतात. संकरित युद्धाचे अनेक पैलू आहेत. त्यातील काही पैलूंवर आपण लक्ष केंद्रित करू. एक पैलू म्हणजे डिप्लोमसीची लढाई. यामध्ये चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर युनायटेड नेशन्सच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये हिंदुस्थानला कसा त्रास देतो हे आपल्याला माहीतच आहे. चीनचे दुसरे शस्त्र आहे आपल्या देशांच्या निवडणुकांमध्ये ढवळाढवळ. अशा प्रकारची ढवळाढवळ सोाव्हिएत रशियाने १९६०-७०च्या दशकात केली होती. मिट्रोव्हीन या केजीबी एजंटच्या पुस्तकामध्ये हिंदुस्थानात नेमके काय केले होते यावर एक पूर्ण प्रकरण आहे. त्यात दिलेली माहिती धक्कादायक आहे. हे पुस्तक इंटरनेटवर उपलब्ध आहे. सध्या पाकिस्तान आणि चीनने हिंदुस्थानच्या राजकीय पक्षांमध्ये ढवळाढवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचे राजदूत काही राजकीय नेत्यांना भेटतात आणि मुत्सद्देगिरीच्या नावाखाली त्यांना चीनमध्ये भेटीसाठी बोलावले जाते. तिबेट किंवा मानसरोवरला भेट, पाकिस्तानमध्ये लाहोरला भेट. त्यानंतर काही राजकीय नेत्यांनी पाकिस्तानी आणि चिनी मीडियाला दिलेल्या मुलाखती इंटरनेटवर उपलब्ध आहेत. यामध्ये दिसते की काही नेते हिंदुस्थानच्या राष्ट्रीय हिताविरुद्ध बोलत आहेत.

सरकारच्या विरुद्ध असलेल्या अनेक पत्रकारांना चीन आणि पाकिस्तानला भेटीवर बोलवले जाते आणि त्यानंतर त्यांच्याकडून हिंदुस्थानी राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध लेख लिहिले जातात. हिंदुस्थानी मीडियामध्ये आणि आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये, खास करून अमेरिका आणि युरोपमधील वेगवेगळी वर्तमानपत्रे किंवा टीव्ही चॅनेल्सवर मुलाखती प्रकाशित होतात.

हिंसात्मक आंदोलने आणि अराजकता

चीनने याआधी ईशान्य हिंदुस्थानमध्ये बंडखोरी करणाऱ्यांना, मध्य हिंदुस्थानात माओवाद्यांना कशी मदत केलेली आहे हे आपल्याला माहीतच आहे. परंतु सध्या चीन सायबर युद्धामध्ये हिंदुस्थानातल्या काही सरकारी वेबसाइट्सच्या आत घुसून माहिती चोरण्याचा प्रयत्न करत आहे. अशी मदत चीन पाकिस्तानलासुद्धा देत आहे. पाकिस्तान हिंदुस्थानच्याविरुद्ध प्रपोगंडा युद्ध किंवा दुष्प्रचार युद्ध लढत आहे.

काय करावे
स्वत:चे रक्षण करणे हे नेहमीच कठीण असते, परंतु अशाप्रकारची ऑपरेशन्स (हायब्रीड वॉर) आपणसुद्धा चीन आणि पाकिस्तानमध्ये करू शकतो. त्यांना सांगू शकतो की तुम्ही आमच्या येथे राजकीय हस्तक्षेप केला तर आम्हीसुद्धा पाकिस्तानमध्ये असलेले राजकीय पक्ष किंवा पाकिस्तानातील सिध, बलुचिस्तान, किंवा वजिरीस्तानमधील वेगवेगळ्या मानवाधिकार संस्थांशी संपर्क साधून त्यांना हिंदुस्थानमध्ये येण्याकरता निमंत्रण देऊ शकतो. चीनच्या विरुद्ध असलेले काही प्रांत म्हणजे तिबेट, शिन झियांग, हाँगकाँग येथील नेत्यांशी संवाद साधून त्यांना आपण राजकीय मदत करू शकतो. त्यांनाही हिंदुस्थानात पर्यटक म्हणून यायला आवडेल. चीनला जशास तसे हीच भाषा कळते. म्हणून चीन किंवा पाकिस्तान यांच्याशी तसेच त्या भाषेत वागले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या